आजचा अग्रलेख: गोविंद घ्या, गोपाळ घ्या..
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 09:34 AM2023-06-27T09:34:50+5:302023-06-27T09:35:39+5:30
Team India: वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय कसोटी आणि वन डे संघाची नुकतीच घोषणा झाली. संघ जाहीर होताच टीकेची झोड उठली. अनेक दिग्गजांनी बीसीसीआयच्या निवड समितीला धारेवर धरले. एकेक खेळाडू निवडताना नेमकी काय चूक झाली, हे कळायला जागा आहे.
वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय कसोटी आणि वन डे संघाची नुकतीच घोषणा झाली. संघ जाहीर होताच टीकेची झोड उठली. अनेक दिग्गजांनी बीसीसीआयच्या निवड समितीला धारेवर धरले. एकेक खेळाडू निवडताना नेमकी काय चूक झाली, हे कळायला जागा आहे. अनेक विसंगती आहेत. निवडीची अट स्थानिक क्रिकेट की आयपीएल, याबाबत जाब विचारला जात आहे. दोन्ही मालिकांमध्ये नेतृत्व करणारा रोहित शर्मा स्वत: कामगिरीत माघारला, तरीही संघात कायम आहे. विराट फॉर्ममध्ये असला, तरी त्याची कामगिरी फारशी चांगली नाही. अनुभवी चेतेश्वर पुजाराला ‘बळीचा बकरा’ बनवल्याचा आरोप झाला. उमेश यादवला डच्चू मिळाला. स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या सरफराज खानकडे पुन्हा दुर्लक्ष झाले. पुजाराचा फॉर्म खराब आहे, असे निवड समितीला वाटत असेल तर रोहित आणि विराट यांनाही हाच नियम लागू व्हायला हवा होता. सरफराजने १००च्या सरासरीने धावा काढल्या. संघात येण्यासाठी त्याला आणखी काय करावे लागेल? तो लठ्ठ आणि बेशिस्त असल्याचे कारण दिले गेले. हे कारण पुरेसे आहे का? मग रणजी क्रिकेटला अर्थ काय? फक्त आयपीएलच्या कामगिरीवर कसोटीसाठी संघाची निवड करा आणि सांगा की रणजी क्रिकेटला काहीही अर्थ नाही. यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना चक्क कसोटी संघात स्थान देत बीसीसीआयने हा रोष ओढवून घेतला आहे.
अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचेही नाव विचारात घेतलेले दिसत नाही. न्यूझीलंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध वन डे मालिकेतून त्याला दूर ठेवल्याने आणि आता पुन्हा संधी नाकारल्याने भुवीची कसोटी आणि वन डे कारकीर्द संपलेली दिसते. कसोटीत भुवी टीम इंडियाची मोठी ताकद आहे. चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करून तो विकेट मिळवू शकतो आणि गरज पडेल तेव्हा फलंदाजीत संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी चांगली कामगिरी करू शकतो. आणखी एक वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्या नावाचादेखील वन डे संघात विचार झालेला नाही. माशी नेमकी कुठे शिंकली, हे कळायला मार्ग नाही. अर्शदीप बोर्डाची परवानगी न घेता कौंटी खेळायला गेला, असे सांगितले जाते. हनुमा विहारीची कसोटी कारकीर्द बोर्डानेच संपवली, असे म्हणायला वाव आहे. सलग संधीअभावी पृथ्वी शॉचेही असेच झाले. डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट मात्र सतत संघात स्थान टिकवून आहे. यामागे गुजरात कनेक्शन असल्याचे चाहते बोलतात. अनुभवी शमीला वगळल्याने उनाडकटला खेळण्याची संधी देण्याचा निवडीमागे विचार असावा.
लीगमधील यश कसोटी कामगिरीसाठी पुरेसे ठरत नसल्याचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या डब्ल्यूटीसी फायनलमधील पराभवामुळे स्पष्ट झाले. षट्कार-चौकारांची आतषबाजी करणारे भारतीय खेळाडू कलात्मक फटकेबाजीत माघारले. खेळातील उणिवा चव्हाट्यावर आल्या. लीगचा हा परिणाम म्हणावा लागेल. लीगमधून पैसे कमाविण्याचा खेळाडूंचा विचार असेल, तर त्यांना पैसे मिळवू द्या. मात्र, देशाकडून खेळण्याऐवजी खेळाडू लीगमध्ये खेळण्यास प्राधान्य देत असतील, तर त्यांच्यासाठी देशातील क्रिकेट संघाचे दरवाजे कायमचे बंद करून टाका, असे शेन वॉर्न म्हणाला होता. भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहून वॉर्नचे शब्द खरे होताना दिसत आहेत. मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी चांगल्या संघाची गरज असते. चांगला संघ पुढे आणण्यासाठी परिपूर्ण निवड समिती हवी असते. हंगामी प्रमुखावर निवड सोपविल्यामुळे बीसीसीआय बॅकफूटवर आली आहे.
माजी दिग्गज वीरेंद्र सेहवागने निवड समितीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला होता. भारतीय संघात शंभरपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले खेळाडू आहेत. मात्र, निवड समितीत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू न शकलेल्या व्यक्तीचा समावेश असल्याचे सेहवाग म्हणाला होता. याच समितीत ५० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला एकही खेळाडू नाही. बीसीसीआयला दिग्गज खेळाडू समितीसाठी मिळत नाहीत का? ते मिळू शकतात; पण कमी वेतन हे प्रमुख कारण आहे. अध्यक्षांना एक कोटी तर सदस्यांना ९० लाख वार्षिक वेतन ठरले आहे. यापेक्षा बक्कळ रक्कम समालोचन, सपोर्ट स्टाफ किंवा स्तंभलेखनाद्वारे मिळत असल्याने दिग्गजांना बोर्डाची नोकरी नकोशी वाटते. निवड समितीवर बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांचे दडपण असेल तर ते तरी योग्य संघ कसा निवडतील? वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी झालेली निवड याच विसंगतीचा भाग असावा, असे म्हणायला हरकत नाही.