आजचा अग्रलेख: भस्मासूर परतला, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 08:54 AM2023-06-26T08:54:58+5:302023-06-26T08:55:31+5:30
Vladimir putin vs prigozhin: पुतीन यांचे जीवश्चकंठश्च मित्र असलेल्या येवगिनी प्रिगोझिन यांच्या नेतृत्वाखालील 'कॅनर ग्रुप' नामक खासगी लष्कराने पुतीन यांच्या विरोधात बंड पुकारले होते. पुतीन यांच्या सुदैवाने अवघ्या काही तासांतच 'वॅग्नर ग्रुप'ने शस्त्रे म्यान केली; अन्यथा रशियात किती मोठा रक्तरंजित संघर्ष झाला असता, याची कल्पनाही करवत नाही.
भारतात सगळ्यांनाच ठावूक असलेल्या भस्मासुराचा अनुभव रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी नुकताच घेतला. अगदी अलीकडील काळापर्यंत पुतीन यांचे जीवश्चकंठश्च मित्र असलेल्या येवगिनी प्रिगोझिन यांच्या नेतृत्वाखालील 'कॅनर ग्रुप' नामक खासगी लष्कराने पुतीन यांच्या विरोधात बंड पुकारले होते. पुतीन यांच्या सुदैवाने अवघ्या काही तासांतच 'वॅग्नर ग्रुप'ने शस्त्रे म्यान केली; अन्यथा रशियात किती मोठा रक्तरंजित संघर्ष झाला असता, याची कल्पनाही करवत नाही. 'वॅग्नर ग्रुप'ला पुतीन यांची खासगी सेना संबोधले जात असे. सोव्हिएत रशियाच्या पतनानंतर रशियात झालेल्या खासगीकरणाचा लाभ घेत अमाप माया गोळा केलेल्या मंडळींचे येवगिनी प्रिगोझिन हे शिरोमणी आहेत. पुतीन यांच्या उदयानंतर तर त्यांचे भाग्य असे काही फळफळले की विचारता सोय नाही! त्यातून उतराई होण्यासाठी प्रिगोझिन यांनीही पुतीन यांना गरज भासेल तेव्हा कसलाही विधिनिषेध न बाळगता मदत केली. आज रशिया ज्या युक्रेनसोबत युद्ध लढत आहे, त्या युक्रेनचा क्रीमिया हा प्रांत रशियाने २०१४ मध्येच घशात घातला होता. तेव्हा 'कॅनर ग्रुप'ने रशियन सैन्याच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला होता. त्यानंतर या भाडोत्री सैन्याने युक्रेनच्याच डोनबास प्रांतातील रशियावादी फुटीर गटांना मदत करून तो भागही रशियाच्या अधिपत्याखाली आणण्यासाठी मदत केली होती.
पुतीन यांच्याविरोधात बंड पुकारेपर्यंतही 'वॅग्नर ग्रुप'चे कथित सैनिक रशियन सैन्याच्या सोबतीने युक्रेनसोबत युद्ध लढत होते. 'वॅग्नर ग्रुप'ला युक्रेनी नेत्यांच्या हत्या करण्याचेही काम सोपविण्यात आले असल्याची आणि त्यासाठी त्यांनी रशियाच्या तुरुंगांमध्ये खितपत पडलेल्या कैद्यांना युद्ध आघाडीवर पाठविल्याची वदंता आहे. युक्रेन युद्धाशिवाय 'कॅनर ग्रुप'ने सीरिया, लिबिया, मध्य आफ्रिका प्रजासत्ताक, माली इत्यादी देशांमधील गृहयुद्धांमध्येही भाग घेतला आहे. त्या गृहयुद्धांमध्ये रशिया ज्या बाजू समर्थन करत आहे, त्या बाजूने 'वॅग्नर ग्रुप'ने लढाई केली आहे. थोडक्यात काय तर पुतीन यांना जिथे कुठे, ज्या प्रकारची लष्करी मदत लागेल, ती आजवर प्रिगोझिन यांची खासगी सेना करत आली होती. युक्रेनमध्ये सैन्य घुसविण्यासाठी बहाणा हवा म्हणून पुतीन यांच्या सांगण्यावरून 'वॅग्नर ग्रुप'च्या सैनिकांनीच रशियात खोटेनाटे हल्ले केल्याचीही वदंता आहे. युद्ध गुन्ह्यांमध्ये नोंद होण्याच्या भीतीने रशियन सैन्य करू शकत नसलेल्या सर्व गोष्टी पुतीन यांनी वॅग्नर ग्रुप करवी करून घेतल्या. आता तोच 'वॅग्नर ग्रुप' पुतीन यांच्यावरच उलटला होता.
अशा गटांमधील सैनिक भाडोत्री असतात. त्यांना निष्ठा, देशप्रेम वगैरे तत्वांशी काहीही देणेघेणे नसते. जो वेतन देईल त्याच्या आदेशाचे पालन करायचे आणि तो सांगेल त्याच्यावर बंदूक ताणायची, एवढेच त्यांना माहीत असते. त्यामुळे कालपर्यंत ज्यांच्या बाजूने लढलो त्यांच्या दिशेनेच आज बंदुका, तोफांचे तोंड वळविण्यास त्यांना क्षणमात्रही वेळ लागत नाही. भस्मासुराने दुसरे काय केले होते? ज्याने वर दिला त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्यालाच भस्मसात करायला निघाला होता! आज पुतीन एका भस्मासुराचा अनुभव घेत असल्याने अमेरिकेच्या गोटात खुशी पसरली असली, तरी भूतकाळात अमेरिकेनेही असे भस्मासूर उभे केले होते, जे पुढे अमेरिकेवरच उलटले होते. ओसामा बिन लादेन, तालिबान ही त्याची ज्वलंत उदाहरणे!
दुर्दैवाने वेळोवेळी असे अनुभव घेऊनही या महासत्ता काही शहाण्या व्हायला तयार नाहीत. 'कॅग्नर ग्रुप 'रूपी भस्मासूर तूर्त परतला असला, तरी पुतीन यांच्यावरील संकट टळलेले नाही. युक्रेनमध्ये सैन्य घुसवून पुतीन यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा जुगार खेळला होता, जो त्यांच्या अंगलट आला आहे. ते चक्रव्यूहात फसले आहेत आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही त्यांना दिसत नाही. युक्रेनमध्ये रशियाला जे काही थोडेफार यश मिळाले, ते केवळ 'वॅग्नर ग्रुपमुळे! रशियाचे सैन्य युक्रेनमध्ये पुरते अपयशी ठरले आहे. पुतीन यांनाही त्याची कल्पना आहे. त्यात यापुढे 'वॅग्नर ग्रुप'ची मदत मिळण्याची आशाही जवळपास संपली आहे. पुतीन यांना आता ना युक्रेनमध्ये निखळ विजय प्राप्त करता येत आहे, ना माघार घेता येत आहे! माघार घेतल्यास पुतीनच संपतील! थोडक्यात काय, तर भस्मासूर परतला आहे; पण पुतीन यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम आहे!