आजचा अग्रलेख: तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण, भारताचा मोठा विजय !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 10:18 IST2025-04-12T10:15:19+5:302025-04-12T10:18:49+5:30
Tahawwur Rana's Extradition: मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण झाले, हा भारताचा राजनैतिक विजय आहे. दहशतवादाच्या विरोधात भारत लढा देत असताना, ही घटना अत्यंत आश्वासक तर आहेच, शिवाय आता हा लढा खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय समुदायाचा झाला आहे.

आजचा अग्रलेख: तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण, भारताचा मोठा विजय !
मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण झाले, हा भारताचा राजनैतिक विजय आहे. दहशतवादाच्या विरोधात भारत लढा देत असताना, ही घटना अत्यंत आश्वासक तर आहेच, शिवाय आता हा लढा खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय समुदायाचा झाला आहे. २६ नोव्हेंबर २००८चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला जग कधीच विसरू शकणार नाही. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबई शहरावर केलेला तो भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबरदरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीत कमी १९७ जण मृत्युमुखी पडले. ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या हल्ल्याचा एक सूत्रधार असलेला तहव्वूर राणा अमेरिकेकडे होता. तो भारताला हवा होता. मात्र, अमेरिकी न्यायालयाने २०११मध्ये त्याला निर्दोष मुक्त केल्यानंतर त्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. अनेक वर्षे हा संघर्ष सुरू होता. सरकार बदलले; पण भारताने सातत्याने हा संघर्ष सुरू ठेवला. डेव्हिड कोलमन हेडलीने दिलेल्या माहितीनंतर भारताची बाजू आणखी भक्कम झाली. अखेर यश आले. पंधरा वर्षांच्या अथक संघर्षात भारताचा विजय झाला.
तहव्वूर हा पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी. मुळातला डॉक्टर. मुंबई हल्ल्याचा ‘मास्टरमाइंड’ असणाऱ्या डेव्हिड हेडलीचा तो लहानपणापासूनचा मित्र. मुंबईवरील हल्ल्याचा कट आखण्यात आणि त्यासाठी पैसा उभा करण्यातही तहव्वूर पुढे होता. हा राणा आता कॅनडाचा नागरिक आहे. कॅनडातील अनेक नागरिकांना दुहेरी नागरिकत्वाचा रस्ता पाकिस्तानने मोकळा ठेवला असला, तरी इथे मात्र हात झटकले. अर्थात, अजमल कसाबबद्दलही पाकिस्तानने सुरुवातीला अशीच भूमिका घेतली होती. आपल्या तुकाराम ओंबळे या पराक्रमी पोलिसाने कसाबला अटक करताना हौतात्म्य पत्करले. सुरुवातीला ‘कसाब आमचा नाहीच’, असे म्हणणाऱ्या पाकिस्तानने नंतर मात्र तो पाकिस्तानी नागरिक असल्याचे अधिकृतपणे मान्य केले. कसाब फासावर लटकला, तहव्वूर मात्र आपल्या ताब्यात येत नव्हता. मुंबईवरील हल्ल्याशिवाय जगभरातील अन्य दहशतवादी हल्ल्यांतही त्याचा पुढाकार होता. भारताने मात्र त्याला आपल्याकडे सोपवावे, ही मागणी लावून धरली. ‘एनआयए’ने त्याच्या विरोधात सर्वप्रथम आरोपपत्र दाखल केले ते २०११मध्ये. त्यानंतर २०१९मध्ये सर्वप्रथम राजनैतिक मार्गाने प्रत्यार्पणाचा मुद्दा मांडला गेला. त्यासाठी अमेरिकी न्यायालयांसोबत पत्रव्यवहार सुरू होता. तसे आवश्यक ते पुरावे भारताने सादर केले. सरकार कोणतेही असो, मात्र भारताने ठेवलेले सातत्य महत्त्वाचे आहे.
मुंबईवर हल्ला झाला, तेव्हा सरकार वेगळे होते. भारतीय जवानांनी तेव्हा पराक्रमाची शर्थ केली. नऊ अतिरेक्यांना यमसदनी पाठवले. अजमल कसाबला अटक करून फासावर लटकवले, तेव्हा जे सरकार होते, ते आज नाही. तेव्हाच्या सरकारने ‘एनआयए’ची स्थापना केली. आताच्या सरकारने आणखी पुढे जात तहव्वूरला भारतात येण्यास भाग पाडले आहे. २६/११च्या हल्ल्याने मुंबईचे भयंकर नुकसान केले. कित्येक माणसे गेली. काहींना कायमचे अपंगत्व आले. हेमंत करकरे, अशोक कामठे, संदीप उन्नीकृष्णन, विजय साळस्कर, शशांक शिंदे अशा कर्तबगार अधिकाऱ्यांसह महत्त्वाचे अधिकारी आणि जवान आपण गमावले. मुख्य म्हणजे, मुंबईवर भयाचे सावट पसरले. हे होत असताना, तहव्वूर राणा मात्र भारतीय भूमीवर गजाआड जात नाही, हे शल्य डाचत होते. तहव्वूर भारतात आल्याने या मृतांना आणि जखमींना न्याय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया त्यामुळेच स्वाभाविक आहे. ज्या पाकिस्तानने हे घडवले, तो त्यानंतरही स्वस्थ बसला नाही. ‘पठाणकोट’, ‘उरी’, ‘पुलवामा’च्या घटनांनी ते अधोरेखित केले.
तहव्वूरच्या निमित्ताने पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. हा खटला अमेरिकेत चालल्याने जगाने हा घटनाक्रम पाहिला. आता भारताच्या ताब्यात तो आल्याने भारताच्या भूमिकेवर तर शिक्कामोर्तब झालेच; पण पाकिस्तानला एकटे पाडणेही त्यामुळे शक्य होणार आहे. त्याच्या चौकशीतून जे तपशील मिळतील, ते अधिक महत्त्वाचे ठरतील. ‘दहशतवादविरोधी लढ्यात आम्ही भारतासोबत आहोत आणि भारताच्या ताब्यात या दहशतवाद्याला देता आले, याचा आम्हाला अभिमान वाटतो’, असे अमेरिकेने म्हणणे अतिशय महत्त्वाचे. तहव्वूरचे प्रत्यार्पण ही पाकिस्तानला सणसणीत चपराक तर आहेच; पण आंतरराष्ट्रीय पटलावरील भारताचे बळ त्यामुळे आणखी वाढले आहे.