आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 07:07 AM2024-11-16T07:07:21+5:302024-11-16T07:07:49+5:30

महायुती व महाविकास आघाडीच्या प्रचाराची ही एकंदरित दिशा मतदारांना किती भावते, कोणाला काैल मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

Todays editorial Maharashtra assembly vidhan sabha election 2024 campaign | आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?

आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?

सहा प्रमुख पक्षांची दोन आघाड्यांमध्ये विभागणी, त्यातून निर्माण झालेले महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा थेट लढतींचे चित्र, बऱ्याच ठिकाणी बंडखोर अपक्षांनी व काही ठिकाणी अन्य पक्षांनी उभे केलेले आव्हान अशा टप्प्यावर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार येऊन ठेपला आहे. मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्रात राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात आहे. राज्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि युवराज संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू आदींच्या परिवर्तन महाशक्तीकडून लढती तिरंगी व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बहुजन समाज पक्ष स्वतंत्रपणे लढतो आहे. तथापि, महायुतीमहाविकास आघाडीतील बंडखोरांनी अनेक जागांवर उभे केलेले आव्हान हा या निवडणुकीचा ‘एक्स फॅक्टर’ आहे.

दोन्ही फळ्यांमधील मित्रपक्षांनीही एकमेकांविरोधात काही ठिकाणी दंड थोपटले आहेत. त्यामुळे युतीधर्माचे, आघाडी धर्माचे पालन करण्याच्या शपथा घातल्या जात आहेत. एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या जात आहेत. यापैकी सर्वाधिक लक्षवेधी गुंता मुंबईतील माहीमचा आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित तिथे नशीब आजमावत आहेत. राज यांनी लोकसभेवेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तिची परतफेड व्हायला हवी, असे अनेकांचे मत आहे. शिंदेसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्या माघारीसाठी अयशस्वी प्रयत्न झाले. परिणामी, भाजप काय भूमिका घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीधर्माचे पालन करण्याची, सरवणकरांच्याच प्रचाराची भूमिका घेतली आहे. आता प्रचाराचे अखेरचे तीन दिवस शिल्लक आहेत. देशपातळीवरील झाडून सारे नेते, त्यांचे राज्यामधील शिलेदार मतदारसंघातील गल्लीबोळ, गावे-वाड्या-वस्त्या पिंजून काढत आहेत. महिला, तरुण, शेतकरी या समाजघटकांची तसेच शहरी भागातील मध्यमवर्गीयांची मने जिंकण्याचा प्रयत्न दोन्हीकडून सुरू आहे. अशावेळी गेल्या पंधरा दिवसांतील प्रचाराचे मुद्दे आणि त्यांना मतदारांनी दिलेला प्रतिसाद, नेत्यांची विधाने, त्यावरून निर्माण झालेले वादंग, युती व आघाडीचा धर्म या सगळ्याची गोळाबेरीज लक्षणीय, वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराष्ट्रासोबत झारखंडची देखील विधानसभा निवडणूक होतेय. दोन्हीकडच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचे एक समान सूत्र दिसते. झारखंडमध्ये बांगलादेशी घुसखोर व त्यांनी माजविलेला कथित उत्पात प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडी अल्पसंख्याकांचे कसे लांगूलचालन करीत आहे, त्याला हिंदुत्ववादी पृष्ठभूमी असलेल्या उद्धवसेनेची कशी साथ आहे, हे मतदारांच्या मनावर बिंबविण्याचा हा प्रयत्न आहे.

भाजपचे स्टार प्रचारक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एरव्ही व्हाॅट्सॲपवर व्हायरल असणारे ‘बटेंगे तो कटेंगे’ हे आवाहन प्रचारात आणले. त्याला सुरुवातीला थोडा प्रतिसादही मिळाला. त्यानंतर स्वत: पंतप्रधानांच्या भाषणातून ‘एक है तो सेफ है’ असा नवा वाक्प्रचार पुढे आला. दोन्हींचा मथितार्थ एकच. या घोषणा किंवा काश्मीरमधील ३७० कलम हटविण्यात काँग्रेसची आडकाठी, काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली तर ते कलम पुन्हा लागू होण्याची भीती, औरंगजेबाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीला घेरणे, हे सारे प्रयत्न ध्रुवीकरणासाठी आहेत हे लपून राहिलेले नाही. तथापि, भाजपचे नेते असे राष्ट्रीय मुद्दे प्रचारात आणत असताना महायुतीमधील अजित पवारांनी सर्वप्रथम हे महाराष्ट्रात चालणार नाही, असे म्हटले. त्यानंतर पंकजा मुंडे, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील या भाजप नेत्यांनीही या दोन्ही घोषणांची गरज नसल्याचा सूर आळवला. वरवर हे मतभेद वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे नाही. कारण महायुतीचे स्थानिक नेते लाडकी बहीण किंवा अन्य लाभाच्या योजनांवर भर देत आहेत. लाभार्थ्यांच्या मतपेढीचा असा प्रयोग उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात यशस्वी झाला आहे.

महाराष्ट्रातही तो चालेल आणि लोकसभा निवडणुकीतील पिछाडी त्यामुळे भरून निघेल, असे या नेत्यांना वाटत असावे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते राहुल गांधी किंवा ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा प्रचार राज्यघटना, जातगणना, आरक्षण या राष्ट्रीय मुद्द्यांसोबतच महाराष्ट्राची अस्मिता, गुजरातमध्ये गेलेले रोजगार, त्यामुळे गमावलेल्या रोजगाराच्या संधी किंवा गेल्या आठवडाभरातील सोयाबीन, कापसाच्या भावातील घसरण अशा स्थानिक मुद्द्यांवर बेतलेला आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या प्रचाराची ही एकंदरित दिशा मतदारांना किती भावते, कोणाला काैल मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

Web Title: Todays editorial Maharashtra assembly vidhan sabha election 2024 campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.