आजची ठिणगी उद्याची मशाल ! वैचारिक मन्वंतराचे दक्षिणायन

By किरण अग्रवाल | Published: September 28, 2017 07:25 AM2017-09-28T07:25:50+5:302017-09-28T08:33:07+5:30

आजची तरुण पिढी बाकी सारे सोडून मोबाइलमध्ये डोके घालून बसली आहे, अशी तक्रार पालकांकडून होत असताना आणि त्यात बरेचशे तथ्य दिसत असतानाही समाज व देशासमोरील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्यातील तब्बल पाच सातशे तरुण एकत्र येतात व आपला एक जाहीरनामा तयार करून त्यासाठी कृतसंकल्प होतात ही बाब साधी नाही.

Today's sparkle tomorrow! Dakshinaayan of Ideal Manvantra | आजची ठिणगी उद्याची मशाल ! वैचारिक मन्वंतराचे दक्षिणायन

आजची ठिणगी उद्याची मशाल ! वैचारिक मन्वंतराचे दक्षिणायन

Next

आजची तरुण पिढी बाकी सारे सोडून मोबाइलमध्ये डोके घालून बसली आहे, अशी तक्रार पालकांकडून होत असताना आणि त्यात बरेचशे तथ्य दिसत असतानाही समाज व देशासमोरील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्यातील तब्बल पाच सातशे तरुण एकत्र येतात व आपला एक जाहीरनामा तयार करून त्यासाठी कृतसंकल्प होतात ही बाब साधी नाही. आजची ही ठिणगी उद्या मशालीचे रूप धारण करून समोर येण्याचा शुभसंकेत तर यातून मिळावाच, शिवाय सारेच काही संपलेले नाही; समाजाप्रतिच्या उत्तरदायित्वाचा विचार करणारी एक फळी घडतेय याचा आशादायी सांगावाही त्यातून मिळावा.

सध्या सुरू असलेला नवरात्रोत्सव म्हणजे तरुणाईच्या जल्लोषाचा उत्सव. अलीकडे सणावारांच्या संकल्पनाही बदलून गेल्याने, जसजसा सूर्य मावळतीकडे जाताना दिसतो तसतसे तरुणांचे घोळके हाती टिप-या घेऊन दांडिया मैदानाकडे लोटताना दिसून येतात. पण अशा या माहौलातही राज्याच्या कानाकोपºयातील निवडक तरुण ‘दक्षिणायन’च्या माध्यमातून नाशकात जमले होते. ‘डिझायनिंग द फ्यूचर’ अशी संकल्पना घेऊन त्यांनी आपल्या स्वत:समोरीलच नव्हे तर समाज व देशासमोरीलही विविध आव्हानांवर जीव तोडून चर्चा केली. काही प्रश्न उपस्थित केले, तर काही प्रश्नांची उत्तरेही स्वत:च शोधलीत. दोन दिवसांच्या या युवा संमेलनात शिक्षणाचे वाढते बाजारीकरण, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण, क्षीण झालेली जातिअंताची लढाई, लैंगिक शिक्षण अशा गहन वा गंभीर विषयांवर खल झाला. महाराष्ट्र शासनाने २०१२ मध्ये दहा वर्षांसाठी तयार केलेल्या युवा धोरणास पाच वर्षे पूर्ण होत आहेत, त्याबाबतचा आढावाही यात घेण्यात आला.  केवळ आपसात चर्चा करून हे तरुण थांबले नाहीत, त्यांनी गटागटाने नाशकातील विविध शाळा-महाविद्यालयांत जाऊन सर्वांची मते अभ्यासली. अर्थातच, तरुणाईच्या या चळवळयुक्त मोहिमेला वैचारिक अधिष्ठान लाभले होते ते दक्षिणायन अभियानाचे प्रणेते व आंतरराष्ट्रीय भापातज्ज्ञ डॉ. गणेश देवी, ज्येष्ठ पत्रकार विद्या बाळ, कुमार केतकर, समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, साहित्यिक प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, कामगार नेते भालचंद्र कानगो, शमसुद्दीन तांबोळी, उल्का महाजन, नंदा खेर आदी मान्यवरांचे.

