लेखः 'शत्रू' मोठे, आता आरपारची लढाई; उद्धव ठाकरेंवर ही वेळ का आली?

By संदीप प्रधान | Published: February 18, 2023 07:25 PM2023-02-18T19:25:42+5:302023-02-18T19:44:04+5:30

उद्धव हे आता बरेच पुढे आले असून त्यांना शत्रूंशी लढण्याखेरीज पर्याय नाही. त्यामध्ये एकतर ते नामोहरम होतील. तसे झाले तर बाळासाहेबांचे राजकीय वारस म्हणून ते नापास झाले, असा शिक्का त्यांच्यावर बसेल. जर उद्धव यांना यश लाभले तर त्यांचे राजकीय नेतृत्व उजळून निघेल.

tough time for Uddhav Thackeray; Is Emotional card enough to fight against Devendra Fadnavis, Eknath Shinde, Raj Thackeray, Narayan Rane | लेखः 'शत्रू' मोठे, आता आरपारची लढाई; उद्धव ठाकरेंवर ही वेळ का आली?

लेखः 'शत्रू' मोठे, आता आरपारची लढाई; उद्धव ठाकरेंवर ही वेळ का आली?

googlenewsNext

>> संदीप प्रधान

माझ्याकडे आता काही नाही. तुम्ही लढायला तयार आहात ना? तुम्ही शिवसैनिक हीच माझी ताकद आहे. देशातील हुकुमशाहीविरुद्ध आपल्याला लढायचे आहे, वगैरे शब्दांत 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा'चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रस्त्यावर उतरून आवाहन करीत होते. उद्धव यांच्या राजकीय जीवनातील सर्वात संघर्षमय काळाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी नारायण राणे, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांनी संघर्षमय काळ पाहिला. परंतु त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे उद्धव यांच्यासोबत होते. राणे व राज यांनी उद्धव यांना हादरा दिला असला तरी पक्ष, चिन्ह व खासदार-आमदार इतक्या मोठ्या संख्येने काढून घेतले नव्हते. त्यामुळे उद्धव यांच्याकरिता अस्तित्वाची लढाई नव्हती. यावेळी उद्धव यांच्यासमोरचा शत्रू म्हणा किंवा प्रतिस्पर्धी मोठा आहे. देशाचे सर्वशक्तीमान पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय ताकद व राजकीय चातुर्याशी उद्धव यांना मुकाबला करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या शिवसेनेच्या खाचाखोचा जाणणाऱ्या, कार्यकर्त्यांना सढळ हस्ते मदत करणाऱ्या, संघटनात्मकदृष्ट्या पक्क्या असलेल्या नेतृत्वाला मोदी-शाह यांनी पाठिंबा दिला आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याचे हातातोंडाशी आलेले मुख्यमंत्रीपद, मविआ सरकार स्थापन करून उद्धव यांनी हिरावून घेतल्याने हा नेताही उद्धव यांना नामोहरम करायला रिंगणात उतरला आहे. नारायण राणे यांच्यासारखा मनगटशाहीत प्रविण नेता हा तर गेली कित्येक वर्षे उद्धव यांना पाणी पाजण्याकरिता संधीची वाट पाहत आहे. मनसे पक्षाला उभारी मिळावी याकरिता गेली एक तप तपश्चर्या केलेले राज ठाकरे हेही संधीची वाट पाहत आहेत. थोडक्यात काय तर उद्धव यांनी राजकारणात निर्माण केलेल्या शत्रूंची यादी अशी भलीमोठी आहे. राजकारणात एका मोठ्या शत्रूशी लढताना चार छोटे शत्रू निर्माण करायचे नसतात किंवा चार छोटे शत्रू निर्माण झाले असतील तर मोठ्या शत्रूच्या वाट्याला जायचे नाही. परंतु, उद्धव हे आता बरेच पुढे आले असून त्यांना शत्रूंशी लढण्याखेरीज पर्याय नाही. त्यामध्ये एकतर ते नामोहरम होतील. तसे झाले तर बाळासाहेबांचे राजकीय वारस म्हणून ते नापास झाले, असा शिक्का त्यांच्यावर बसेल. जर उद्धव यांना यश लाभले तर त्यांचे राजकीय नेतृत्व उजळून निघेल. भविष्यात बाळासाहेब यांच्या नावाचा फारसा आधार न घेता तेच त्यांच्या नव्या पक्षाचे नेते होतील. त्यामुळे उद्धव यांच्याकरिता ही आरपारची लढाई आहे.

