आजचा अग्रलेख: मुंबईमध्ये मराठी टक्का टिकेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 06:09 AM2021-08-03T06:09:01+5:302021-08-03T06:09:50+5:30

Today's Editorial: मराठी माणूस मुंबईबाहेर हद्दपार होत असताना अशा योजनांमुळे तो येथे टिकून राहू शकेल. पण केवळ एका योजनेपुरते हे होऊ नये. तर अशा अनेक योजना भविष्यात येण्याची गरज आहे. बीडीडीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ हा येथील मराठी रहिवाशांच्या विकासाची नांदी ठरो. 

Today's Editorial: Will Marathi percentage survive in Mumbai? | आजचा अग्रलेख: मुंबईमध्ये मराठी टक्का टिकेल?

आजचा अग्रलेख: मुंबईमध्ये मराठी टक्का टिकेल?

Next

मध्य मुंबईतीलमराठी वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. हा प्रकल्प म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठ्या नागरी पुनरुत्थान प्रकल्पाचा घटक असल्याचे मानले जाते. मुंबईचे अस्सल मराठीपण जपण्याची कामगिरी बजावणाऱ्या मराठमोळ्या वस्त्यांमध्ये बीडीडी वसाहतींचा मोठा वाटा आहे. या पुनर्विकास योजनेच्या भूमिपूजनाने शतकभरानंतर या चाळींना टॉवरच्या रूपाने पुनर्जन्म मिळण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे, असे मानायला हरकत नाही.

साधारणत: १९२०च्या दरम्यान ब्रिटिशांनी सर जॉर्ज लॉईड यांच्या योजनेनुसार बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच बीडीडीच्या माध्यमातून या चाळी बांधण्यात आल्या होत्या. त्या मुळात दुसऱ्या महायुद्धातील कैद्यांना डांबण्यासाठी. त्यानंतर स्वातंत्र्य लढ्यातील बंदींनाही या कारागृहात ठेवण्यात येत होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या चाळी पडीकच होत्या. या इमारतींची स्वच्छता राहावी यासाठी चार इमारती सफाई कामगारांना देण्यात आल्या. पुढे गिरणी कामगार येथे राहायला आले आणि शेकडो कुटुंबांनी मराठी संस्कृती जपली. मुंबई राज्याच्या तत्कालीन समाजव्यवस्थेत कामगारवर्गाचे आश्रयस्थान अशी बीडीडी चाळींची त्याकाळी ओळख होती. १९४२चे चले जाव आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ या चाळींनी अनुभवली आणि चाळीतल्याच जांबोरी मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांच्यासह अनेक दिग्गज मराठी नेत्यांच्या सभाही पाहिल्या. गिरण्या धारातीर्थी पडल्यानंतर त्या जागी गगनचुंबी टॉवर उभे राहिले आणि मराठी कामगार वर्ग तेथून मुंबई उपनगर अथवा ठाण्यापुढे फेकला गेला. पण बीडीडी चाळीसारख्या वस्त्यांनी टॉवरच्या गर्दीतच आसपास अद्याप तग धरली असून टॉवर संस्कृतीशेजारीच मराठी ठसा आग्रहपूर्वक कायम ठेवण्याचे सायास दशकानुदशके पार पाडले आहे. आधीची पिढी काम करीत असलेल्या गिरण्यांच्या जागेवर उभ्या राहिलेल्या महागड्या टॉवरमध्ये फ्लॅट घेणे हे मराठी माणसासाठी दिवास्वप्नच आहे. मुंबईतील अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मराठी माणूस प्राणपणाने लढाई लढत असतानाच वेगवेगळ्या मार्गांनी आणि रूपात संकटांची मालिका सुरूच आहे. यात दक्षिण मुंबईतील गिरगाव केव्हाच पडले. गिरणी कामगारांच्या संपानंतर गिरणगाव अचेतन झाले. तरीही मध्य मुंबईतील परळ, लालबाग, वरळी, दादरसारखे मराठी माणसाचे किल्ले अद्याप अस्तित्वाची लढाई लढत आहेत. परप्रांतीयांची आक्रमणे सुरूच आहेत. मराठी माणूस राबत असलेल्या जागेवरील टॉवरमध्ये परप्रांतीय कधी स्थिरावले ते मराठी माणसाच्या लक्षातच आले नाही.

बीडीडी पुनर्वसन प्रकल्पाचा शुभारंभ होत असतानाच वरळीत सी फेसवर गुजरातच्या एका हिरे व्यापाऱ्याने तब्बल १८५ कोटी रुपयांना एक बंगला खरेदी केल्याचे वृत्त थडकले. मराठी माणूस आणि टॉवरमधील फ्लॅट हे विसंगत वाटणारे सूत्र जुळवण्याचे अशक्यप्राय काम सरकारने पार पाडले आहे. पिढ्यान् पिढ्या १६० चौ. फुटांच्या टीचभर खोलीत कसाबसा संसार थाटलेल्या येथील रहिवाशांना ५०० चौ. फुटांचा फ्लॅट देण्याचे गणित साधणे सोपे काम नव्हते. ते कागदोपत्री तरी बऱ्यापैकी साधण्यात आले आहे. आता त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होते की नाही, ते अधिक महत्त्वाचे आहे. या पुनर्वसनातून एकूण ९,६८९ सदनिका निर्माण होणार आहेत. सदनिकाधारकांना प्रशस्त आणि सोयीसुविधायुक्त फ्लॅट देण्याची हमी सरकारने दिली आहे. म्हणूनच योजनेबरहुकूम पात्र रहिवाशांना विनामूल्य सदनिका शक्य तितक्या लवकर देण्याची जबाबदारी आता सरकारवर आहे. दीड वर्षापूर्वी आमच्या सरकारने या प्रकल्पाचा शुभारंभ केला होता, अशी कुरकुर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे केवळ श्रेय लाटण्यासाठीच शुभारंभ करून हेही सरकार गप्प बसले, असे म्हणायची वेळ येता कामा नये. गाजावाजा करून आणलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचे अखेर कसे खोबरे झाले, याचाही अनुभव नागरिकांना चांगलाच आहे. याचबरोबर बीडीडी पुनर्विकास योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ‘इथला मराठी टक्का टिकवा, मोहाला बळी पडून येथील घरे विकू नका’, या नेत्यांनी केलेल्या भावनिक आवाहनाची जाणीव रहिवाशांनी कायम ठेवावयास हवी. मराठी माणूस मुंबईबाहेर हद्दपार होत असताना अशा योजनांमुळे तो येथे टिकून राहू शकेल. पण केवळ एका योजनेपुरते हे होऊ नये. तर अशा अनेक योजना भविष्यात येण्याची गरज आहे. बीडीडीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ हा येथील मराठी रहिवाशांच्या विकासाची नांदी ठरो. 

Web Title: Today's Editorial: Will Marathi percentage survive in Mumbai?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.