स्वच्छतेचे पुढे पाठ मागे सपाट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 09:56 PM2018-11-24T21:56:47+5:302018-11-24T22:01:05+5:30

घाईघाईत बांधून देण्यात आलेले शौचालय आता नावापुरते उरले आहेत. हीच परिस्थिती लातूर शहरातही आहे. पहाट झाली की लोक शिवाराकडे पळतात....

toilet building scheme under swachh bharat campaign not get expected success | स्वच्छतेचे पुढे पाठ मागे सपाट

स्वच्छतेचे पुढे पाठ मागे सपाट

Next

आरोग्य सुदृढ राहावे, साथीचे आजार उद्भवू नये यासाठी शासनाने ग्रामीण भागात विविध उपक्रम हाती घेतले. हागणदारीमुक्त गावाची संकल्पना गावोगावी राबविण्यात आली. पण शासनाच्या योजनांची स्थिती म्हणजे पुढे पाठ, मागे सपाट अशी झाली आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी लातूर जिल्ह्यात लाखो  कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम केले. प्रशासनाने त्यांची दप्तरी तशी नोंद करून घेतली. १०० टक्के शौचालय बांधकाम झालेल्या काही गावांचा हागणदारीमुक्त गाव म्हणून गौरवही झाला. गावस्तरावर होणाऱ्या निवडणुकांमध्ये यावर अनेकांनी मतेही मागितली. गेल्या १० ते १२ वर्षांपासून हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी प्रशासनाने गाव कारभाऱ्यांना हाताशी धरून गावे कागदोपत्री नंदनवन केली. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीचा पुरवठा करण्यात आला. अनेक गावात हागणदारीमुक्त गाव म्हणून फलक लागले. मात्र, परिस्थिती उलट निर्माण झाली. पुन्हा सुरू झाले ये रे माझ्या मागल्या...

ही बाब लक्षात आल्यावर पंचायत समितीने गुड मॉर्निंग पथक तयार करून भल्या पहाटे अनेकांची अडवणूक केली. लोटाबहाद्दरांवर कारवाईचा बडगा उगारला. एवढे करूनही पालथ्या घड्यावर पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. लोकांच्या मानसिकतेत बदल झाला नाही. गावात कोण आले अन् कोण गेले, याची यत्किंचितही तमा गावकारभाऱ्यांनाही राहिली नाही. केवळ पाहणीसाठी आलेल्या पथकासमोर देखावा करण्यासाठी स्टंटबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दत्तक घेतलेल्या गावात मुक्काम ठोकून शौचालय बांधकाम व त्याच्या वापरातून होणाऱ्या फायद्याचे महत्त्व गावकऱ्यांना उद्धृत केले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामाला १२ हजार रूपयांचे अनुदान केंद्र शासनाकडून लाभार्थ्यांना देण्यात आले. लाभार्थ्यांची यादी घेऊन सरपंच, ग्रामसेवक दारोदारी फिरले. अनुदान मिळणार असल्याचे सांगूनही अनेकांनी प्रतिसाद दिला नाही. वरिष्ठांचा रेटा असल्याने स्थानिक पातळीवर शौचालय उभारणीचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. रेडिमेड शौचालय स्वस्तात मिळाली. यातून कोट्यवधींची उलाढाल झाली. स्वत: उत्पादकांनी घरपोच सेवा देत शौचालय उभारून दिले. लाभार्थ्यांनी वापरासाठी तयार असलेल्या शौचालयाचे छायाचित्र काढली अन् अनुदान पदरी पाडून घेतले. गाव हागणदारीमुक्त झाल्याचा आनंद अधिकाऱ्यांपर्यंत गाव कारभाऱ्यांनी पोहोचविला. अनेक ठिकाणी तर एका रात्रीतून शौचालय उभारण्याचे काम करण्यात आले. हागणदारीमुक्त मुक्त गावाच्या यादीत आपलेही गाव आले पाहिजे, यासाठी कारभाऱ्यांनी स्वत:च्या खिशातून तात्पुरते पैसे लावून बांधकाम करून दिले. कोणत्याही प्रकारचे कष्ट न घेता सोय झाल्याने गांभीर्य लाभार्थ्यांना आले नाही. घाईघाईत बांधून देण्यात आलेले शौचालय आता नावापुरते उरले आहेत. हीच परिस्थिती लातूर शहरातही आहे. पहाट झाली की लोक शिवाराकडे पळतात....
 

Web Title: toilet building scheme under swachh bharat campaign not get expected success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.