आजचा अग्रलेख : देवा गजानना, बुद्धी दे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 11:01 AM2024-09-07T11:01:27+5:302024-09-07T11:02:12+5:30

सरस्वती ही विद्येची, लक्ष्मी धनाची देवता, तर श्री गणराय बुद्धिदेवता. आजपासून पुढील दहा दिवस महाराष्ट्रभर गणेशोत्सवाची धामधूम असेल. उत्सवी ...

Today's Foreword: God Gajanana, give wisdom! | आजचा अग्रलेख : देवा गजानना, बुद्धी दे!

आजचा अग्रलेख : देवा गजानना, बुद्धी दे!

सरस्वती ही विद्येची, लक्ष्मी धनाची देवता, तर श्री गणराय बुद्धिदेवता. आजपासून पुढील दहा दिवस महाराष्ट्रभर गणेशोत्सवाची धामधूम असेल. उत्सवी वातावरणाची जागा आता धांगडधिंग्याने घेतली आहे. कर्णकर्कश्श डीजेच्या कानठळ्यांमुळे त्या बुद्धिवतेचे कानही किटत असतील. गजानन हा विघ्नहर्ता, पण गेल्या काही वर्षांत सार्वजनिक गैरवर्तनाचे विघ्न त्या विघ्नहर्त्यावरच आणले गेले आहे. त्यातून कधी एकदाची सुटका होते असे त्या बुद्धिनाथाला होत असावे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देताना बाळगलेल्या उद्देशांना केव्हाच तिलांजली दिली गेली आहे. अपवाद म्हणून या काळात विधायक कार्यक्रमांचे, समाजहिताच्या उपक्रमांचे आयोजन करणारी गणेश मंडळे आहेत; पण त्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. पूर्वी मंडळांमध्ये एकाहून एक दर्जेदार व्याख्याने, कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी स्पर्धा असायची. आता ही स्पर्धा कोणाची मूर्ती महागाची इथपासून तर कोणाकडे महागडा डीजे लावला आहे इथपर्यंत खाली गेली आहे. मूर्तींची उंची वाढत गेली; पण उत्सवामागील भावनेचा संकोच होत गेला. रोषणाईच्या झगमगाटात मूळ हेतू पराभूत झाला; लखलखाट जरूर वाढला; पण उद्देशांच्या पातळीवर अंधार पसरला. या अधोगतीबाबतचे आत्मचिंतन सर्वांनीच करण्याची आवश्यकता आहे. आज महाराष्ट्रात जातीपातीच्या जाणिवा कधी नव्हे एवढ्या तीव्र झाल्या असून, समाजमन दुभंगलेले  आहे. जातींच्या नावाखाली एकमेकांना लक्ष्य कसे केले जाते, त्याचा प्रत्यय लोकसभेच्या निवडणुकीत आला होताच. विधानसभा निवडणुकीतही आपली पावले त्याच दिशेने पडत आहेत. कटुतेच्या या काळात एकोपा साधण्याची या उत्सवासारखी दुसरी सुवर्णसंधी कोणती असणार? तेव्हा विविध मंडळांनी सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा आणि त्याच्याशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करावे, हेच अधिक स्तुत्य ठरेल.

अमुक एक नवसाचा गणपती, तमुक गणपती पावणारा अशी विशेषणे चिकटविण्याचे प्रमाण हल्ली खूपच वाढले आहे. लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार व स्वराज्य या चतु:सूत्रीचा या उत्सवाच्या माध्यमातून पुरस्कार केला होता. त्या काळाची तीच आवश्यकता होती. आता त्या उद्देशाची गरज उरलेली नाही असा सोयीचा अर्थ आपापल्या परीने काढून उत्सव भरकटवण्याचे काम केव्हाच सुरू झाले आहे. खरे तर टिळकांनी त्या-त्या क्षणाची गरज ओळखा आणि त्यानुसार उत्सवाचे स्वरूप निश्चित करा, असा संदेशच त्यांच्या कृतीतून दिलेला होता. या संदेशानुसार आजच्या परिस्थितीत समाजासाठी सार्वजनिक व्यासपीठावरून कायकाय करण्याची आवश्यकता आहे हे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी  जाणून घेतले पाहिजे. मराठवाड्यात अतिवृष्टीने हजारो एकर जमिनीवरील पिकांची मोठी हानी झाली आहे. अशावेळी मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी दातृत्वाचा परिचय देत मदतीचा हात पुढे करावा, हुल्लडबाजीसाठी वर्गणीचा पैसा गोळा करण्यापेक्षा तसे करणे समर्पकच ठरेल. समाजामध्ये देणारे हात हजारो आहेत, ज्यांना काही मिळण्याची खरेच गरज आहे असे लाखो हात आहेत. देणारे आणि गरजवंत यांना जोडणारा विश्वासार्ह दुवा म्हणून आपण काही भूमिका निभावू शकतो का, असा विचार मंडळांनी करायला हवा. सलोखा राखण्यासाठी केवळ मंडळांनीच कार्य करायला हवे असे नाही, तर इतर घटकांचीही ती जबाबदारी आहे.

साठी बुद्धी नाठी म्हणतात,  महाराष्ट्र आता पासष्टीच्या घरात आहे. त्यामुळेच की काय, येथील नेत्यांची बुद्धी नाठी झालेली दिसते. खरे तर पासष्टीमध्ये ती अधिक प्रगल्भ व निकोप होईल अशी अपेक्षा होती; पण त्याबाबत अधोगतीच सुरू आहे. देवा गजानना, हे अवमूल्यन रोखण्यासाठी राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना बुद्धी दे! हे फक्त दहा दिवसांसाठी करू नकोस देवा, नेहमीसाठीच ही बुद्धी दिली तर महाराष्ट्राचे भले होईल. केवळ नेत्यांनाच नाही तर समाजाच्या विविध क्षेत्रांच्या अवमूल्यनाला कारणीभूत ठरणाऱ्या प्रवृत्तींना सद्वर्तनासाठीची अक्कल दे, बाप्पा ! केवळ नेत्यांच्या नावे बोटे मोडणाऱ्यांना आरशातही पाहायला लाव. बदलापूर घटनेतील विकृती समाजमन विषण्ण करणारी आहे. राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्राला कलंक लावणाऱ्या अशा घटनांनी हादरवून टाकले आहे. अशावेळी समाजात नैतिकतेचे बीजारोपण होणे निकडीचे आहे. चारित्र्यसंपन्नता वृद्धिंगत व्हावी आणि चारित्र्यहिन प्रवृत्तीचा विनाश व्हावा यासाठी बुद्धीचे मोदक घेऊनच हे गणाधिशा, तू ये आणि हो! तुझ्या नावाप्रमाणे ‘अनंत’काळासाठी ती दे;  हे मागणेही आहेच.

Web Title: Today's Foreword: God Gajanana, give wisdom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.