आजचा अग्रलेख : डोनाल्ड ट्रम्प येती घरा..!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 03:16 AM2020-02-21T03:16:38+5:302020-02-21T03:18:06+5:30
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात आले, तेव्हाही आपण असाच प्रचंड
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील आठवड्यात भारतात दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी येत असून, त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. ते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला जाणार असून, तिथे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या स्वागताला लाखो लोक जमणार आहेत. विमानतळावरून ते दोघे ज्या स्टेडियमवर जाणार आहेत, तेथील रस्ते स्वच्छ करणे, त्यांची रंगरंगोटी करणे, तेथील झोपड्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दिसू नयेत, यासाठी भिंती बांधणे हे काम अतिशय वेगाने सुरू आहे. अमेरिकेसारख्या आर्थिक आणि संरक्षणदृष्ट्या सर्वात मोठ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत दिमाखदार असावे, यात काहीच गैर नाही. याआधी चीन, रशिया आदी देशांच्या प्रमुखांचे स्वागतही भारतात याच प्रकारे करण्यात आले होते.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात आले, तेव्हाही आपण असाच प्रचंड उत्साह दाखविला होता. आलेल्या पाहुण्यांची सरबराई करण्यात आपण घरीही कुठे कमी पडत नाही. त्यामुळे देशाच्या दौºयावर येणाºया राष्ट्रप्रमुखाच्या स्वागतातही कमतरता राहणार नाही, याची काळजी आपले सरकार घेत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्या स्वागतासाठी भारतीय कसे उत्सुक आहेत, याचा व्हिडीओच तयार केला असून, तो विविध वृत्तवाहिन्यांवरून दाखविला जात आहे. स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनाही या दौºयाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. याच वर्षी अमेरिकेत निवडणुका होणार आहेत. तेथील भारतीयांचे त्यात साह्य मिळावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण या दौºयात भारताशी व्यापारविषयक कोणतेही करार होणार नाहीत, ते कदाचित अमेरिकेतील निवडणुकीनंतर केले जातील, असे त्यांनी स्पष्टच केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपणास आवडतात, पण अमेरिकेला भारत चांगली वागणूक देत नाहीत, असेही त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखविले आहे. अमेरिकन वस्तूंवर लावण्यात येणाºया आयात शुल्काच्या संदर्भात त्यांचे हे विधान आहे. ट्रम्प यांच्या या विधानानंतर भारत सरकारनेही आम्हाला करारांची घाई नाही आणि आम्ही आमच्या हितांना अधिक प्राधान्य देतो, असे जाहीर केले आहे.
अमेरिकेच्या व्हिसा धोरणाचा भारतीयांना फटका बसत असल्याने त्याविषयीही आपले अनेक आक्षेप आहेतच. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या दौºयातून फार काही निष्पन्न होणार नाही, असाच याचा अर्थ निघू शकतो. मुळात आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणताही देश कोणाचाही कायमस्वरूपी मित्र वा शत्रू असत नाही. प्रत्येक देश आपल्या हितांचे रक्षण कसे होईल, स्वार्थ कसा साधला जाईल, हेच पाहतो. त्यात गैर नाही. मोदी व ट्रम्प वा मोदी आणि बराक ओबामा हे चांगले मित्र असले तरी परराष्ट्र धोरणावर, दोन देशांच्या संबंधांवर त्याचा कधीच परिणाम होत नाही. अमेरिका, चीन, रशिया हे सारे देश भारताकडे मोठी व सधन बाजारपेठ म्हणूनच पाहतात. त्यामुळे आता अमेरिकेला भारताशी मैत्री हवी आहे. दुसरीकडे चीनशी, इराणशी संबंध भारताने तोडावेत, असाही अमेरिकेचा प्रयत्न आहे. पण भारत-पाकिस्तान यांच्यातील १९७१च्या युद्धात अमेरिका व चीन पाकिस्तानच्या बाजूने होते आणि रशिया (तेव्हा सोव्हिएत युनियन) आपल्या मदतीला आला होता. आता मात्र अमेरिका पाकिस्तानविरोधी भूमिका घेत आहे. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर तर आंतरराष्ट्रीय राजकारणच बदलून गेले. पुढे भारताने आर्थिक उदारीकरणाची घेतलेली प्रक्रिया अमेरिकेला सोयीची होती. चीन आजही पाकिस्तानच्या बाजूने उभा असला तरी त्याला भारताची बाजारपेठही हवी आहे आणि पाकिस्तानमार्फतही आपला स्वार्थ साधायचा आहे. श्रीलंका, नेपाळ या शेजाऱ्यांना आपल्या बाजूने खेचण्यात चीनला यश मिळत आहे. चीनचा हा सामरिक डाव भारत, अमेरिका, जपान सर्वांनाच खटकणारा असला तरी ते काहीच करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात, ट्रम्प यांच्या दौºयाचा आपणास मोठा फायदा मिळणार नसला तरी या मैत्रीपूर्ण संबंधांचा उपयोग भारताला भविष्यात होऊ शकतो. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीने हुरळून जाण्याचे कारण नाही.
अमेरिकेला भारत चांगली वागणूक देत नाही, अशी तक्रार करणारे ट्रम्प तरीही भारतात येतात आणि आमच्या हितांना आम्ही अधिक प्राधान्य देतो, असे भारत सरकार जाहीर करते, याचा अर्थच त्यांच्या दौºयातून संबंध सुधारण्यापलीकडे फार काही अपेक्षित नाही.