आजचा अग्रलेख: मोबाईल फेकून द्यायचा?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 11:09 AM2022-11-18T11:09:39+5:302022-11-18T11:10:41+5:30

Today's Editorial: यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बान्शी ग्रामपंचायतीने १८ वर्षांखालील मुलांकरिता मोबाईलबंदीचा ठराव मंजूर केला. मुले पब्जीसारखे गेम खेळतात व त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही म्हणून हा निर्णय घेतल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.

Today's Editorial: Throw away the mobile phone? | आजचा अग्रलेख: मोबाईल फेकून द्यायचा?

आजचा अग्रलेख: मोबाईल फेकून द्यायचा?

Next

‘दी सोशल डायलेमा’ नावाच्या माहितीपटामध्ये एक दृश्य आहे.. एक अल्पवयीन मुलगी सतत मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेली असल्याने तिला तिचा मोबाईल एका घट्ट बरणीत ठेवून तिला २४ तासांकरिता मोबाईल दुरावा सोसण्यास भाग पाडले जाते. ती मुलगी कशीबशी रात्र काढते. सकाळपासून तिला मोबाईल हातात घेण्याची इच्छा होत असते. कशीबशी ती शाळेत जाते. मात्र, शाळेतून परत आल्यानंतर तिला हा दुरावा असह्य होतो. अखेर ती मोबाईल हातात घेतेच. याची आठवण होण्याचे कारण असे की, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बान्शी ग्रामपंचायतीने १८ वर्षांखालील मुलांकरिता मोबाईलबंदीचा ठराव मंजूर केला. मुले पब्जीसारखे गेम खेळतात व त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही म्हणून हा निर्णय घेतल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. मोबाईल न वापरण्याबाबत मुुलांचे समुपदेशन पालक करणार आहेत. मात्र, त्यानंतर तरुणाईकडून मोबाईलचा वापर न थांबल्यास दंड ठोठावण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील वडगाव येथे सायंकाळी सात वाजता ग्रामपंचायत कार्यालयावरील भोंगा वाजतो. लागलीच लोक घराघरांतील टी.व्ही. बंद करतात. मोबाईल खाली ठेवतात. मुले अभ्यास करतात किंवा मैदानी खेळ खेळतात. बायका स्वयंपाक करतात, कुटुंबाशी संवाद साधतात. स्मार्ट फोनमुळे शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील लोकांचे जीवन पार बदलून टाकले आहे. मोबाईलने असून अडचण नसून खोळंबा, अशी परिस्थिती झाली आहे.

मोबाईलमुळे भौगोलिक अंतर शून्यावर आणले आहे. विदेशात असलेल्या नातलगासोबत क्षणार्धात व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधता येतो. नातलग, शाळा-महाविद्यालयातील मित्र यांच्या संपर्कात राहता येते. माणसाचे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी संबंध ही सध्याच्या काळात शक्ती आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसांसोबत जोडून घेण्यामुळे तुमच्या आर्थिक, सामाजिक, वैद्यकीय, कायदेशीर समस्या सुटण्यास मदत होते. मोबाईल आपल्यासोबत सतत असल्याचे असे आणखी अनेक लाभ आहेत. परंतु, त्याचवेळी मोबाईलमध्ये आपले गुंतत जाणे हे आपल्या मनाकरिता व शरीराकरिता हानिकारक आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप वगैरे सोशल मीडिया मोफत असल्याचे वरकरणी भासत असले तरी प्रत्यक्षात अशा साईट्सकरिता आपण सारेच विक्रीयोग्य प्रॉडक्ट आहोत. आपले आई-वडील, भाऊ-बहीण, बायको-मुले यांना आपल्या आवडीनिवडीबद्दल जेवढी माहिती नाही, तेवढी आपल्या मोबाईलमध्ये सतत डोकावण्यामुळे या कंपन्यांना आहे. आपण काय पाहतो, आपल्याला काय आवडते, आपले व्यक्तिमत्त्व कसे आहे यानुसार आपल्याला आवडते तेच दाखवले व खरेदी करण्याकरिता पुढ्यात ठेवले जाते. जादूगार जेव्हा आपल्याला एखादा पत्ता काढायला लावतो व बरोबर ओळखतो, तेव्हा आपण अवाक होतो. आपल्याला वाटते आपण आपल्या आवडीचा पत्ता काढलाय. प्रत्यक्षात आपण जादूगाराच्या आवडीचा पत्ता काढलेला असतो. तसेच सोशल मीडियाचे आहे. येथील लाईक्सची स्पर्धा अल्पवयीन पिढीला नैराश्यात ढकलत आहे. विदेशात १५ ते १९ वयोगटातील मुला-मुलींच्या आत्महत्यांमध्ये ७० टक्के, तर १० ते १४ वयोगटातील मुला-मुलींच्या आत्महत्यांमध्ये १५१ टक्के वाढ झालेली आहे. भारतातही लाईक्स किंवा ट्रोलिंगमुळे होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.

लहान वयात सोशल मीडियामुळे होणारी मैत्री, पॉर्नचे आकर्षण व त्यातून स्वत:च्या लैंगिकतेचे चित्रीकरण केल्यामुळे उद्ध्वस्त होणारी कुटुंबे तसेच मोबाईलवर लिंक पाठवून किंवा पासवर्ड मागवून आर्थिक लूटमार करण्याचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. मोबाईलचा वापर जबाबदारीने करण्याबाबतचे कुठलेही शिक्षण न देताच आपण हे तंत्रज्ञान तरुण पिढीच्या हाती दिले आहे. त्यामुळे काहीजण त्याचा विकृत वापर करीत आहेत, तर फेसबुक, युट्यूब वगैरेमुळे अनेक गुणीजनांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. बान्शी ग्रामपंचायतीचा मोबाईलबंदीचा निर्णय टोकाचा आहे. त्यापेक्षा वडगावमधील निर्णय स्वयंशिस्तीच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. एका राजकन्येचे एका दरिद्री मुलासोबत प्रेम जुळले. राजाने त्या दोघांना एकमेकापासून दूर करण्याऐवजी त्यांना एका दोरखंडाने गच्च बांधून ठेवले. काही काळ त्यांना ते सुखावह वाटले. मात्र, काही वेळानंतर ते एकमेकांना अक्षरश: मारू लागले. मोबाईलचा सक्तीचा दुरावा त्याचे प्रेम अधिक तीव्र करू शकतो. परंतु, मोबाईलचा डोळसपणे वापर करण्याकरिता स्वयंशिस्त पाळली तर हा सोशल डायलेमा चुटकीसरशी सुटू शकतो.

Web Title: Today's Editorial: Throw away the mobile phone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.