उद्धव यांच्यावर ही वेळ येण्याची काही प्रमुख कारणे आहेत. उद्धव हे उत्तम छायाचित्रकार आहेत. राजकारण हा त्यांचा पिंड आहे की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. चोवीस तास राजकारण हे त्यांना मान्य नाही. संपर्क, संवादाच्या युगात उद्धव यांच्यापर्यंत पोहोचण्यात साऱ्यांनाच अनंत अडचणी येतात. पक्षाला रसद पुरवणाऱ्या व पक्षाच्या उपक्रमांना सढळ हस्ते सहकार्य करणाऱ्या नेत्यांसोबत त्यांचा संघर्ष झाला आहे. जो नेता पक्षाला हवी तेवढी मदत देतो तो अन्य मदत न देणाऱ्या किंवा जुजबी मदत देणाऱ्या नेत्यांपेक्षा अधिक अधिकार व सत्तेची अपेक्षा करणार हे उघड आहे. परंतु उद्धव यांना बहुदा हे मान्य नाही. त्यामुळेच नारायण राणे, एकनाथ शिंदे, राहुल शेवाळे, यशवंत जाधव असे अनेक दातृत्व असलेले नेते त्यांच्यापासून दुरावले. १९९९ मध्ये युतीच्या सरकारने दुसऱ्यांदा सत्तेचा कौल मागितला तेव्हापासून शिवसेना-भाजप यांच्यात धुसफूस सुरु झाली. मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार या कल्पनेने भाजपने पाठिंब्याची पत्रे वेळेवर दिली नाही. परिणामी दोन्ही काँग्रेसची आघाडी सत्तेवर आली.

उद्धव यांच्याशी आपले फारसे जमणार नाही याची जाणीव महाजन-मुंडे यांना झाली होती. शिवसेनेतही राणे यांच्या महत्वाकांक्षेला वेसण घालण्याचे काम उद्धव यांनी सुरू केले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांचे सरकार पाडण्याच्या राणे यांच्या प्रयत्नांशी शिवसेनेचा संबंध नाही, हे बाळासाहेबांच्या मुखातून वदवून घेण्यात उद्धव यशस्वी झाल्याने राणे संतापले. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव व राणे यांच्या संघर्षात शिवसेनेच्या किमान १५ ते १६ उमेदवारांचा पराभव झाला. त्यानंतर राणे यांनी बंडाचे निशाण फडकवले. उद्धव व राज यांच्यात सत्तेचे वाटप करण्याकरिता बाळासाहेबांनी प्रयत्न केले. उद्धव-राज एकवेळ राजकारण सोडतील पण नाते तोडणार नाहीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र राज यांना देऊ केलेल्या पुणे व नाशिक शहरांमधील उद्धव यांचा हस्तक्षेप थांबला नाही. त्यामुळे अखेर राज यांनी शिवसेनेतील 'उद्धवराज'ला जय महाराष्ट्र केला. राज यांनी बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेना सोडली. अन्यथा कदाचित शिंदे यांच्यासारखा मोठा दणका राज हेही देऊ शकले असते. 

शिवसेना-भाजप युतीकरिता २००४ ते २०१० हा काळ अत्यंत खराब होता. काही नेत्यांनी पक्ष सोडले. प्रमोद महाजन यांची हत्या झाली. भाजपमधील महाजन-मुंडे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लागल्याने नितीन गडकरी यांचे महत्त्व वाढले. गडकरी यांचे बाळासाहेबांशी चांगले संबंध होते. मात्र विदर्भातील चिमूर या जनसंघापासून भाजपचा प्रभाव राहिलेल्या मतदारसंघावरून गडकरी व उद्धव यांच्यात संघर्ष निर्माण झाला. शेवटपर्यंत उद्धव यांनी हा मतदारसंघ सोडला नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या बंडानंतर युती विस्कळीत झाली. गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने नरेंद्र मोदी यांच्या सुरू असलेल्या कामकाजाची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर स्तुती केली. मोदींनी राज यांना गुजरातचा विकास पाहायला बोलावले. त्यानंतर एकदा मोदी मुंबईत आले. तेव्हा उद्धव यांना भेटण्याची मोदी यांची इच्छा होती. मोदी भेटीला येत असल्याचा निरोप मातोश्रीवर धाडला गेला. मात्र राज यांना मोदींनी गुजरातचे निमंत्रण दिल्याने मोदींवर खप्पामर्जी असलेल्या उद्धव यांनी मोदी यांना 'मातोश्री'चा दरवाजा उघडला नाही. उद्धव-मोदी यांच्या संबंधात मिठाचा खडा हा त्याचवेळी पडल्याचे सांगितले जाते. त्यानंतर मोदी यांचा देशपातळीवर उदय झाला.

