पोटनिवडणूक तापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:21 AM2018-04-14T01:21:40+5:302018-04-14T01:21:40+5:30

भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाल्यानंतर अवघ्या साडेतीन वर्षातच पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर सातत्याने टीका करून आणि मुख्यमंत्र्यांना वारंवार लक्ष्य करून भंडारा-गोंदियाचे तत्कालीन खासदार नाना पटोले यांनी डिसेंबर महिन्यात पदाचा राजीनामा दिला.

Troubling by byelection | पोटनिवडणूक तापणार

पोटनिवडणूक तापणार

Next

भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाल्यानंतर अवघ्या साडेतीन वर्षातच पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर सातत्याने टीका करून आणि मुख्यमंत्र्यांना वारंवार लक्ष्य करून भंडारा-गोंदियाचे तत्कालीन खासदार नाना पटोले यांनी डिसेंबर महिन्यात पदाचा राजीनामा दिला. दरम्यान वर्षभरासाठी पोटनिवडणूक घेतली तर वेळ आणि पैशाचा अपव्यय होईल, असे नमूद करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रमोद गुडधे यांनी दाखल केली. ती याचिका उच्च न्यायालयाने खारीज केली. त्यामुळे आता ही पोटनिवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आणि सर्वच प्रमुख राजकीय पक्ष प्रभावी उमेदवाराच्या शोधात लागले. उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक असले तरी त्यांचा दोन्ही जिल्ह्यात प्रभाव आहे का? सामाजिक समीकरणात तो कितपत खरा उतरतो, या दृष्टीने शोधमोहीम राबविली जात आहे. पोटनिवडणुकीच्या तारखेची घोषणा तेवढी शिल्लक आहे. ज्या जोशात नाना पटोले यांनी भाजपवर आगपाखड करीत राजीनामा दिला त्याच दमात काँग्रेसवासी झाल्यामुळे ही पोटनिवडणूक त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. ही लढाई काँग्रेसने जिंकली तर तो पटोलेंचा विजय ठरेल आणि पराभव झाला तर भाजपची ताकद दिसेल. आता पटोलेंच्या पराभवासाठी भाजप संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. आजवर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे काँग्रेसचे मनोबल उंचावले आहे. तसेही वाढत्या महागाईचा फटका भाजपला बसून त्याचा लाभ आम्हाला होईल, असे काँग्रेसला वाटत आहे. असे असले तरी या सर्व राजकीय घडामोडीत भंडारा व गोंदिया दोन जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते प्रफुल्ल पटेल यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पटेलांच्या भूमिकेवर या पोटनिवडणुकीचे यशापयश अवलंबून आहे. आजवरच्या लोकसभेची ही जागा राष्ट्रवादीकडे कायम होती. मागील वेळी राष्ट्रवादी विरूद्ध भाजप असा सामना रंगला होता. परंतु राजकारणात सर्व दिवस सारखे नसतात. त्यावेळी वेगळे लढलेले आता एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांची आघाडी झाली तर ही जागा कोणत्या पक्षाला जाईल? उमेदवार कोण राहील? उमेदवार कोणत्या समाजाचा राहील? आणि या उमेदवारासाठी सारे एकदिलाने काम करतील काय? यावर विजयाची संपूर्ण समीकरणे अवलंबून राहणार आहेत. ही सर्व गृहितके वास्तवात आली तरीही या निवडणुकीचे यशापयश येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईल. परंतु राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे नाना पटोले हे दोन्ही नेते एकत्र आल्यास या पोटनिवडणुकीतील चित्र मात्र वेगळे राहील, यात शंका नाही.

Web Title: Troubling by byelection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.