या कटकटी चालणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:02 PM2017-12-27T23:02:50+5:302017-12-27T23:02:59+5:30
पाकव्याप्त काश्मिरात घुसून भारतीय सैनिकांनी तीन पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याची घटना देशाला काही काळ आनंद देणारी असली तरी पाकिस्तानसारख्या दीर्घद्वेषी देशाला ती फारसे काही शिकवू शकणारी नाही.
पाकव्याप्त काश्मिरात घुसून भारतीय सैनिकांनी तीन पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याची घटना देशाला काही काळ आनंद देणारी असली तरी पाकिस्तानसारख्या दीर्घद्वेषी देशाला ती फारसे काही शिकवू शकणारी नाही. या घटनेचा कांगावा करून तो देश पुन: त्याच्या भारतविरोधी कारवाया सुरू करील किंवा पूर्वीहून त्या अधिक वाढवील ही गोष्ट निश्चित. गेल्या ७० वर्षांच्या इतिहासाने आणि आजवर चारवेळा पत्कराव्या लागलेल्या पराभवाने ज्याला काही शिकविले नाही तो देश या हल्ल्यातून काही बोध घेईल याची खात्री कुणालाही वाटू नये. हा संघर्ष सीमेचा नाही, तो प्रादेशिक वर्चस्व वाढविण्यासाठीही नाही. भारताशी असलेले पाकिस्तानचे वैर त्याच्या प्रकृती भेदातून व ऐतिहासिक द्वेषभावनेतून आले आहे. त्यावर असल्या कारवाया किंवा भेटीगाठींच्या मलमपट्ट्यांनी फारसा परिणाम व्हायचा नाही. भारताचे वैर हा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख भाग राहिला आहे. जगातील कोणत्याही प्रश्नाकडे पाहण्याची त्याची दृष्टी भारताविषयीच्या द्वेषभावनेतून ठरत असते आणि आता तर त्याला चीनसारख्या महासत्तेचे बळ मिळाले आहे. चीन हा देशही भारताचे द. आशियामधील स्थान दुबळे करण्याच्या प्रयत्नात गुंतला आहे. यासाठी त्याने भारताभोवतीचे सारे देश आपल्या आधीन करून घेतले आहेत. शिवाय भारताच्या पूर्व व पश्चिम सीमेवरील म्यानमार व पाकिस्तानातून आपले औद्योगिक कॉरिडॉर बांधायलाही त्याने सुरुवात केली आहे. रशियाने पाकिस्तानशी आपले संबंध चांगले केले आहेत आणि सेन्टो या अमेरिकेच्या लष्करी गटात पाकिस्तान कधीचेच सामील आहे. शिवाय सगळ्या अरब व मुस्लीम देशांचा पाठिंबाही आता त्याने आपल्या पाठीशी संघटित केला आहे. ही स्थिती भारतालाच जगाच्या राजकारणात एकाकी पाडणारी व पाकिस्तानचे मित्रबळ वाढविणारी आहे. शिवाय आता तो देश अण्वस्त्रधारीही आहे. जे देश लष्कराच्या नियंत्रणात असतात त्यांची दृष्टीही नेहमी शस्त्रांच्या बटनांवर असते. त्यामुळे यापूर्वीचा सर्जिकल स्ट्राइक किंवा आताची सैनिकी कारवाई यावर भारतानेही समाधान वाटून घेण्याचे कारण नाही. पाकिस्तान हा अखंड सावधगिरी बाळगावी असा शत्रूदेश आहे. त्यातून काश्मीर शांत नाही आणि जोवर ते शांत आणि राजकीय दृष्टीने एकमुखी होत नाही तोवर पाकिस्तानचा त्याविषयीचा उत्साह वाढतच जाणार आहे. काश्मिरात आजवर नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता आली, काँग्रेसची आली आणि आता भाजपा-पीडीपीचे सरकार तेथे सत्तारूढ आहे. परंतु तेथील राजकीय व सामाजिक स्थिती भारताला कधी पूर्णपणे अनुकूल राहिली नाही. त्यासाठी भारत, पाक व काश्मीर अशी संयुक्त बैठक व्हावी असे तेथील अनेकांना वाटते. भारत त्याला राजी नाही आणि पाकिस्तानही त्याविषयीची स्पष्ट भूमिका घेत नाही. सारी अडचण या प्रश्नाला असलेल्या ७५ वर्षांच्या इतिहासाची आणि त्याने सगळ्यांच्या भावनांना आणलेल्या धारेची आहे. जोवर हा इतिहास विस्मरणात टाकला जात नाही आणि नव्या वर्तमानाच्या संदर्भात याकडे पाहिले जात नाही तोवर या सीमेवरच्या कटकटी सुरूच राहणार आहेत. त्यासाठी जास्तीच्या मुत्सद्देगिरीची व परस्पर समजुतीची गरज मोठी आहे. दुर्दैवाने त्याच गोष्टीचा दोन देशात सतत अभाव राहिला आहे. परिणामी या कटकटी व सीमेवरील हाणामा-या चालणार आहेत. कधी ते आनंदी तर कधी आपण आनंदी, असेच हे चालेल. अंतिमत: या प्रश्नाचा निकाल त्यातील ऐतिहासिक प्रश्न निकालात निघेपर्यंत लागणार नाही. सबब या कटकटी आता चालायच्याच हे आपणही गृहित धरले पाहिजे. जोपर्यंत पाक आणि चीन यांचे संबंध दृढ आहेत आणि रशियाची त्यांना अनुकूलता मिळणार आहे तोवर पाकिस्तानचे भारतविरोधी उपद्व्याप चालू राहणार आहेत हेही यावेळी ध्यानात घ्यायचे आहे.