यापूर्वी राणे यांच्याशी झालेल्या संघर्षानंतर शिंदे यांच्याशी तरी उद्धव यांनी जुळवून घ्यायला हवे होते. मात्र मविआचे सरकार स्थापन केल्यावर उद्धव यांनी मुख्यमंत्रीपद स्वत:कडे घेतले. पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचा वाद थांबवण्याकरिता आदित्य यांना मंत्री केले. शिंदे यांना नगरविकास विभागासारखे महत्त्वाचे खाते दिले, तरी अनेक महत्त्वाच्या निर्णयात आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांचा हस्तक्षेप सुरू असल्याच्या तक्रारी खुद्द शिंदे यांनी उठावानंतर केल्या. गटनेते असतानाही विधान परिषदेच्या निवडणुकीतील मतदानाच्या व्यूहरचनेपासून दूर ठेवणे, अयोध्या दौऱ्याकरिता रसद पुरवूनही महत्त्व न देणे अशा असंख्य कारणांमुळे शिंदे यांची नाराजी शिगेला पोहोचली. कोरोना, उद्धव यांचे आजारपण व त्यांच्या सभोवती असलेली चौकडी यामुळे मंत्री, आमदार यांनाही त्यांची भेट मिळत नव्हती. अगोदरच संपर्काबाबत कच्चे असलेल्या उद्धव यांच्याशी संपर्काची दरी निर्माण झाल्याने वेगवेगळ्या मंत्री, आमदारांमधील खदखद हेरून भाजपने त्यांच्यावर संभाव्य कारवाईचे फास टाकले किंवा आमिषांचे मधाळ बोट दाखवले. त्यामुळे शिवसेनेला भगदाड पडले.

शिंदे यांच्यासोबत सुरुवातीला १६ आमदार गेले. मात्र हळूहळू अनेकांनी मातोश्रीवर जाऊन चहा-नाश्ता घेऊन गुवाहाटीकडे प्रयाण केले. हे शिवसेनेत प्रथमच घडत होते. छगन भुजबळ फुटले तेव्हा त्यांना शोधत शिवसैनिक मुंबई ते नागपूर फिरत होते. ज्यांना जायचे त्यांनी निघून जावे ही 'लोकशाहीवादी' भूमिका शिवसेनेत प्रथमच पाहायला मिळाली. शिंदेंना लाभलेल्या त्याच पाशवी बहुमताने आणि विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता भावनिक होऊन राजीनामा देण्याच्या उद्धव यांच्या दोन निर्णयांनी त्यांना पक्ष व चिन्ह गमवावे लागले. 

शिवसेनेतील फूट पाहिल्यावर आपण व्हीक्टीम कार्ड खेळायचे व भावनेच्या लाटेवर आपण यशस्वी होऊ हे पहिल्या दिवसापासून बहुदा उद्धव यांनी ठरवले असावे. मात्र गेल्या काही वर्षात राजकारणाची पद्धत बदलली आहे. राजकारणातून पैसा व पैशातून राजकारण या दुष्टचक्रात निवडणुका अडकल्या आहेत.  राजकारणातील पैशाचा प्रभाव वाढला आहे. भावनेच्या लाटेवर एवढे मोठे आव्हान परतवण्याकरिता लागणारी शिवसैनिकांची कुमक उद्धव यांच्याकडे आहे का? बाळासाहेब आणि शिवसेना यांचे नाते याबाबत अनभिज्ञ असलेल्या, मोदींच्या प्रतिमेवर भाळलेल्या आणि हिंदुत्व-राष्ट्रवाद या भाजपच्या परवलीच्या शब्दांची मोहिनी असलेल्या तरुण वर्गावर उद्धव यांच्या भावनिक मुद्द्याचा किती परिणाम होईल, असे अनेक किंतू-परंतु आता निर्माण झाले आहेत. उद्धव व आदित्य यांना सांभाळून घ्या, असे भावनिक आवाहन बाळासाहेबांनी एका अखेरच्या सभेत केले होते. मतदारांनी जर उद्धव यांना सांभाळून घेतले तर बाळासाहेबांच्या आवाहनाला दिलेला तो अखेरचा प्रतिसाद असेल.
 

Web Title: tough time for Uddhav Thackeray; Is Emotional card enough to fight against Devendra Fadnavis, Eknath Shinde, Raj Thackeray, Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.