‘सी-प्लेन’चा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 03:54 AM2017-12-11T03:54:09+5:302017-12-11T03:54:48+5:30

मुंबईत सी-प्लेन सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा मुंबईतील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल मानावे लागेल. या निर्णयाने मुंबईतील वाहतुकीवर पडणारा ताण काही प्रमाणात का होईना, सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे़

 Transcript of 'Sea Plane' | ‘सी-प्लेन’चा उतारा

‘सी-प्लेन’चा उतारा

Next

मुंबईत सी-प्लेन सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा मुंबईतील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल मानावे लागेल. या निर्णयाने मुंबईतील वाहतुकीवर पडणारा ताण काही प्रमाणात का होईना, सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे़ त्यामुळे या निर्णयाचे स्वागतच करायला हवे़ सी-प्लेनचा प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात असेल का, हा प्रश्न सध्या अनुत्तरित असला तरी नौकायनमंत्री नितीन गडकरी यांनी मात्र तो सर्वसामान्यांना परवडणारा असेल, असे वक्तव्य केलेले आहे. या माणसाचा आतापर्यंतचा प्रामाणिकपणा पाहता, सी-प्लेनची वाहतूक खिशाला मोठी कात्री लावणारी नसावी, अशी आशा करायला नक्कीच वाव आहे. समुद्रातून वाहतूक वाढवण्याकडे केंद्र सरकारचे सुरू असलेले प्रयत्न स्तुत्यच आहेत. सरकार आखत असलेल्या योजना अमलात येण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार आहे़ मुंबईतील वाहतूक समस्या गेल्या काही दशकांपासून अत्यंत भीषण बनलेली आहे. वाहतूक नियोजनाचे प्रयत्न आता गांभीर्याने न झाल्यास हे भविष्यासाठी अत्यंत घातक ठरणार आहे. मुंबईतील लोकल सेवेवर क्षमतेपेक्षा अधिक ताण गेल्या अनेक वर्षांपासून येत आहे. लाखो मुंबईकर दररोज लोकलमधून कोंबल्यासारखा प्रवास करतात. बस, टॅक्सी या सेवाही मुंबईकरांना वाहून ेनेण्यात कमी पडतात. वाहतुकीवरील पर्यायासाठी मेट्रोचे जाळे विणण्याचे काम मुंबईत हाती घेतलेले आहे. सध्या केवळ घाटकोपर-वर्सोवा मार्गावर मेट्रो कार्यान्वित आहे़ मेट्रोचे सर्व टप्पे पूर्ण होण्यासाठी अजून किमान एक दशकाचा कालावधी लागू शकतो. संपूर्ण जाळे विणले गेल्याखेरीज मेट्रोचा पूर्ण लाभ मुंबईकरांना घेता येणार नाही. एलिव्हेटेड रेल्वेचे काम अद्याप कागदावरच आहे. मोनोचा पहिला टप्पा जवळपास नापास म्हणावा, असाच आहे. मोनोच्या दुसºया टप्प्यानंतर तेथील वाहतूक काही प्रमाणात का होईना वाढेल. हे सर्व प्रकल्प भविष्यात वाहतूककोंडी फोडतीलही, पण तूर्तास मुंबईकरांना सहनशीलता बाळगावी लागणार आहे. वाहतुकीचे नवीन पर्याय देताना अधिकाधिक मुंबईकर त्याकडे आकर्षित होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ते परवडणारेही असावे. मुंबईत सर्वसामान्याला परवडेल, सुरक्षित वाटेल, असा पर्याय देणे आवश्यक आहे़ सी-प्लेन हा मर्यादित लोकांसाठी नक्कीच चांगला पर्याय आहे. मात्र त्याबरोबरच नवी मुंबई, ठाणे येथील खाडीचा तसेच मुंबईतील पश्चिम उपनगरांचा व्यापक स्वरूपात जलवाहतुकीसाठी वापर करून घेतल्यास ते नागरिकांसाठी नक्कीच समाधान देणारे ठरेल, यात शंका नाही.

Web Title:  Transcript of 'Sea Plane'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.