आजचा अग्रलेख: रामोजी राव, सम्राट आणि महर्षीही!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 09:52 AM2024-06-10T09:52:59+5:302024-06-10T09:55:00+5:30
Ramoji Rao : चित्रपटसृष्टीसह माध्यम जगतात क्रांती घडवणारे; अनेकविध कल्पना प्रत्यक्षात उतरविणारे उद्योजक अशी अनेक विभूषणे लावूनही ती अपुरी पडावीत, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. उद्योगपती म्हणून ते ‘सम्राट’ होते आणि वृत्तीने ‘महर्षी’! माध्यम, जाहिरातजगत, चित्रपटक्षेत्र, हॉटेल उद्योग, एनबीएफसी, राजकारण अशा विविध क्षेत्रांत रामोजी राव यांनी आपला ठसा उमटवला.
चोवीस तास बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्या यायच्या होत्या, त्या काळात ‘ई टीव्ही मराठी’ दिसू लागले. पुण्या-मुंबईच्या पलीकडे महाराष्ट्र आहे, हे तोवर ज्यांना ठाऊकही नव्हते, त्यांना ‘ई टीव्ही’ने चांद्यापासून बांद्यापर्यंतचा महाराष्ट्र दाखवला. आडगावे पडद्यावर दिसू लागली आणि ज्यांना मुख्यप्रवाही माध्यमे नोकऱ्या देत नव्हती, अशी तरुण मुलेही पडद्यावर झळकू लागली. रामोजी राव महाराष्ट्राला ठाऊक झाले ते तेव्हा. अनवट कल्पना प्रत्यक्षात साकारणारा हा मुलुखावेगळा माणूस शेवटपर्यंत नवनवी स्वप्ने पेरत राहिला. अद्भुत ज्ञानलालसेने शिकत राहिला. नवे जग उभारत राहिला. चित्रपटसृष्टीसह माध्यम जगतात क्रांती घडवणारे; अनेकविध कल्पना प्रत्यक्षात उतरविणारे उद्योजक अशी अनेक विभूषणे लावूनही ती अपुरी पडावीत, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. उद्योगपती म्हणून ते ‘सम्राट’ होते आणि वृत्तीने ‘महर्षी’! माध्यम, जाहिरातजगत, चित्रपटक्षेत्र, हॉटेल उद्योग, एनबीएफसी, राजकारण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला.
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापारुपुडीमध्ये एका शेतकऱ्याच्या पोटी रामोजी यांचा १६ नोव्हेंबर १९३६ रोजी जन्म झाला. उद्योगाचे महत्त्व त्यांना लहान वयातच समजले. प्रारंभी चिट फंडाचा व्यवसाय, त्यानंतर जाहिरात क्षेत्रात पाऊल, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मासिकाची निर्मिती असे अनेक व्यवसाय सुरुवातीच्या काळात त्यांनी केले. ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले, ते ईनाडू’ हे तेलुगू वृत्तपत्र सुरू केल्यानंतर. माध्यम क्षेत्रात अनेक नवे प्रयोग त्यांनी केले. आज विविध माध्यमांमध्ये जी व्यवस्था दिसते, त्याचे सुरुवातीचे प्रयोग रामोजी यांच्या मार्गदर्शनाखाली घडले. ‘ईनाडू’ घराघरांत पोहोचले. माध्यमात राहून उघड राजकीय भूमिका घेण्याचे धाडस त्यांनी दाखवले. तेलुगू देसम पार्टीला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. सध्या ‘किंगमेकर’ म्हणून देशभर आंध्र प्रदेश आणि तेलुगू देसम पार्टीचा बोलबाला आहे. या पक्षाला बळ देत ‘तेलुगू अभिमान’ चर्चेत आणला तो रामोजींनी. आंध्र प्रदेशातील राजकीय समीकरणे तेव्हापासून बदलली. काँग्रेसला राज्य स्तरावरील राजकीय आघाडीवर फेरबदल करावे लागले. राजकीय पाठिंबा देऊन माध्यम क्षेत्रातील व्यावसायिकता त्यांनी जपली. नवे तंत्रज्ञान स्वीकारून नवे प्रयोग केले. वृत्तवाहिन्यांचा ‘कर्कश’पणा नसतानाच्या काळात त्यांनी प्रथम ‘ई टीव्ही’ ही वृत्तवाहिनी सुरू केली. पत्रकारांसाठी ती एक प्रशिक्षण शाळाच होती. अनेक भाषांतील बातमीपत्रे तेथून निघायची. नवे तंत्रज्ञान वापरायचा आग्रह, तशी व्यवस्थाही असायची.