महत्त्वाचे म्हणजे तरुणांबद्दल बोलताना अगदी सरधोपटपणे बोलले जाते की, त्यांना समाजाशी काही देणे-घेणे उरलेले नाही किंवा प्रारंभी उल्लेखिल्याप्रमाणे ते मोबाइल-व्हॉट्सअ‍ॅपमध्ये गुंतून पडल्याचेही सांगितले जाते. परंतु डॉ. गणेश देवी यांनी जो विचार यासंदर्भात मांडला त्याची प्रचिती याच संमेलनात येऊन गेली. डॉ. देवी म्हणाले, आजच्या वर्तमान अवस्थेत युवकांना अभिव्यक्तच होता येत नाही. त्यामुळे त्यांना प्रथम अभिव्यक्त होऊ द्या. त्यातून काय निष्पन्न होईल व त्याचा समाजासाठी कसा वापर करून घेता येईल ते नंतर पाहू, आणि खरेही आहे ते. आपला देश सर्वाधिक तरुणांचा देश म्हणवला जातो, नव्हे तसे आहेच. परंतु तरुणांना समजून न घेताच साºयांचे सारे काही चालू असलेले दिसते. त्याला जमेतच धरले जात नाही. यासंदर्भात प्रा. कसबे यांचे प्रतिपादन अधिक बोलके आहे. ते म्हणाले, ‘विचारांचे स्वातंत्र्य हे मानवाचे व लोकशाहीचेही वैशिष्ट्य आहे, परंतु तरुणाईने विचार करू नये अशीच व्यवस्था निर्माण केली जात आहे’. तेव्हा ही व्यवस्था भेदून पुढे येण्याचा व आपले, समाजाचे आणि देशाचेही ‘फ्यूचर’ डिझाइन करण्याचा प्रयत्न या युवा संमेलनाद्वारे केला गेल्याचे दिसून आले.

दक्षिणायन युवा संमेलनातील चर्चेअंती आपल्या सामूहिक कृतीचा एक भाग म्हणून तरुणाईने आपला एक जाहीरनामा तयार केला आहे. ‘महाराष्ट्रा तू असावास जात पात मुक्त, धर्मांधता मुक्त, दलितांच्या रोज रोज होणा-या अवहेलनेपासून मुक्त, अज्ञान, अंधश्रद्धा, अविवेक मुक्त, भूक मुक्त, बेकारी मुक्त, लाचलुचपत मुक्त, निराशा मुक्त, शेतक-यांच्या हत्या आणि आदिवासींचे विस्थापन यापासून मुक्त, स्त्रियांवरच्या बेसुमार वाढलेल्या अत्याचारापासून मुक्त, भोंदूगिरी, दादागिरी, बुवाबाजी यातून मुक्त, भयमुक्त’ अशा विविध सामाजिक व्याधींपासूनची मुक्ती मागणारा व ज्या स्वार्थाच्या, द्वेषाच्या, निराशेच्या, खोट्या प्रचाराच्या-गोंगाटाच्या वातावरणात आपण वाढत आहोत ते वातावरण संपूर्ण बदलण्याचा निर्धार व्यक्त करून एल्गार पुकारणारा हा जाहीरनामा आहे. येत्या दि. १ ऑक्टोबर २०१७ रोजी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद व यवतमाळ या शहरांमध्ये एकाचवेळी तर त्यापुढील दहा दिवसांत राज्यातील अन्य शहरांत तरुणांद्वारे या जजाहीरनाम्याचे वाचन करून अन्य तरुण मने जागविली जाणार आहेत. त्यामुळे नाशकात पडलेली नवरात्रातील ही वैचारिक जागराची ठिणगी नवा प्रकाश पेरण्याची अपेक्षा नक्कीच करता येणारी आहे. त्यासाठी या युवा संमेलनाचे संयोजन करणा-या डॉ. मिलिंद वाघ, रसिका सावळे, विराज देवांग, श्यामला चव्हाण, डॉ. रोहित कसबे व कल्याणी आहिरे या धडपड्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

Web Title: Today's sparkle tomorrow! Dakshinaayan of Ideal Manvantra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.