आजचा अग्रलेख: थँक यू, डॉ. मनमोहन सिंग!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 11:32 AM2024-04-04T11:32:44+5:302024-04-04T11:33:05+5:30
Dr. Manmohan Singh: निर्दयी राजकारणाचे तडाखे सहन करताना ‘हिस्ट्री विल बी काइंडर टू मी’ असा आत्मविश्वास व्यक्त करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी तेहतीस वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीला विराम दिला आहे. राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ मंगळवारी संपुष्टात आला.
निर्दयी राजकारणाचे तडाखे सहन करताना ‘हिस्ट्री विल बी काइंडर टू मी’ असा आत्मविश्वास व्यक्त करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी तेहतीस वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीला विराम दिला आहे. राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ मंगळवारी संपुष्टात आला. यानिमित्ताने जग ज्यांना लक्ष देऊन ऐकायचे असे विद्वान अर्थतज्ज्ञ राजकारणी डॉ. सिंग यांचे देशाच्या प्रगतीमधील योगदान, वित्तमंत्री व पंतप्रधानपदाच्या काळातील वळणवाटा, खाचखळगे, त्यांचा संघर्ष व परिणाम आदींचा लेखाजोखा नव्या पिढीपुढे यायला हवा. राजकारणाला निर्दयी विशेषण यासाठी, की संयुक्त पुरोगामी आघाडीच्या पहिल्या पंचवार्षिकमधील डॉ. सिंग यांची सोनेरी कामगिरी, दुसऱ्या पंचवार्षिकमधील भ्रष्टाचाराचे आरोप, विराेधातील भारतीय जनता पक्षाचा गदारोळ आणि संपुआचे सरकार गेल्यानंतरच्या दहा वर्षांतही मनमोहन सिंग यांना हार कमी आणि प्रहारच अधिक मिळाले. ‘ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ अशी संभावना झाली. डॉ. सिंग हे शिख पंतप्रधान, एपीजे अब्दुल कलाम हे मुस्लीम राष्ट्रपती आणि सत्ताधारी आघाडीच्या प्रमुख सोनिया गांधी या जन्माने ख्रिश्चन, असा भारतातील धार्मिक विविधतेचा मिलाफ त्या काळात जगाने पाहिला.
पंतप्रधानपदाच्या अखेरच्या दिवसांत अनेकदा त्यांच्या वाट्याला अपमान आला. तेव्हा, मुळात मोजके व तोलूनमापून बोलणारे डॉ. सिंग निरोपाच्या भाषणात पहिल्यांदा स्पष्ट बोलले, की इतिहास आपल्याबद्दल अधिक दयाळू असेल. कारण, जागतिक मंदीच्या किमान दोन लाटांमध्ये भलेभले प्रगत देश गटांगळ्या खात असताना ‘पिग्मी’ म्हणून हिणवली जाणारी भारताची तोळामासा अर्थव्यवस्था टिकविण्यासाठी, देश वाचविण्यासाठी डॉ. सिंग यांनी उपसलेले कष्ट शब्दांच्या क्षमतेपलीकडचे आहेत. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटल्यानुसार डॉ. मनमोहन सिंग यांची राजकीय निवृत्ती ही एका युगाची अखेर आहे. या युगाने देशाला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, माहितीचा अधिकार, गोरगरिबांसाठी मनरेगा असे बरेच काही दिले. त्या युगाचा प्रारंभ पी. व्ही. नरसिंहराव यांनी डॉ. सिंग यांना वित्त मंत्रालय सांभाळण्यासाठी पाचारण करण्याने झाला. दहा वर्षे पंतप्रधानपद हा या युगाचा माध्यान्ह होता.
तत्पूर्वी, वित्तमंत्री असताना समाजवादी विचार, परमिटराज व नोकरशहांच्या मर्जीवर चालणारी देशाची बंदिस्त अर्थव्यवस्था त्यांनी खुली केली. उदारीकरण, खासगीकरण आले. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक परिमाण लाभले. डॉलर व युरोच्या विनिमयाचा हिशेब, शेअर मार्केट सामान्यांना समजू लागले. शेती व थोड्याफार प्रमाणात उद्योगांवर अवलंबून असलेल्या अर्थकारणाला सेवा क्षेत्राचा नवा आयाम मिळाला. त्यातून अस्थिर, स्वकेंद्रित अशा मध्यमवर्गीयांना सुखाचे दिवस आले. डॉ. सिंग मध्यमवर्गीयांचा मसीहा झाले. कित्येक वर्षे ते या वर्गाच्या गळ्यातील ताईत होते. नोकरदार मध्यमवर्गाला केवळ सुगीचे दिवसच आले असे नाही. हा वर्ग स्वप्ने पाहू लागला. त्याच्या पुढच्या पिढ्या जागतिक बनल्या. चाकोरीबाहेरचे शिक्षण घेऊन नव्या पिढीचे प्रतिनिधी जगभरात विखुरले. त्यातून नवउद्योजक उभे राहिले. हा वर्ग सांभाळणे किती कठीण असते हे दिवंगत वित्तमंत्री अरुण जेटली किंवा सध्या ते खाते सांभाळणाऱ्या निर्मला सीतारामन यांनाच माहिती असेल.
उल्लेखनीय म्हणजे डॉ. मनमोहन सिंग ही व्यक्ती त्यांच्यातील राजकारण्यापेक्षा उत्तुंग आहे. सभ्य, सज्जन, सुसंस्कृत आणि कमालीचे विनम्र असे डॉ. मनमाेहन सिंग हे ‘विद्या विनयेन शोभते’ या सुभाषिताचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. पाकिस्तानात जन्म, बालपणीच मातृछत्र हरपलेले, फाळणीच्या जखमा व वेदना अंगाखांद्यावर झेललेले, किशोरवयात भारतात स्थलांतरित झालेले आणि प्राथमिक शाळेपासून ते उच्चशिक्षणापर्यंत गुणवंत विद्यार्थी म्हणून नाव कमावलेले डॉ. मनमाेहन सिंग यांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी राहील. केंब्रिज, ऑक्सफर्ड या नामांकित विद्यापीठांनाही आपल्या या विद्वान विद्यार्थ्याचे नेहमी कौतुक वाटत राहिले. ज्ञानदानासोबतच त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघासाठी काम केले. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे सल्लागार म्हणून सुरुवात करणारे डॉ. सिंग पुढे उणीपुरी पन्नास वर्षे वेगवेगळ्या भूमिकांमध्ये जनतेसाठी काम करीत राहिले. पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे अध्यक्ष अशा स्वप्नवत उच्चपदांवर काम करतानाही मनमोहन सिंग यांनी त्यांच्यातला अभ्यासू विद्यार्थी कधी शांत बसू दिला नाही. म्हणूनच देश व जग त्यांना ऐकत राहिले. यापुढेही ऐकत राहील.