माध्यम क्षेत्राबरोबरच रामोजी यांचे नाव जगप्रसिद्ध झाले, ते ‘रामोजी फिल्म सिटी’ या जगातील सर्वांत मोठ्या फिल्म सिटीमुळे. पर्यटकांचे ते आवर्जून भेट देण्याचे ठिकाण आहे. हैदराबादमध्ये उभारलेल्या फिल्म सिटीमध्येही रामोजी यांची कल्पकता आणि नवे तंत्रज्ञान वापरण्यासाठी केलेली सोय त्यांची काळाच्या पुढे पाहणारी दृष्टी दाखवते. ‘बाहुबली’सह अनेक चित्रपटांचे शूटिंग या ठिकाणी झाले आहे. अनेकांच्या कल्पनांना, स्वप्नांना या सिटीने उभारी दिली. परिपूर्णता दिली. ‘उषाकिरण मूव्हिज’ ही प्रॉडक्शन कंपनी त्यांनी सुरू केले. अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. माध्यम क्षेत्राप्रमाणेच चित्रपटनिर्मितीमध्येही अतिशय सूक्ष्म विचार करण्याची त्यांची पद्धत होती. ते कथेला प्राधान्य द्यायचे. माध्यमातील एखाद्या बातमीवरून चित्रपटही बनविता येतो, हे त्यांनी ‘नाचे मयुरी’ चित्रपटातून दाखवून दिले. सुधा चंद्रन यांच्यावर हा सिनेमा चित्रित करण्यात आला होता. उद्योग क्षेत्रात यशस्वी होऊनही समाजाशी, शेतीशी नाळ त्यांनी तोडली नाही. ज्या गावात जन्माला आले, त्या गावात त्यांनी अनेक विकासकामे केली. ते ज्या शाळेत शिकले, त्याची पुनर्बांधणी त्यांनी केली. नागरिकांना पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा, यासाठी नळजोडीसारखी कामेही त्यांच्या माध्यमातून झाली. पेडापारुपुडी गावाला त्यांनी कधीही आपल्यापासून दूर लोटले नाही. त्यांच्या निधनाने आज सारा गाव शोकाकुल झाला आहे. रामोजी रावांना कुठलेही क्षेत्र वर्ज्य नव्हते. प्रसारमाध्यम, राजकारण, चित्रपट, जाहिरात, हॉटेल उद्योग अशा साऱ्या ठिकाणी काम करताना एक सामायिक गुण त्यांच्याकडे होता, तो म्हणजे सतत नावीन्याचा ध्यास. तरुणांना लाजवेल असा उत्साह, नवतंत्रज्ञानाची समज आणि नवी उद्दिष्टे गाठण्याची त्यांची चिकाटी. प्रतिभेचे पंख लावून रोज नवी स्वप्ने पाहणाऱ्या आणि चिवटपणे त्या स्वप्नांचा पाठपुरावा करत साम्राज्य उभ्या करणाऱ्या रामोजी रावांची गाथा एखाद्या भव्य सिनेमालाही कवेत घेता येणार नाही. भव्य उद्योग उभारतानाच, सांस्कृतिक भुयारातून लोककल्याणकारी राजकारणाला आकार देणाऱ्या या महर्षी सम्राटाला ‘लोकमत’ परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली.