आजचा अग्रलेख: दिशाचे भोग संपतील?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 03:06 PM2022-11-25T15:06:26+5:302022-11-25T15:07:46+5:30
Disha Salian:
जिवंतपणी माणसाच्या नशिबी भोग असतात. पण काही व्यक्तींच्या प्राक्तनात मृत्यूनंतरही भोग असतात. दिशा सॅलियन या जेमतेम २८ वर्षांच्या कर्तृत्ववान व संघर्षशील तरुणीबाबत हेच म्हणावे लागेल. सुशांतसिंह राजपुत या उभारी घेत असलेल्या अभिनेत्याचा मृत्यू झाला आणि त्याचा खून की आत्महत्या यावरून दोन वर्षांपूर्वी म्हणजे कोरोना घरोघरी मृत्यूचे तांडव करीत होता तेव्हा गदारोळ सुरू झाला. सुशांतसिंह यांच्या मृत्यूच्या पाच दिवस अगोदर त्याची मॅनेजर राहिलेल्या दिशाचा मालाड येथील तिच्या राहत्या घरातून १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. दिशाचा मृत्यू हा सुशांतसिंह याच्याशी जोडला गेला. सध्या श्रद्धा वालकर या तरुणीच्या निर्घृण हत्येमुळे विचलित झालेल्या समाजमनाला तूर्त जसे रकानेच्या रकाने बातम्या व ब्रेकिंगवर ब्रेकिंग न्यूज देऊन अधिक विव्हल केले जात आहे तसेच ते दिशा व सुशांतसिंह यांच्याबाबत त्यावेळी झाले होते.
दिशाच्या मृत्यूच्या रात्री झालेल्या पार्टीत राज्य मंत्रिमंडळातील तत्कालीन तरुण मंत्री आदित्य ठाकरे हे हजर होते. दिशावर त्या पार्टीत अत्याचार झाले. तिने आपल्यावरील ही आपबिती सुशांतसिंहला सांगितली व इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. सुशांतसिंह हा दिशाच्या बाजूने उभा राहील या भीतीपोटी त्याचाही सुफडा साफ केला गेला, असे नॅरेटिव्ह राजकीय पटकथाकारांनी रंगवले. नारायण राणे, त्यांचे पुत्र नितेश यांनी पत्रकार परिषदा घेऊन दिशाचा खून झाल्याचे दावे केले. विधिमंडळात आदित्य यांना लक्ष्य केले. भाजपच्या नेत्यांनीही मग तोंडसुख घेतले. आदित्य यांच्या लाइफस्टाइलबद्दल चर्चा सुरू करण्यात आली. दिशाच्या आईच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते. ती आरोप करणाऱ्या नेत्यांना, माध्यमांना विनंती करीत होती की, माझ्या मुलीची बदनामी थांबवा, आम्ही सामान्य लोक आहोत व आम्हाला वादविवादात खेचू नका, माझ्या मुलीचे चारित्र्यहनन थांबवा. परंतु कुणी ऐकून घ्यायला तयार नव्हते. मर्डर, ड्रग्ज, सेक्स असा तडका असलेली ही स्टोरी कुठल्याही क्राइम थ्रीलरपेक्षा जास्त सनसनीखेच होती.
मृत्यूनंतर दिशाचे वस्त्रहरण सुरू होते. तिच्यावर न झालेला बलात्कार लादला जात होता. तिला संशयाच्या भोवऱ्यात गरागरा फिरवले जात होते. आता सीबीआयने खुलासा केला की, दिशाचा मृत्यू केवळ अपघात होता. मद्यपान करून ती तोल जाऊन पडली. तिच्यावर अत्याचार झाला नाही. सुशांतसिंह व दिशा यांच्या मृत्यूमध्ये कुठलाही अन्योन्य संबंध नाही. सीबीआयच्या दाव्यानंतर पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले आहे. आदित्य यांनी यावर दिलेली प्रतिक्रिया संयत आहे. मात्र संजय राऊत व अन्य काही नेत्यांनी तिखट शब्दात समाचार घेतला आहे. नितेश राणे हे आजही आपल्या दाव्यावर ठाम असून, घटनेनंतर तब्बल ७२ दिवसांनंतर सीबीआयने चौकशी सुरू केल्यामुळे दरम्यानच्या काळात महत्त्वाचे पुरावे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने नष्ट केले, असे तुणतुणे नितेश वाजवत आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गाजलेले आणखी एक प्रकरण म्हणजे अभिनेता शाहरूख खानचा पुत्र आर्यन खान याचे क्रुझवरील कथित ड्रग्ज सेवन. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली तेव्हा आर्यन यालाही क्लीन चिट दिली गेली. मृत्यूनंतर दिशाची बदनामी झाली. आपले कसे लचके तोडले गेले हे पाहायला ती बिच्चारी हजर नव्हती. मात्र आर्यन हा तरुण मुलगा आपल्या करिअरची, भवितव्याची स्वप्ने पाहत असताना त्याच्यावर ड्रग्ज सेवनाचे व पुरवठ्याचे आरोप झाले. त्याच्या खासगी जीवनाची अक्षरश: पिसे काढली गेली. हाती काहीच लागले नाही. आर्यनच्या मनावर नक्कीच त्यामुळे आघात झाले असतील. काही वर्षांपूर्वी दिल्लीतील अल्पवयीन तरुणी आरुषी हिच्या हत्येबाबतही असा कोलाहल झाला होता. तिच्याही नशिबी चारित्र्यहननाचे भोग आले होते. सोशल मीडिया, टीव्ही व मुद्रित माध्यमे यांची मदत घेऊन आपल्या राजकीय विरोधकांबाबत नॅरेटीव्ह सेट करणे, जनमानसात त्यांची प्रतिमा खराब करणे हे खेळ गेल्या सहा-सात वर्षांत सुरू झाले आहेत. विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे गलिच्छ राजकारण सुरू आहे. दिशा, सुशांतसिंह, आर्यन वगैरे या खेळातील प्यादी होती. सीबीआयच्या निष्कर्षानंतर दिशाच्या प्रारब्धातील भोग संपतील, अशी आशा करुया. दिशाच्या चारित्र्यावर चिखलफेक करणारे नेते माफी मागतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.