आजचा अग्रलेख: ‘तो’ पुन्हा आलाय! विराट कोहलीने प्रतिस्पर्ध्यांना दिलाय इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 10:46 AM2023-09-13T10:46:27+5:302023-09-13T10:48:39+5:30

Virat Kohli : एकेकाळी म्हटले जायचे, क्रिकेटमध्ये इतर अनेक विक्रम मोडले जातील; पण, सचिनचे विक्रम मोडणे कोणाला शक्य होणार नाही. पण, कोहलीने ते खोटे ठरवले. ज्याचा आदर्श बाळगत क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले, त्याच दिग्गजाच्या नावावरील विक्रम मोडताना कोहली खऱ्या अर्थाने ‘विराट’ ठरला.

Today's Editorial: 'It' is back! Virat Kohli has given a warning to his opponents | आजचा अग्रलेख: ‘तो’ पुन्हा आलाय! विराट कोहलीने प्रतिस्पर्ध्यांना दिलाय इशारा

आजचा अग्रलेख: ‘तो’ पुन्हा आलाय! विराट कोहलीने प्रतिस्पर्ध्यांना दिलाय इशारा

googlenewsNext

सचिन तेंडुलकरने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याचा वारसदार म्हणून विराट कोहलीकडे पाहिले गेले. कोहलीनेही आपल्यावरील हा विश्वास सार्थ ठरविताना वर्षानुवर्षे भारतीय संघाच्या अनेक विजयांमध्ये मोलाची भूमिका निभावली. अनेक विक्रमांची माळ गुंफताना सचिनच्याच नावावर असलेले विक्रम मोडण्याचा सपाटा लावला. एकेकाळी म्हटले जायचे, क्रिकेटमध्ये इतर अनेक विक्रम मोडले जातील; पण, सचिनचे विक्रम मोडणे कोणाला शक्य होणार नाही. पण, कोहलीने ते खोटे ठरवले. ज्याचा आदर्श बाळगत क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले, त्याच दिग्गजाच्या नावावरील विक्रम मोडताना कोहली खऱ्या अर्थाने ‘विराट’ ठरला. कोहलीला अद्याप सचिनचे अनेक विक्रम मोडायचे असले, तरी तो त्या रस्त्यावर आहे.

जिद्द काय असते हे कोणाला पटवून सांगायचे असेल, तर त्या व्यक्तीला कोहलीचे उदाहरण द्यावे. कितीही मोठे अपयश येऊ द्या; क्षमतेवर विश्वास असेल, तर कोणताही अडथळा आपण यशस्वीपणे पार करू शकतो हे कोहलीच्या कामगिरीवरून दिसून येईल. नुकतीच मिसरूड फुटलेली असताना आणि दिल्लीकडून रणजी सामना खेळत असताना वडिलांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतरही कोहलीने आपल्या संघाला प्राधान्य देत यशस्वी खेळी केली. इथेच कोहलीचा दर्जा दिसून आला होता. यानंतर त्याने भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून दिल्यानंतर भारतीय संघातून आणि नंतर आयपीएलमधून आपली क्षमता संपूर्ण क्रिकेटविश्वाला दाखवून दिली. दडपणात भलेभले खेळाडू कच खाताना सर्वांनी पाहिले आहे; पण, कोहली दडपणामध्येच बहरतो. धावांचा पाठलाग करताना त्याने राखलेल्या कमालीच्या सातत्याने हेच सिद्ध होते. ९०च्या दशकापासून ते सचिनच्या निवृत्तीपर्यंत भारताच्या प्रत्येक सामन्यात सर्वांची मदार सचिनवरच असायची. सचिनच्या खेळीनुसार भारतीय संघाच्या यशापयशाचा अंदाज लावला जायचा. आजही हीच परिस्थिती कायम आहे, फक्त सचिनच्या जागी विराट कोहली आहे. सामना कोणताही असो, कोणत्याही संघाविरुद्ध असो, कोहलीकडून शतकाचीच अपेक्षा होते. त्याने अद्भुत अशा सातत्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगाने धावांचे इमले रचण्याचा विक्रम नोंदवला. सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके याबाबतीत सक्रिय फलंदाजांमध्ये तोच अव्वल आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावणाऱ्यांमध्ये सचिननंतर कोहलीचाच क्रमांक आहे.

केवळ क्रिकेटचे मैदान नाही, तर मार्केटिंग आणि जाहिरात क्षेत्रातही कोहलीने मोठी झेप घेतली. जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेटपटू म्हणून नावाजलेल्या कोहलीने सोशल मीडियामध्ये थेट रोनाल्डो, मेस्सी अशा दिग्गज खेळाडूंना टक्कर दिली. क्रिकेटमधील सर्वांत ‘ग्लॅमरस’ चेहरा म्हणून कोहलीने स्वत:ची ओळख निर्माण केली. त्याच्या वाट्याला टीकाही आलीच! फलंदाज म्हणून अनेक विक्रम रचले असले, तरी कर्णधार म्हणून एकही आयसीसी स्पर्धा जिंकू न शकल्याने कोहलीला बोल लावला जातोच.  यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर कधी ना कधी खाली उतरावेच लागते; पण, या स्थानावरून उतरताना घसरण होता कामा नये याची दक्षता कोहलीने घेतली.  कोहलीने नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी शतक झळकाविल्यानंतर सुमारे तीन वर्षे त्याच्या बॅटमधून शतक निघाले नव्हते. कोहलीवर टीका झाली, कोहली संपला.. अशा वावड्याही उठल्या.  विशेष म्हणजे यादरम्यान सर्वाधिक धावा काढणाऱ्या भारतीयांमध्ये अव्वल स्थानी कोहलीच होता. मात्र, तरीही कोहलीवर टीका होत राहिली; कारण,  क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात त्याला आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आले नव्हते.  

सप्टेंबर २०२२ मध्ये आशिया चषकात कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० शतक झळकावले. २०१९ नंतरचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावल्याचा आनंद व्यक्त करतानाच कोहली निश्चिंतही झाला. कारण, त्याला लय सापडली होती.  बराच वेळ शांत राहिलेला वाघ जणू जागा झाला होता. या शतकानंतर कोहलीने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटही गाजवले आणि या एका वर्षाच्या कालावधीत तब्बल सात शतके ठोकली. कोहलीचा फॉर्म कधीच हरपला नव्हता. त्याच्याकडून केवळ मोठी खेळी होणे गरजेचे होते आणि ती उशिराने का होईना, पण झाली. आता हा वाघ थांबणार नसून पुन्हा एकदा हुकमत गाजवण्यास सज्ज झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या आशिया चषकातील तुफानी फटकेबाजीने त्याने एक प्रकारे सर्व प्रतिस्पर्धी संघांना इशाराच दिला आहे आणि  क्रिकेटविश्वात चर्चा सुरू झाली आहे की, ‘तो परतलाय!’

Web Title: Today's Editorial: 'It' is back! Virat Kohli has given a warning to his opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.