आजचा अग्रलेख: दोन वर्षे घरोब्याची कथा,नितीश कुमारांची अपेक्षित कोलांटीउडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 11:03 AM2024-01-30T11:03:39+5:302024-01-30T11:04:51+5:30

Nitish Kumar: विचारांची लढाई, वैचारिक बांधिलकी, राजकारणातील शुचिता वगैरे संज्ञा कमालीच्या पातळ झालेल्या असताना काही घडामोडी अशा घडतात की, वाटावे बस्स, संपले विचारांचे राजकारण. नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दलासोबत काडीमोड घेऊन भारतीय जनता पक्षाशी पुन्हा केलेला घरोबा हा त्यातलाच प्रकार आहे.

Today's Editorial: Two years of Gharobya Katha, Nitish Kumar's expected U Turn | आजचा अग्रलेख: दोन वर्षे घरोब्याची कथा,नितीश कुमारांची अपेक्षित कोलांटीउडी

आजचा अग्रलेख: दोन वर्षे घरोब्याची कथा,नितीश कुमारांची अपेक्षित कोलांटीउडी

विचारांची लढाई, वैचारिक बांधिलकी, राजकारणातील शुचिता वगैरे संज्ञा कमालीच्या पातळ झालेल्या असताना काही घडामोडी अशा घडतात की, वाटावे बस्स, संपले विचारांचे राजकारण. नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दलासोबत काडीमोड घेऊन भारतीय जनता पक्षाशी पुन्हा केलेला घरोबा हा त्यातलाच प्रकार आहे. पूर्वी ते प्रत्येक निवडणुकीच्या वेळी असा सवंगडी बदलायचे, आता एका पंचवार्षिक कार्यकाळातच दोनवेळा घरोबा बदलण्याचा नवा विक्रम आणि जवळपास वीस वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात नवव्यांदा शपथ घेण्याचा विक्रम त्यांनी नोंदविला आहे. ज्या राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण वगैरे विभूतींनी भारतीय राजकारण समाजवादी विचारांचे आणि वैचारिक लढाईचे, बांधिलकीचे मापदंड ठरवून दिले, त्यांच्याच शिष्यांपैकी एकाने आयुष्यात इतक्यावेळा कोलांटउड्या मारण्याचा प्रताप नोंदवावा हा त्या वारशाला मिळालेला कोणता न्याय म्हणायचा? नितीशकुमार, जॉर्ज फर्नांडिस वगैरे मंडळींनी अटलबिहारी वाजपेयींच्या काळात समता पार्टीच्या नावाने केलेले कोलांटउड्यांचे प्रयोग कदाचित आता विस्मरणात गेले असतील. पण, त्यामुळे शरद यादव वगैरेंची झालेली कोंडी पुन्हा आठवावी लागेल.

जुन्या जनता दलातून गळालेल्या इतरांना सोबत घेऊन नितीशकुमार यांनी जॉर्ज यांनाही सोडून दिले. समता पार्टी मोडीत काढली आणि जनता दल युनायटेड नावाने बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात आघाडी उघडली. त्या आघाडीने लालूंची मक्तेदारी मोडीत काढली. २००५ पासून दहा वर्षे नितीश यांचा भाजपसोबतचा संसार फुलला. पण, त्यांनी राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा कधीच दडवून ठेवल्या नाहीत. म्हणूनच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते वेगळे समीकरण मांडतात आणि निवडणूक झाली की ते मोडून टाकतात. २०१३ मध्ये नरेंद्र मोदी हे भाजपचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरताच नितीशकुमार यांचा भाजपसोबतचा पहिला काडीमोड झाला. इथून त्यांच्या दोन वर्षांच्या घरोब्याला सुरुवात झाली. देशात सगळी सरकारे पाच वर्षांची असली तरी नितीशकुमार यांचे राजकारण मात्र दोन वर्षांनंतर घूमजाव करते. ते युती मोडतात व नवी करतात. लालूप्रसाद व काँग्रेससोबत महागठबंधन करून त्यांनी २०१५ ची निवडणूक दणक्यात जिंकली. पण, २०१७ मध्ये महागठबंधन मोडीत काढून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्याचा फायदा त्यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झाला. पण, पुढच्याच वर्षी त्यांना राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसने धक्का दिला. बहुमत हुकले तरी राजद सर्वांत मोठा पक्ष बनला. जदयु-भाजपला निसटता विजय मिळाला. नितीशकुमार यांच्या पक्षाची मोठी हानी झाली. भाजपने एमआयएम, उपेंद्र कुशवाह, चिराग पासवान असे प्रयोग केले नसते तर कदाचित पराभवही झाला असता.

यातून योग्य तो धडा घेऊन दोनच वर्षांत नितीशकुमार यांनी भाजप सोडून राजदबरोबर संसार मांडला. त्याला दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच नेमके लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपशी घरोबा केला. गेले काही दिवस नितीशकुमार व भाजपच्या जवळिकीच्या बातम्यांवर ते खुलासा करीत नव्हते तेव्हाच अनेकांना या त्यांच्या नव्या धक्क्याची कल्पना आली होती. कारण, छोट्या छोट्या इतर मागास व अतिमागास मतांच्या भरवशावर अतिमागासांच्या हिताचे रक्षण करतो असा दावा करणारे आणि महत्त्वाचे म्हणजे जयप्रकाश, लोहिया, सत्येंद्र नारायण सिन्हा अथवा गेल्या आठवड्यात भारतरत्न घोषित झालेले कर्पूरी ठाकूर यांचे हे वारस दर दोन वर्षांनी जुना संसार मोडून नवा मांडतात हे आता लोकांच्या अंगवळणी पडले आहे. त्यामुळे बिहारमधील या घडामोडींनी कुणाला धक्का बसलेला नाही.

परिणाम इतकाच की, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपला आता चाळीस जागांच्या बिहारमध्ये इंडिया आघाडीची अधिक चिंता करण्याची गरज नाही. सर्वाधिक ऐंशी जागांच्या उत्तर प्रदेशात भाजप मजबूत आहे. अठ्ठेचाळीस जागांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, अजित पवार वगैरे प्रयोगांमुळे हानी होणार नाही, अशी आशा आहे. बेचाळीस जागांच्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी स्वबळाची घोषणा केल्यामुळे आशा पालवल्या आहेत आणि बिहारचा पेच नितीशकुमार यांच्या द्वैवार्षिक संसाराने सैल झाला आहे. एकंदरीत भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीने अपेक्षेनुसार वेग घेतला आहे. मणिपूर ते मुंबई ही राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ ज्या राज्यात प्रवेश करणार असेल तिथे असा धक्का देणे हे त्या तयारीचे उपकथानक आहे.

Web Title: Today's Editorial: Two years of Gharobya Katha, Nitish Kumar's expected U Turn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.