आजचा अग्रलेख: जगाची लोकसंख्या ८,००,००,००,०००
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 10:39 AM2022-11-16T10:39:18+5:302022-11-16T10:40:49+5:30
World population: भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी बरोबर १ वाजून ३० मिनिटांनी जगाच्या लोकसंख्येच्या आकड्यात आठवर नऊ शून्ये चढली. होमो सेपियन्स समुदायाने आणखी एक टप्पा गाठला. आता पृथ्वीतलावर आठ अब्ज लोक राहतात.
भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी बरोबर १ वाजून ३० मिनिटांनी जगाच्या लोकसंख्येच्या आकड्यात आठवर नऊ शून्ये चढली. होमो सेपियन्स समुदायाने आणखी एक टप्पा गाठला. आता पृथ्वीतलावर आठ अब्ज लोक राहतात. दोनशे अठरा वर्षांपूर्वी, १८०४ मध्ये जगाच्या लोकसंख्येने शंभर कोटींचा आकडा पहिल्यांदा पार केला. त्यानंतरच्या शंभर कोटींची वाढ १२३ वर्षांत झाली. अब्ज लोकसंख्येचा तिसरा टप्पा ३३ वर्षांमध्ये गाठला गेला. दरम्यान, जगाच्या लोकसंख्येचा विस्फोट झाला. चौथा, पाचवा, सहावा टप्पा अवघ्या अनुक्रमे चौदा, तेरा व बारा वर्षांमध्ये गाठला गेला. मार्च २०१२ मध्ये जगाची लोकसंख्या सात अब्ज झाली तर त्यानंतरचा, आजचा टप्पा साडेअकरा वर्षांमध्ये गाठला गेला. संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेचा सेन्सस ब्यूरो अशा दोन संस्था लोकसंख्यावाढ माेजतात. त्यांचे अंदाज एकमेकांपेक्षा थोडे वेगळे असतात. तथापि, जगभर संयुक्त राष्ट्रसंघ, विशेषत: युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडचा अंदाज अधिक ग्राह्य धरला जातो. या आठव्या टप्प्याची काही वैशिष्ट्ये आहेत. एकूण जन्मांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण निम्म्याहून थोडे अधिक आहे. गेल्या वर्षभरात मृत्यूंची संख्या एकूण वाढीपेक्षा थोडी अधिक आहे आणि हा वेग कायम राहिला तर साधारणपणे साडेदहा अब्जानंतर लोकसंख्या स्थिर राहील. आणखी पंधरा वर्षांनी नऊ अब्ज, तर त्यानंतर सतरा वर्षांनी दहा अब्जाचा टप्पा पार होईल. २०८० साली साधारणपणे १० अब्ज ४० कोटींनंतर एकविसावे शतक संपेपर्यंत लोकसंख्येत वाढ होणार नाही. त्याआधी एकविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताची लोकसंख्या १६६ कोटी ८० लाख तर चीनची लोकसंख्या १३१ कोटी ७० लाख असेल.
२०१२ पासून वाढलेल्या शंभर कोटींमध्ये मोठा वाटा अल्प व मध्यम उत्पन्न गटातील देशांचा आहे. भारताचा वाटा १७ कोटी ७० लाखांचा, तर सध्या तरी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनचा वाटा अवघा ७ कोटी ३० लाखांचा आहे. चीनच्या लोकसंख्येने आताच उणे वाढ सुरू केली आहे. सध्या चीनची लोकसंख्या भारतापेक्षा अवघ्या चार कोटींनी अधिक आहे. येत्या काही महिन्यांमध्ये भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जाईल. तेव्हा, या प्रचंड लोकसंख्येपुढील आव्हाने कोणती, याचा विचार करावा लागेल. परंपरेने भूक, रोगराई व युद्धे ही मानवी समुदायापुढील प्रमुख संकटे मानली जातात. लोकसंख्येचा विस्फोट होऊनही जगातील बहुतेक टापूंमध्ये भुकेचा प्रश्न मध्ययुगीन कालखंडासारखा भीषण नाही. अन्नधान्याचे उत्पादन वाढले आहे. प्रथिने, स्निग्ध पदार्थ व विविध जीवनसत्त्वांचे काही नवे स्रोत तयार झाले आहेत. पूर्वीसारखे लाखोंच्या संख्येने भूकबळी आता जात नाहीत. तरीही भूक हे जगापुढचे मोठे आव्हान राहीलच. कारण, हवामानबदल व वैश्विक तापमानवाढीमुळे जलसंपत्ती, शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यावर उपायांसाठी गंभीर चर्चा सुरू आहेत.
कोविड विषाणू संक्रमणाचे महासंकट ओढवण्यापूर्वी तर असे मानले जात होते की आता लाखो बळी घेणारी महामारी येणारच नाही. त्या विषाणूने तो गैरसमज असल्याचे सिद्ध केले. तरीदेखील अशा वैश्विक संक्रमणाने सोळाव्या शतकापासून जगाच्या कानाकोपऱ्यात घेतलेल्या बळींचा विचार करता आताच्या महामारीत गेलेले बळी कमीच म्हणता येतील. जगात सध्या युद्ध हवे असे म्हणणारे मोठ्या फरकाने अल्पमतात आहेत. अगदी अलीकडे रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जगभरातून युद्धविरोधी भावना प्रचंड तीव्रतेने व्यक्त झाल्या व त्यापुढे रशियासारख्या महाशक्तीलाही झुकावे लागले. लोकसंख्यावाढीचा विचार करता एक महत्त्वाची प्रक्रिया ही आहे, की मानवी समुदायाचा विकासाच्या वाटेवर प्रवास वेगाने सुरू असताना जन्मदर कमी होतो. शिक्षण, नोकरी किंवा उपजीविकेची साधने शोधताना लग्नाचे वय पुढे पुढे जाते. प्रजननक्षम वयोगट पोटापाण्याच्या प्रश्नांमध्ये गुंतलेला राहतो. परिणामी जन्मदर मंदावतो. दुसऱ्या बाजूला आरोग्याच्या सोयीसुविधा अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने, तसेच आहाराचा दर्जा वाढत असल्याने सरासरी आयुर्मान उंचावते. जगात आजघडीला अनेक देशांचे सरासरी आयुर्मान ८० वर्षांच्या पुढे आहे. ऊर्जेचे वाटप व वापर ही आणखी एक मोठी समस्या आहे. सध्याच अडीच अब्ज जनता स्वयंपाकासाठी गोवऱ्या, लाकूड अशा बायोमासचा वापर करते. दीड अब्जांच्या नशिबात विजेचा उजेड नाही. केवळ त्यांच्या घरातच नव्हे तर आयुष्यातही उजेड पेरण्याचे आव्हान मोठे आहे.