मीराबाईचं मणिपूर कुठे आहे, हे तुम्हाला सांगता येईल?

By meghana.dhoke | Published: July 26, 2021 06:32 AM2021-07-26T06:32:25+5:302021-07-26T06:33:36+5:30

जी मुलगी आपलं ऑलिम्पिक पदक साऱ्या भारतीय जनतेला अर्पण करते, तिचा ‘मणिपुरी’ म्हणून वेगळा उल्लेख कशाला?- हा प्रश्न विचारणाऱ्या सर्वांसाठी...

Tokyo olympics: Can you tell me where Mirabai Chanu Manipur is? | मीराबाईचं मणिपूर कुठे आहे, हे तुम्हाला सांगता येईल?

मीराबाईचं मणिपूर कुठे आहे, हे तुम्हाला सांगता येईल?

Next

मेघना ढोके

मुख्य उपसंपादक,लोकमत

मुझे स्टेट्स के नाम न सुनाई देते है न दिखाई देते है... सिर्फ एक मुल्क का नाम सुनाई देता है, इं-डि-या ! - “चक दे” सिनेमातलं हे प्रशिक्षक कबीर खानचं वाक्य! एरव्हीही राष्ट्रवादाची सच्ची कळकळ हेच सांगते, की एखादा खेळाडू आपलं सर्वस्व पणाला लावून खेळतो, तेव्हा तो आधी केवळ ‘देशाचा’ असतो. नंतर आपलं राज्य, धर्म, वर्ण, जात, लिंग याची ओळख सांगतो. मीराबाई चानूनेही आपलं ऑलिम्पिक पदक साऱ्या भारतीय बंधु-भगिनींना अर्पण करून हेच दाखवून दिलं की, यशाच्या सर्वोच्च क्षणीही ती सगळ्यात आधी ‘भारतीय’ आहे! 

- या साऱ्यात एका वेगळ्या चर्चेला तोंड फुटलं. झालं असं की, ईशान्येतील अनेक ज्येष्ठ पत्रकार (डावे-उजवे दोन्हीही) आणि ईशान्य भारताचं सातत्यानं वार्तांकन करणारे काही पत्रकार, सामान्य स्थानिक माणसं यांनी समाजमाध्यमात पोस्ट केल्या, ‘मणिपूरच्या मीराबाईने भारताची शान वाढवली!’ त्यावर स्वत:ला ‘मेन लॅण्ड इंडियन’ म्हणवणाऱ्या अनेक पत्रकारांनी (डावे-उजवे दोन्हीही) आणि सामान्य नागरिकांनी आक्षेप घेतला की, ‘शी इज इंडियन फर्स्ट’. तिनं देशासाठी पदक जिंकलं आणि तुम्ही काय ती मणिपुरी आहे म्हणता? राज्यांचा ‘असा’ वेगळा उल्लेख करत  प्रांतवादाला उगीच हवा देणं योग्य आहे का? - हे प्रश्न निर्विवाद रास्त आहेत. 

जी मुलगी आपलं पदक साऱ्या भारतीय जनतेला अर्पण करते, तिचा ‘मणिपुरी’ म्हणून वेगळा उल्लेख कशाला, असा प्रश्न पडणंही साहजिकच आहे. मात्र प्रश्न वरकरणी बरोबर वाटत असला तरी, त्याची उत्तरं तशी सोपी नाहीत. खरं उत्तर हवंच असेल, तर थोडं सत्य पचवण्यासाठी मनाची तयारी करायला हवी! आपल्या देशात बहुसंख्य लोकांना मणिपूर भारताच्या नकाशावर नेमकं कुठं आहे हे दाखवताही येणार नाही. मणिपूरची राजधानी कोणती, असा प्रश्न विचारला तरी, अनेकांना उत्तर सुचणार नाही. आपल्या देशाचा शाळकरी भूगोल आपल्याला नीट माहिती नाही. या भागातून शिकायला आलेल्या मुला-मुलींना आजही सर्रास चिनी, नेपाळी, हक्का नूडल्स म्हणून चिडवलं जातं आणि त्यात काही गैर आहे असंही अनेकांना वाटत नाही. ‘चिंकी’  म्हणून (हा शब्द अपमानास्पदच नव्हे, तर वर्णभेदीच आहे, तो नाइलाजास्तव वापरल्याबद्दल दिलगिरी!) चिडवलं जातं, तेव्हा आपण आपल्याइतक्याच ‘भारतीय’ आणि ‘राष्ट्रभक्त’ माणसांचा अपमान करून त्यांना छळतो आहोत याचंही आपल्याला भान नसतं.

एवढंच कशाला, ईशान्य भारतीय मुलींना भर रस्त्यात ‘तुझा रेट काय?’ असं विचारणारे निर्लज्जही आपल्या अवतीभोवती आहेत. नुकतीच अशीच एक घटना गेल्या आठवड्यात दिल्लीत घडली. याशिवाय तिकडे लोक कुत्रे खातात, अळ्या-किडे खातात म्हणून नाकं मुरडणाऱ्या बेदरकार अज्ञानींची संख्या तर प्र-चं-ड आहे. कायम अपमान, सतत भारतीय म्हणून ओळख सिध्द करायला लागणं आणि ‘मेन लॅण्ड इंडिया’ने आपल्याला ‘भारतीय’ म्हणून स्वीकारावं म्हणून झगडणं, हे सारं ईशान्य भारतातल्या आठही राज्यांतील ‘भारतीय’ नागरिकांच्या वाट्याला गेली अनेक दशकं सतत येतं आहे. मुळात उर्वरित भारत जितका ‘मेन लॅण्ड’, तितकाच हा प्रदेश ‘मेन लॅण्ड भारत’ नाही का? पण अरुणाचल प्रदेशावर चीनने दावा सांगितला की मगच आठवतं की, तो भूभाग भारताचा(च) आहे, एरव्ही तिथली माणसंही आपल्याइतकीच भारतीय आहेत,  त्यांना ‘आपलं’ मानण्यात आपण ‘भारतीय’ म्हणून कमी पडतो आहोत, हे उर्वरित राज्यात राहणाऱ्या माणसांच्या गावीही नसतं! - म्हणून मग ‘मणिपूरच्या मीराबाईने भारतासाठी पहिलं पदक जिंकलं’ हे तिथल्या माणसांना अधोरेखित करावं लागतं. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की, मणिपूर राज्यातल्या भारतीय मुलीने हे पदक जिंकलं असं म्हणा... बघा तरी मणिपूर नक्की कुठं आहे भारतात! - त्यांना असं वाटण्यात चूक काय? 


meghana.dhoke@lokmat.com

Web Title: Tokyo olympics: Can you tell me where Mirabai Chanu Manipur is?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.