म्हणे, समुद्रातील घाण येऊ देणार नाही...; फेसबुकवर कितपत विश्वास ठेवावा?

By Devendra Darda | Published: October 16, 2021 06:30 AM2021-10-16T06:30:10+5:302021-10-16T06:30:30+5:30

Facebook: सोशल मीडिया म्हणून फेसबुक ही जगातील सर्वांत मोठी कंपनी. याच कंपनीने गेल्या काही वर्षांत व्हॉट्सॲपही विकत घेतले आहे आणि ते संवादाचे माध्यमही जगात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, नंबर वनचे मुकुट मिरवताना त्याचे टोक कधी ना कधी बोचणार हे नक्कीच. तसेच फेसबुकचे झाले आहे.

Today's headline: How much to trust Facebook? | म्हणे, समुद्रातील घाण येऊ देणार नाही...; फेसबुकवर कितपत विश्वास ठेवावा?

म्हणे, समुद्रातील घाण येऊ देणार नाही...; फेसबुकवर कितपत विश्वास ठेवावा?

Next

>> देवेंद्र दर्डा, मॅनेजिंग डायरेक्टर, लोकमत

जगभरात आपलं गारुड निर्माण केलेली कंपनी म्हणजे फेसबुक. हॉर्वर्डच्या रुममेट्सने असंच सहज प्रयोग म्हणून जन्माला घातलेलं इंटरनेटच्या महाजालावरचं अद्भूत अपत्य. आपलं हे अपत्य आपत्तीही ठरू शकते असा कधी विचार मार्क झुकेरबर्ग आणि त्यासोबत हे तयार करण्यात सोबत असलेल्यांच्या मनालाही शिवला नसेल. २००४ साली तयार झालेल्या छोट्याशा तलावाचा आता महासागर झालाय, पण त्याच्यावर अनेकदा जो मजकूर येऊन पडतो, तो पाहता त्याचे गटारगंगेत रूपांतर होत आहे की काय असे वाटू लागले आहे. 

सोशल मीडिया म्हणून ही जगातील सर्वांत मोठी कंपनी. याच कंपनीने गेल्या काही वर्षांत व्हॉट्सॲपही विकत घेतले आहे आणि ते संवादाचे माध्यमही जगात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, नंबर वनचे मुकुट मिरवताना त्याचे टोक कधी ना कधी बोचणार हे नक्कीच. तसेच फेसबुकचे झाले आहे.

फायद्याचे चक्र वेगात फिरत गेले. या गणिताच्या जात्यात तरुणाई भरडली जातेय, याकडे फेसबुकने साफ दुर्लक्ष केले. तरुणाईला तासन्तास खिळवून ठेवण्यासाठी जे जे करता येईल ते ते फेसबुकने केले. चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी सुरू झालेला हा खेळ मग वाईट मार्गानेही सुरू झाला. वाद, तंटे, आरोप, टीका आणि गलिच्छ शब्दांमध्ये होणारे भांडण, तेढ निर्माण करणारे व्हिडिओ आणि बरेच काही फेसबुकच्या या महासागरात गटारासारखे पसरू लागले. त्यातूनच अधिक धंदा असल्याचेही फेसबुकच्या लक्षात आले. कारण जिथे वाद किंवा वादग्रस्त मजकूर, फोटो किंवा व्हिडीओ असेल तिथे यूजर्सची संख्या अधिक... तिथे व्यक्त होणारे लोक अधिक आणि त्यामुळे मिळणारा महसूलही अधिक... फेसबुक एवढ्यावरच थांबले नाही. प्रत्येक यूजरची मानसिकता ओळखून त्यांचे विचार बदलण्यापर्यंतही मजल मारली. सोशल मीडियातून होणारा प्रचार व्यक्तिपरत्वे बदलता येतो, त्यातून इलेक्शनची चक्रे कशी फिरवता येतात हे फेसबुकने कोणाच्याही नकळत करून दाखवले. पण, हे लपून राहिले नाही आणि फेसबुकचे हसे झाले. फेसबुकवरचा विश्वास कमी होत गेला. अनेक देशांमध्ये फेसबुकने आपल्या यूजर्सच्या डेटाचा असा वापर करू दिल्याचा आरोपही झाला आहे. आताही फेसबुकवरील विश्वासाला तडे बसतील अशा गोष्टी नव्याने समोर येऊ लागल्या आहेत.

आपल्या फायद्यासाठी कंपनीने लोकांच्या डेटाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले, असा आरोप फेसबुकच्या एका माजी उच्चपदस्थ कर्मचारी फ्रान्सिस हेगन यांनी नुकताच केला आहे आणि त्यामुळे फेसबुकच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दीडशे कोटी यूजर्सची वैयक्तिक माहिती फेसबुकवरून चोरली गेली आणि ती हॅकर्सच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्याची माहितीही काही दिवसांपूर्वी आली. या यूजर्सचे फोन नंबर, त्यांचे नाव, ठिकाण आणि इतर बरेच काही विक्रीसाठी उपलब्ध झाले. याचा फायदा हॅकर्स सहजरीत्या करून सामान्य यूजर्सकडून लाखो रुपये उकळू शकतात, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कारण अशी अनेक उदाहरणे आपल्याही आसपास रोज घडत आहेत.

फेसबुकचेच अपत्य असलेल्या इन्स्टाग्रामचेही असेच आहे. इन्स्टाग्राममुळे तरुणाई नैराश्यात जात असल्याचे कंपनीच्या लक्षात आले, पण त्याकडेही साफ दुर्लक्ष केले गेल्याचा आरोपही माजी कर्मचाऱ्यांनी केला आहे. शिवाय सेलिब्रिटी यूजर्सना फेसबुक व्हीआयपी सेवा देत असल्याचाही ठपका कंपनीवर आहे. हे सगळे कशासाठी, तर आपलं अपत्य कमावत राहावं, यासाठी. पण त्याचा समाजमनावर काय परिणाम होतोय, मानसिकरीत्या तरुणाई किती अस्थिर होत आहे याचा विचार होणेही तेवढेच गरजेचे आहे. 

चाइल्ड पोर्नोग्राफी, अश्लील गोष्टी रोखण्यासाठी फेसबुकने पावले उचलली आहेत. मनावर विपरित परिणाम करणारे खून, मारामारी, रक्त दिसत असलेल्या पोस्ट टाकल्या जाणार नाहीत यासाठी धोरणेही ठरवली आहेत, पण तरीही फेसबुकवरचा अशा पोस्टचा मारा कमी झालेला नाही. आता आपण समुद्रातील घाण आमच्याकडे येऊ देणार नाही, अशी भूमिका फेसबुकने घेतली आहे. म्हणजे गलिच्छ मजकूर, आरोप, कोणाचा छळ होईल अशा पोस्ट आपण फेसबुकवर ठेवणार नाहीत, त्या काढून टाकणार असल्याचे फेसबुकने जाहीर केले असले तरी त्यावर किती व कसा विश्वास ठेवायचा? या नंबर वन सोशल मीडियाला सोशल म्हणायचे की सोशल शोषक म्हणायचे, याचाही विचार नव्याने करण्याची वेळ आली आहे.

Web Title: Today's headline: How much to trust Facebook?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.