आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 08:43 AM2024-11-15T08:43:51+5:302024-11-15T08:44:24+5:30
अमित ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार तर आहेच, तसा शिंदेसेनेचाही उमेदवार आहे; पण उद्धव यांनी विरोधात उमेदवार उभा केला, याची सल राज यांना अधिक दिसते.
उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी अवघ्या मराठी माणसांची एकेकाळी इच्छा होती! राज ठाकरेंनाउद्धव ठाकरे टाळी देणार का, अशा बातम्या तेव्हा मोठ्या चर्चेत असत. नंतर हा विषय बराच मागे पडलेला असताना अचानक ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी तसे विधान केल्यानंतर सर्वदूर पडसाद उमटले. “जगातले दुश्मन एकत्र येतात, मग आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवीच. मी आणि उद्धव एकत्र येऊ नये, यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत,” असे म्हणतानाच उद्धव ठाकरेंना भावापेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी जवळचे वाटतात, असेही राज या मुलाखतीत म्हणाले आहेत. ऐन निवडणुकीत राज यांनी हे म्हणणे हा योगायोग नाही. माहीममध्ये ‘राज’पुत्र अमित ठाकरेंच्या विरोधात ठाकरे गटाने उमेदवार दिल्याने ठाकरे बंधूंमधील तणाव वाढला.
अमित आणि शर्मिला ठाकरेंनी थेट उद्धव यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज ठाकरेंनी हात पुढे करणे यामागचे ‘टायमिंग’ लक्षात घ्यायला हवे. थोडे मागे जायला हवे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या नवजात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तेरा जागा मिळणे हा विक्रम होता. २००६ मध्ये राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली, तेव्हाचा काळच वेगळा होता. शिवसेना सोडून राज बाहेर पडले, तेव्हा त्यांच्याविषयी अनेकांना आस्था, सहानुभूती होती. बाळासाहेबांचा खरा वारसदार राजच आहे, असे सामान्य माणसालाही वाटत होते आणि त्या तुलनेत उद्धव अगदीच निष्प्रभ भासत होते. केवळ मुलगा असल्याने उद्धव यांना बाळासाहेबांनी संधी दिली, प्रत्यक्षात तो अधिकार राज यांचा आहे, अशीच सार्वत्रिक भावना तेव्हा होती. ‘राज विरुद्ध उद्धव’ असा सामना सुरू होता, तेव्हा राज तिशीत होते. त्यांचा करिश्मा असा होता की, शिवसेना सोडून लोक मनसेत येऊ लागले. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न राज दाखवत होते. महाराष्ट्राचे तेव्हाचे राजकारण फार काही ‘हॅपनिंग’चे नव्हते. तेच चेहरे आणि तेच मुद्दे असलेल्या त्या काळात राज यांनी असा झंझावात तयार केला की, आता मनसे हीच खरी शिवसेना ठरेल, असे आडाखे काही पत्रपंडितांचेही होते. गेल्या पंधरा वर्षांत पुलाखालून खूप पाणी वाहून गेले. आज उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत. ‘क्राउडपुलर’ वक्ते आहेत. ठाकरे घराण्यात पहिल्यांदाच थेट सत्तेत जाऊन त्यांनी मुख्यमंत्रिपद मिळवले आणि ते गमावल्यानंतर व्यापक जनाधार त्यांच्या सोबतीला आला. याउलट राज ठाकरे मात्र चाचपडत आहेत. वर्ष २०१९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज गेले आणि मोदी-शाह यांच्या विरोधात उभे ठाकले, तेव्हा उद्धव मात्र भाजपसोबत होते. लोकसभा आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीतही उद्धव भाजपसोबत होते. विधानसभा निवडणूक निकालानंतर मात्र सगळेच बदलले.
बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर उद्धव एकाकी पडतील, असे वाटत असतानाच २०१४ च्या निवडणुकीत उद्धव यांनी चमकदार यश मिळवीत स्वतःची ताकद दाखवली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर तर उद्धव हे वेगळ्याच उंचीचे नेते म्हणून समोर आले. याउलट राज यांचे झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी-शाह यांना राजकीय रिंगणातून हद्दपार करा, असे सांगणारे राज विधानसभेला चूप बसले. मग भगव्या अवतारात भोंगे बंद करू लागले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा, तर विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार! यावेळी राज स्वतंत्रपणे निवडणूक लढवताहेत, ‘मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि या सत्तेत मनसे असेल’, असेही सांगताहेत! अमित ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार तर आहेच, तसा शिंदेसेनेचाही उमेदवार आहे; पण उद्धव यांनी विरोधात उमेदवार उभा केला, याची सल राज यांना अधिक दिसते. आदित्यच्या विरोधात आपण उमेदवार दिला नव्हता, याची आठवण ते उगाच करून देत नाहीत! मनसेच्या यावेळी किती जागा निवडून येतील, हे राज यांनाही ठाऊक आहे; मात्र अमित निवडून यावेत आणि भाजपच्या सरकारमध्ये ते मंत्री व्हावेत, अशी त्यांची इच्छा दिसते आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांची, जुन्या चाहत्यांची मते आपल्या लाडक्या लेकाला मिळावीत, यासाठी राज प्रयत्न करत आहेतच. ‘आम्ही कधीही एकत्र येऊ शकतो’, असे राज यांनी म्हणणे हा याच भावनिक आवाहनाचा भाग असू शकतो!