शूर बालकाची शोकांतिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2017 12:11 AM2017-06-03T00:11:18+5:302017-06-03T00:11:18+5:30
२०१६ चा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळालेला नीलेश भिल हा बालक भावासह बेपत्ता आहे. एकाचे आयुष्य वाचविणारा नीलेश मात्र जगण्याच्या लढाईत बालपण हरवत होता...
जलाशयात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविणाऱ्या आणि या धाडसाबद्दल राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळविलेला १२ वर्षीय नीलेश रेवाराम भिल हा बालक सात वर्षीय भावासह १५ दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, चौफेर तपास करूनही त्याचा शोध लागलेला नाही. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या बालकाच्या बेपत्ता होण्याने अनेक अस्वस्थ प्रश्न निर्माण झाले आहेत. नीलेश हा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या गावातील रहिवासी. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यामुळे कोथळी गाव प्रसिद्ध आहे, त्यात नीलेशमुळे आणखी भर पडली. कोथळीला संत मुक्ताबाईचे मंदिर आहे. तेथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. जलाशय असल्याने अंघोळ करून भाविक दर्शनाला जातात. ३० आॅगस्ट २०१५ रोजी बुलढाण्याचे भागवत ओंकार उगले हे भाविक जलाशयात बुडत असताना नीलेशने त्यांना वाचविले. नीलेशने दाखविलेल्या धाडसाबद्दल गावकऱ्यांनी कौतुक केले. त्याच्या शौर्याची दखल शासकीय पातळीवर घेण्यात आली. २६ जानेवारी २०१६ रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला. छोट्या गावातील आदिवासी मुलाच्या शौर्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेल्याने खान्देशात आनंदोत्सव साजरा झाला. नीलेशचे वडील रेवाराम आणि आई सुंदराबाई यांचे कोथळीत गावकुसाबाहेर घर आहे. आशापुरी मंदिराजवळ त्यांचे कुडाच्या भिंती आणि पत्र्याचे छप्पर असलेल्या घरात चौकोनी कुटुंब राहते. आई-वडील हातमजुरी करतात. नीलेश आणि गणपत गावातील शाळेत जातात. राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळाल्यानंतर नीलेशचे महिनाभर कौतुक झाले. राजकीय मंडळी, शासकीय अधिकारी, स्वयंसेवी व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी कोथळीत जाऊन नीलेशसोबत ‘फोटोसेशन’ केले. चांगल्या शाळेत शिक्षण, घरकुल अशी आश्वासने देण्यात आली. सायकलीशिवाय कोणतेही आश्वासन दीड वर्षात पूर्ण झालेले नाही. ‘मोठेपणी डॉक्टर व्हायचेय’ असे स्वप्न देशाच्या पंतप्रधानापुढे मांडणाऱ्या नीलेशचे बालपण जीवनाची लढाई लढण्यात करपत होते. शिक्षणाची आवड असताना पोटाची खळगी भरण्यासाठी बकऱ्या चारण्याचे काम करावे लागत होते. अनिच्छेने तो हे काम करायचा आणि नाराज असायचा, अशी माहिती ग्रामस्थांकडून आता समोर येत आहे. नीलेश व गणपतच्या बेपत्ता होण्याने शासकीय व पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली. आई सुंदराबाईच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलीस दलाने २० कर्मचाऱ्यांचे विशेष पथक नियुक्त करून कसून शोध सुरू केला. वनविभाग आणि श्वान पथकाची मदत घेत नजीकचे जंगल पिंजून काढण्यात आले. भावंडांची छायाचित्रे असलेली पत्रके बसस्थानक व रेल्वेस्थानकावर लावण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेरे तपासून शोध घेतला गेला. ‘ट्रॅक द मिसिंग चाइल्ड’ या हायटेक यंत्रणेचा उपयोग करीत माग काढण्यात आला. पंतप्रधान कार्यालयाकडूनही अपहरणाविषयी माहिती घेण्यात आल्याने पोलीस दलाने दुप्पट ताकद लावत तपास सुरू केला आहे. आयपीएस अधिकारी नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शक्यता पडताळून पाहण्यात येत आहे. नीलेशला पुरस्कारावेळी मिळालेली रक्कम ही शासनातर्फे त्याच्या नावे मुदत ठेव करण्यात आली आहे. तो १८ वर्षांचा झाल्यावर ही रक्कम त्याला मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक कारण बाद होते. घराच्या छतावर पडलेली नादुरुस्त सायकल आणि शिक्षणाऐवजी बकऱ्या चारायचे करावे लागणारे काम या नाराजीतून तो घरातून निघून गेला आहे काय? बालकांचे अपहरण करून वाममार्गाला लावणाऱ्या टोळीच्या तावडीत तर ही भावंडे सापडली नाहीत ना, या शक्यता पोलीस दल तपासून पाहत आहे. नीलेशचे आई-वडीलदेखील आपल्या परीने परिसरात शोध घेत आहेत. अगदी ज्योतिषाची मदतदेखील त्यांनी घेतली. खान्देशचा हा शूरवीर बालक सुखरूप असावा आणि लवकर घरी परत यावा, अशी प्रार्थना जळगावकर करीत आहेत.
- मिलिंद कुलकर्णी -