डबल इंजिनला ट्रिपल इंजिन, नेमकं कुणाचं...राष्ट्रवादीचं की मनसेचं..?

By अतुल कुलकर्णी | Published: January 22, 2023 05:56 AM2023-01-22T05:56:50+5:302023-01-22T05:56:55+5:30

आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात जोरदार भाषण केलं. आपल्याला दहा मिनिटांचा वेळ दिला होता.

Triple engine to double engine who exactly ncp or MNS | डबल इंजिनला ट्रिपल इंजिन, नेमकं कुणाचं...राष्ट्रवादीचं की मनसेचं..?

डबल इंजिनला ट्रिपल इंजिन, नेमकं कुणाचं...राष्ट्रवादीचं की मनसेचं..?

googlenewsNext

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, सप्रेम नमस्कार.
आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात जोरदार भाषण केलं. आपल्याला दहा मिनिटांचा वेळ दिला होता. आपण तब्बल वीस-बावीस मिनिटं भाषण करून धमाल उडवली. आपल्या भाषणात आपण, 'आम्ही मोदीजींचीच माणसं आहोत', असं जेव्हा सांगितलं, तेव्हा बसल्या जागी मोदीजीही खुदकन हसले. त्यामुळे त्यांच्या शेजारी बसलेल्या देवेंद्रजींनाही हसावं लागलं, असं दीपक केसरकरांनी मीडियाच्या कानात सांगितलं. त्यामुळे मीडिया देखील हसला. जवळच असणाऱ्या मातोश्रीमधून थेट दिल्लीत कपिल सिब्बल यांना फोन गेला. सिब्बल यांनी तुमचा हा डायलॉग थेट निवडणूक आयोगालाच सांगितला. तेव्हा निवडणूक आयोगही गाल्यातल्या गालात हसला आणि त्यात काय नवल, असं म्हणाल्याची खात्रीशीर माहिती केसरकरांनी त्यांच्या विश्वासू लोकांना हळूच सांगितल्याची बातमी आहे. या हसवाहसवीत आपण डबल इंजिनला ट्रिपल इंजिन लागणार हे सांगून टाकलं. तेव्हा तर मोदीजींनीसुद्धा आपल्याकडे चमकून पाहिलं. त्यांना माहिती नसताना तिसरं इंजिन आपण कुठून आणलं, हा प्रश्न कदाचित त्यांना पडला असावा. ज्या व्यासपीठावर साक्षात मोदीजी अधून मध असतात त्या व्यासपीठावरून होणाऱ्या भाषणात त्यांनीच धक्के द्यायचे असतात मात्र आपण धक्के दिले ते आम्हाला भारी वाटलं. शेवटी मराठी बाणा काही असतो की नाही.

असो. सभा झाली. मोदीजी दिल्लीत गेले. लोक मेट्रोमधून प्रवास करू लागले मात्र तिसरं इंजिन कोणाचं यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तिकडे काकांनी पुतण्याला बोलावून तू आता ड्रायव्हिंग सीटवर बसत जाऊ नको, असं सांगितल्याची माहिती आहे. उगाच पुतण्यानं गाडी ठाण्याच्या दिशेने नेली तर काय करायचं.. ?, असा प्रश्न काकांना पडला असावा. तर शिवाजी पार्कात इंजिनाला तेलपाणी करणं सुरू झालंय. इंजिन फडणवीसांकडे जाईल?, का वर्षावर आपल्याकडे येईल यावरून पैजा लागल्या आहेत. काही असो, पण आपण आपल्या भाषणातून धमाल उडवली आहे. राष्ट्रवादीच्या गोटात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. ज्या दिवशी अजितदादा फडणवीस यांच्या दीड दिवसाच्या सरकारमध्ये गेले, तेव्हापासून भाजपमधून कोणीही
अजितदादांवर टोकाची टीका करत नाही, असं संशोधन रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडलं आहे. आपणही आता भाजपसोबत गेलं पाहिजे, असा निष्कर्ष रोहितनी या संशोधनानंतर काढला आहे. जयंत पाटील वेगळीच फिल्डिंग लावून बसल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित दादांसोबत जायचं की जयंतरावांसोबत यावरून राष्ट्रवादीत दोन गट तयार झाल्याचं समजतं. मोठ्या पवार साहेबांचा गट नेमका कोणता ? यावर आता रोहित पवार संशोधन करत असल्याची माहिती आहे. साहेब जर असं काही घडलं आणि एक गट जर फडणवीसांच्या दिशेने गेला तर आपल्याला सागर बंगल्यावर राहायला जावं लागेल का ? आणि सागर बंगल्यातले लोक वर्षावर येतील का..? जरा चांगल्या ज्योतिषाला विचारून घेतलं पाहिजे.

जमलं तर एखादी पूजादेखील घातली पाहिजे. सध्या आपण तिसऱ्या इंजिनाविषयी जरा जपून पावलं टाकली पाहिजेत, असं आम्हाला वाटतं. कारण शिवाजी पार्कात ज्यांच्याकडे मूळ इंजिन आहे, त्यांनी जर त्यांचं इंजिन फडणवीसांच्या घरी न्यायचं ठरवलं तर..? किंवा फडणवीसांनी स्वतःच त्यांचं इंजिन मुंबई महापालिकेसाठी आशिष शेलारांच्या डब्यांना जोडलं तर...? अशा परिस्थितीत आपल्या गाडीचं काय होणार..? उद्या असं काही घडलं तर त्यांची गाडी जास्त डब्यांची होईल आणि आपल्या गाडीचे काही डबे देखील तिकडे जातील... त्यामुळे आपली पंचायत होईल, असं तुम्हाला वाटत नाही का..? अर्थात, तुम्ही आपली गाडी ट्रिपल इंजिनची गाडी होणार, असे सांगितलं आहे. तेव्हा तुम्ही नक्कीच या सगळ्या शक्यतांचा विचार केला असेलच. आम्हाला आपलं उगाच काळजी वाटली म्हणून तुम्हाला सांगितलं

जाता जाता एक महत्त्वाचा मुद्दा... गेले काही दिवस भाजपमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं महत्त्व फार वाढलं आहे. भाजपचे नेते अचानक त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मोदीसाहेब सुद्धा त्यांना दिल्लीत गेल्यावर भरपूर वेळ देत आहेत. त्यामुळे आपल्या मूळ गाडीलाच भलतं कुठलं तरी इंजिन लागणार नाही ना..? हे तपासून बघायला पाहिजे. परवाच्या दौऱ्यात आपण एका भविष्यवाल्याची आणि मोठ्या साहेबांची भेट घालून दिल्याची माहिती आहे. त्यांनाच आपलं देखील विचारून घ्या. कारण सगळे जण जून महिन्यानंतर ग्रह, तारे यांच्यात बदल होणार, असं सांगत आहेत. बाकी सगळं ठीक आहे.

- आपला, बाबूराव

Web Title: Triple engine to double engine who exactly ncp or MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.