आजचा अग्रलेख: बेजबाबदारीचा 'स्फोट'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 11:48 AM2024-06-15T11:48:00+5:302024-06-15T11:48:31+5:30

Nagpur Blast News: नागपूर शहराच्या अवतीभोवती कारखान्यांमध्ये हाताळली जाणारी स्फोटके, तिथे वापरला जाणारा दारूगोळा शोभेचा नाही तर अगदी लष्करात किंवा खाणींमध्ये वापरला जाणारा असून, तो तिथे काम करणाऱ्या गोरगरीब मजुरांसाठी जीवघेणा ठरत आहे.

Today's Editorial: 'Explosion' of irresponsibility | आजचा अग्रलेख: बेजबाबदारीचा 'स्फोट'

आजचा अग्रलेख: बेजबाबदारीचा 'स्फोट'

संपूर्ण देशाला उत्सवासाठी, आनंद साजरा करण्यासाठी फटाके पुरविणाऱ्या तमिळनाडूतील 'शिवकाशी'तून नित्यनेमाने अपघाताच्या बातम्या येतात. शोभेची दारू हाताळताना, फटाके तयार करताना स्फोट होऊन मजूर ठार झाल्याच्या त्या बातम्या चार-दोन दिवस चर्चेत राहतात. नंतर सगळे विसरून जातात. असेच काहीसे प्रकार महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात घड्डू लागले आहेत आणि ते 'शिवकाशी'पेक्षा गंभीर आहेत. कारण, फटाक्यांवर बंदी, पर्यावरणपूरक फटाके आदी कारणांनी अपघातांवर आळा घालण्याआधीच शिवकाशीच्या फटाका उद्योगावर अवकळा आली आहे. नागपूरचे तसे नाही. या शहराच्या अवतीभोवती कारखान्यांमध्ये हाताळली जाणारी स्फोटके, तिथे वापरला जाणारा दारूगोळा शोभेचा नाही तर अगदी लष्करात किंवा खाणींमध्ये वापरला जाणारा असून, तो तिथे काम करणाऱ्या गोरगरीब मजुरांसाठी जीवघेणा ठरत आहे.

गेल्या डिसेंबरमध्ये नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सोलार इंडस्ट्रीज या लष्करासाठी स्फोटके व शस्त्रास्त्रे उत्पादने करणाऱ्या कारखान्यात स्फोट होऊन नऊ कामगारांच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या होत्या. इतक्या की त्यांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणीचा पर्याय हाताळावा लागला होता. त्या घटनेला सहा महिने पूर्ण होण्याआधीच गुरूवारी हिंगणा एमआयडीसीत चामुंडी एक्सप्लोसिव्ह कारखान्यात स्फोटकांचा चुरा म्हणजे दारू वापरून वाती बनवित असताना तसाच स्फोट झाला आणि त्यात सहा बळी गेले. मृतांमध्ये धामना गावातील पाच महिलांचा समावेश आहे. आणखी तीन मजूर अत्यावस्थ आहेत. 'सोलार 'प्रमाणेच हा स्फोट इतका भीषण होता की, जिथे हे काम सुरू होते ती इमारत तर खिळखिळी झालीच, बाहेरची झाडेही होरपळली, परिसर काळा पडला. चामुंडी कारखान्यात इतका हलगर्जीपणा  होता की, , पाचशे किलो वजनाची स्फोटके सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता हाताळली जात होती. पोलिसांनी त्या कारणाने आता गुन्हे दाखल करून कारखान्याचा मालक जय शिवशंकर खेमका व व्यवस्थापक सागर देशमुख या दोघांना अटक केली आहे. यानिमित्ताने आरोग्य यंत्रणेची दुरवस्था देखील चव्हाट्यावर आली. अपघातात होरपळून निघालेले जखमी जिवाच्या आकांताने आक्रोश करीत असताना बारा-पंधरा किलोमीटरवर पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकेला दीड तास लागला. भाजलेल्या रुग्णांवर उपचारासाठी नागपूरच्या मोठ्या इस्पितळांत पुरेशा सोयी नाहीत. त्यामुळे खासगी इस्पितळांची मदत घ्यावी लागली. १९६२ च्या चीन युद्धानंतर देशाचा मध्यवर्ती टापू म्हणून नुकताच महाराष्ट्रात सामील झालेल्या विदर्भात लष्कराला लागणारा दारूगोळा व अन्य स्फोटके साहित्याच्या निर्मितीचे उद्योग उभारण्यात आले. भंडारा, अंबाझरी, भद्रावती व पुलगाव येथील दारूगोळा कारखाना त्याच दृष्टिकोनाची उदाहरणे आहेत. सरकारी कारखान्यांमुळे उपलब्ध होणारे कुशल मनुष्यबळ, तज्ज्ञ वगैरे कारणांनी स्फोटकांचे छोटेमोठे उद्योग उभे राहिले. काही टिकले, काही बंद पडले. विदर्भात कोळसा, मँगेनीज आदी खनिजांचे साठे असल्याने, खाणकामासाठी स्फोटके लागत असल्याने या उद्योगांची गरजही मोठी आहे.

सध्या नागपूर व परिसरात असे विविध प्रकारची स्फोटके तयार करणारे डझनभर खासगी कारखाने आहेत. मागास भागात कमी मोबदल्यात उपलब्ध होणारे मजूर हेदेखील या भरभराटीचे महत्त्वाचे कारण आहे. जिथे हे कारखाने आहेत तिथल्या खेड्यापाड्यातील अशिक्षित मजूर, विशेषतः महिला जिवावर उदार होऊन हे जोखमीचे काम कमी मजुरीत करतात. त्यातून त्यांची कुटुंबे चालत असली तरी अपघात झाला की, ती कायमची उद्ध्वस्त होतात. अर्थात काही कारखाने किमान मजुरीचे कायदे पाळतात. योग्य तो मोबदला देतात. काहींनी आजूबाजूच्या गावांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अशा कारखान्यांपैकी काहींनी तर अलीकडच्या काळात भारतीय लष्करासाठी आयात कराव्या लागणाऱ्या स्फोटक आयुधांच्या निर्मितीत आघाडी घेतली आहे. तिथून निर्यात देखील होते. एकंदरीतच हा उद्योग विदर्भात भरभराटीला आला आहे. त्याच कारणाने स्फोटकांची साठवणूक व हाताळणी यांच्या संदर्भात या कारखान्यांवर नियंत्रण ठेवणारे सरकारी कार्यालय देखील नागपुरात आहे. औद्योगिक सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे राज्य सरकारचे अधिकारीही नागपुरात बसतात. तरी देखील इतका हलगर्जीपणा होत असेल तर कोणाला तरी त्यासाठी जबाबदार धरणे आवश्यक आहे. अपघात घडला की तेवढ्यापुरता लोकांनी व नेत्यांनी आक्रोश करणे, मृत व जखमींना सरकारी मदत देऊन सरकारने हात झटकणे तातडीने थांबायला हवे.

Web Title: Today's Editorial: 'Explosion' of irresponsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.