निषेधाचा स्वर

By Admin | Published: October 20, 2015 03:30 AM2015-10-20T03:30:14+5:302015-10-20T03:30:14+5:30

म्हणूनच नारायण सावरकरांसारख्या वृद्ध गायकाच्या ‘अहिंसक’ निषेधाचे स्वर या धार्मिक दहशतवादाविरुद्धच्या सत्याग्रहातील एक शस्त्र आहे.

Tone of protest | निषेधाचा स्वर

निषेधाचा स्वर

googlenewsNext


- गजानन जानभोर

म्हणूनच नारायण सावरकरांसारख्या वृद्ध गायकाच्या ‘अहिंसक’ निषेधाचे स्वर या धार्मिक दहशतवादाविरुद्धच्या सत्याग्रहातील एक शस्त्र आहे.

मोमीनपुऱ्याच्या प्रवेशद्वारालगत चबुतऱ्यावर एक मैफील नेहमी सजलेली असते. नारायण सावरकर हा अवलिया तिथे गात असतो आणि चाहते त्याला मनापासून दाद देत असतात. रस्त्याने जात असताना मध्येच कुणीतरी त्यांना थांबवतो आणि गाण्यांची फर्माइश करतो. सावरकरांचे गाणे सुरू होते अन् काही क्षणातच गाणाऱ्यांची शाळा तिथे भरते. वस्तीतल्या नागरिकांचा हा नित्यक्रम झाला आहे. सावरकर फारसे बोलत नाहीत, ते गाण्यातूनच व्यक्त होतात, अष्टौप्रहर गुणगुणत असतात. एखाद्या दिवशी ते दिसले नाहीत की चबुतरा उदासवाणा वाटतो. कुणी कौतुक करावे, गायक म्हणून सन्मान द्यावा यासाठी सावरकर गात नाहीत. ते गाणे जगतात. त्यांच्या नसानसात, प्राणात ते भिनलेले आहे.
परवा गुलाम अलींची गझल गाताना ते दिसले. रफींचा हा दिवाना गुलाम अलींच्या प्रेमात? अचानक हा बदल कसा? सावरकर म्हणाले, ‘रफींचा मी भक्त आहेच. पण गुलाम अलींचा मुंबईतील कार्यक्रम काही लोकानी होऊ दिला नाही. त्या दिवसापासून मी अस्वस्थ आहे. मुठी आवळून, चौकात उभे राहून मला या गुंडांचा निषेध करायचा होता. पण सामान्य माणूस म्हणून व्यवस्थेने माझ्या निषेधाला काही कुंपणं घालून दिली आहेत. मी एकटा आहे, दुबळा आहे. ते झुंडीने येतात. पण घाबरून कसे चालेल? म्हणून मी रोज गुलाम अलींची गझल गातो आणि माझ्या परीने निषेध करतो’. गाणे माणसाला आनंद देते. दुभंगलेली मने जोडते. मग कथित राष्ट्रभक्त सांगतात त्याप्रमाणे, दहशतवादी जन्मास घालावेत आणि बॉम्बस्फोट घडवून आणावेत, एवढी स्फोटके गाण्यात खरीच असतात का? सावरकर गुलाम अलींच्या गझलांमध्ये नेमका त्याचाच शोध घेत आहेत. अभिजित भट्टाचार्य या सडकछाप गायकाच्या टीकेमुळे तर स्वर आणि रागांनाही पुढच्या काळात धर्माच्या सावटाखाली जगावे लागणार आहे.
स्वत:च्या आनंदासाठी गाणाऱ्या या वृद्ध गायकाची अस्वस्थता कलेच्या प्रांतात येऊ घातलेल्या भयावह संकटाची चाहूल आहे. अलीकडे आपला आवाज दडपला जातो. गुलाम अलींना गाऊ दिले जात नाही, दाभोलकर, पानसरेंना कायमचे संपवले जाते. ओवैसी, साक्षी हे वाचाळवीर मात्र सातत्याने विष ओकत असतात. देश, धर्म, जात धोक्यात आल्याची आवई उठवून कधी ग्रॅहम स्टेन्स तर कधी मोहम्मद इकलाखला ठार मारतात. या नराधमांना विरोध करणाऱ्यांचा आवाज दिवसेंदिवस क्षीण केला जात आहे. पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिक, कलावंतांची टिंगलटवाळी केली जाते. खेदाची बाब ही की, हे सर्व सरकारच्या पाठिंब्याने होत आहे. आपल्या विरोधात कुणाला बोलूच द्यायचे नाही, त्याचे गाणे बंद करायचे, आवाज दडपायचा, काळे फासायचे, एवढ्याने ते शांत होत असतील तर ठीक नाहीतर त्यांना शेवटी गोळ्या झाडायच्या. गांधी ते दाभोलकर... धर्मपिसाटांच्या खुनशीपणाचा हा सनातन प्रवास आहे.
धर्माआडून केलेल्या हिंसक कृत्यांचे समाजमनावर उमटलेले ओरखडे दीर्घकाळ असतात. ते पुसले जाऊ नयेत, हीच धार्मिक दहशतवादाची मूलभूत गरज असते. मग गुलाम अलींचे गाणे उधळून लावणे किंवा सुधींद्र कुळकर्र्णींना काळे फासणे या घटना त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक ठरतात. नारायण सावरकरांसारख्या वृद्ध गायकाच्या ‘अहिंसक’ निषेधाचे स्वर म्हणूनच या धार्मिक दहशतवादाविरुद्धच्या सत्याग्रहातील एक शस्त्र ठरते. प्रत्येक वेळी मोर्चात जाता येईल असे नाही, आंदोलनासाठी कार्यकर्ते संघटित होतीलच असे नाही. पण वैयक्तिक पातळीवर एक गोष्ट मात्र करता येईल. अवतीभवती असलेल्या माणसाना आपण गांधी उलगडून सांगू शकतो, हिंदुत्व विखारी करण्यासाठी जन्मास येऊ घातलेली ‘कच्चा आणि पक्का हिंदू’ ही नवी वर्णव्यवस्था हिंदू धर्माच्या अस्तित्वावरच घाला घालणारी कशी आहे, हे समजावून सांगू शकतो. ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेची पाळेमुळे आता जगभरात पसरत आहेत. आपल्या हिंसक कृत्यांना विरोध करणाऱ्या आपल्याच धर्मातील निरपराध बांधवांना ते निर्दयतेने ठार करतात. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून देशातील काही हिंदुत्ववादी संघटना त्याच पद्धतीने स्वधर्मीयांमध्ये दहशत निर्माण करु पाहात आहेत. दाभोलकर, पानसरे, कलबुर्र्गींची हत्त्या त्याचाच एक भाग आहे. त्यांचा अहिंसक मार्गाने निषेध करण्यासाठी सारे बळ एकवटायचे कुठून? नारायण सावरकरांसारखी सामान्य माणसे त्या ऊर्जेचा स्रोत आहेत.

Web Title: Tone of protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.