टीआरएसचा गड आला पण सिंह गेला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 18:49 IST2019-05-27T18:45:23+5:302019-05-27T18:49:55+5:30
तेलंगणा सर्वाधिक जागांवर पुन्हा टीआरएस मात्र मुख्यमंत्र्यांच्या कन्या के. कविता पराभूत;

टीआरएसचा गड आला पण सिंह गेला...
- धर्मराज हल्लाळे
तेलंगणामध्ये सर्वाधिक जागा जिंकून तेलंगणा राष्ट्र समितीने आपला गड मजबूत ठेवण्यात यश मिळविले असले, तरी टीआरएसचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची कन्या कविता यांना निजामाबादमधून पराभव पत्करावा लागला आहे. ज्यामुळे गड आला पण सिंह गेला, अशी स्थिती केसीआर यांची झाली आहे.
लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न देशासमोर उभा करणाऱ्या सत्तारुढ तेलंगणा राष्ट्रसमितीला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या कविता या निजामाबाद मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यांच्याच मतदारसंघात हळदी आणि ज्वारीच्या किमान आधारभूत किमतीसाठी एकूण १८५ उमेदवारांपैकी १७० शेतकरी निवडणूक रिंगणात होते. ज्यामुळे देशातील सर्वाधिक उमेदवारांची संख्या असलेली लक्षवेधी लढत निजामाबादमध्ये झाली. दरम्यान, एआयएमआयएमचे प्रमुख खा.डॉ. असुदोद्दीन ओवेसी यांनी विजय मिळविला. तर खम्मम मतदारसंघात काँग्रेसच्या रेणुका चौधरी यांचा टीआरएसच्या नागेश्वर राव यांनी पराभव केला आहे. तिथेही बांबू उत्पादक शेतकऱ्यांनी टीआरएसची राजकीय कोंडी केली होती.