जनगणनेचा खरा धडा

By admin | Published: August 29, 2015 02:19 AM2015-08-29T02:19:42+5:302015-08-29T02:19:42+5:30

सन २००० ते २०१० या दहा वर्षांच्या काळात देशाच्या लोकसंख्येत झालेली वाढ २०११च्या जनगणनेतून आता जाहीर झाली आहे. तीनुसार देशात हिंदूंची संख्या ७९.८ टक्क्यांएवढी (९७ कोटींवर)

The true lesson of census | जनगणनेचा खरा धडा

जनगणनेचा खरा धडा

Next

सन २००० ते २०१० या दहा वर्षांच्या काळात देशाच्या लोकसंख्येत झालेली वाढ २०११च्या जनगणनेतून आता जाहीर झाली आहे. तीनुसार देशात हिंदूंची संख्या ७९.८ टक्क्यांएवढी (९७ कोटींवर) असून, मुसलमानांची संख्या १४.२ टक्के (१७ कोटीएवढी) नोंदविली गेली आहे. जुन्या जनगणनेच्या तुलनेत मुसलमानांची टक्केवारी ०.२ ने वाढली तर हिंदूंची टक्केवारी ०.२ने कमी झाली आहे. १३० कोटी लोकांच्या विराट देशात हा बदल नगण्य समजावा आणि दुर्लक्षिला जावा असा आहे. मात्र हिंदू आणि मुसलमान या दोन धर्मांच्या भारतीय नागरिकांत सदैव तेढ पाहणाऱ्या व ती वाढवून आपल्या मतांची टक्केवारी मोठी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या राजकारणी माणसांना हा ०.२ टक्क्यांचा लहानसा आकडा त्यांचे प्रचारी मनसुबे आखण्यासाठी पुरेसा आहे. मुळात या जनगणनेने देशातील हिंदूंएवढीच मुसलमानांच्या लोकसंख्येतील वाढही पूर्वीच्या तुलनेत कमी झाली असल्याचे स्पष्ट केले आहे. यातही हिंदूंच्या तुलनेत मुसलमानांची वाढ अधिक मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे नोंदविले गेले आहे. मात्र या तपशिलाचा अभ्यास करून लोकसंख्यावाढीचे मर्म जाणून घेण्यापेक्षा तिचे राजकारण करणे अधिक सोपे व राजकीयदृष्ट्या लाभाचे आहे. आपण देशातील हिंदूंचे तारणहार आहोत असा आव आणणाऱ्या विश्व हिंदू परिषदेसारख्या संघनिर्मित संस्थांना अशावेळी अधिक चेव येणारा आहे व तो तसा आल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसलेही आहे. हिंदूंच्या तुलनेत मुसलमानांच्या संख्येतली टक्केवारीची वाढ कमी असल्याचे वास्तव या मंडळीने लक्षात घेण्याचे अर्थातच कारण नाही व तसे ते त्यांनी घेतलेही नाही. त्यांच्या राजकारणासाठी त्यांना ०.२ हा आकडा पुरेसा व त्यांचे प्रचारयंत्र पुढे नेऊ शकणारा असल्याचे त्यांना वाटत आहे. या जनगणनेने पुढे आणलेली एक महत्त्वाची बाब मात्र याहून वेगळी आहे. समाजाचे शहरीकरण व औद्योगीकरण होत जाऊन तो शैक्षणिकदृष्ट्या प्रगत झाला की त्याच्या लोकसंख्येत घट होऊ लागते असेच आजवर मानले गेले. या जनगणनेने हा समज चुकीचा ठरविला आहे. त्यासाठी तिने शेजारच्या बांगलादेशचेही उदाहरण पुढे ठेवले आहे. तो देश मुस्लीमबहुल व लोकबहुल आहे. शिवाय तो शिक्षण आणि औद्योगीकरण या क्षेत्रातही मागे आहे. तरी त्याच्या लोकसंख्येत पूर्वीच्या तुलनेने गेल्या दहा वर्षांत झालेली वाढ कमी आहे. नेमकी हीच गोष्ट पश्चिम बंगाल या भारताच्या पूर्वेकडील राज्यातही घडली आहे. आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात प. बंगाल हे राज्य देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत मागे राहिले आहे. त्याचे शहरीकरणही इतरांच्या तुलनेत कमी आहे. असे असतानाही त्या राज्याची लोकसंख्या पूर्वीएवढी न वाढता कमी राहिली आहे. वास्तव हे की प. बंगालमधील लोकसंख्येत झालेली वाढ स्कॅन्डिनेव्हिएन देशांच्या तुलनेतही कमी भरली आहे. नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क किंवा फिनलंड हे स्कॅन्डिनेव्हिएन देश त्यांच्या लोकसंख्येच्या शून्य वाढीसाठी साऱ्या जगात आता ज्ञात आहेत ही बाब येथे महत्त्वाची ठरावी. उत्पन्न कमी असणे आणि कुुटुंबाच्या गरजा मोठ्या असणे हे आर्थिक वास्तव लोकसंख्येतील या तुटीचे खरे कारण आहे. आपण आपले कौटुंबिक दायित्व पूर्ण करू शकत नसल्याची जाणीवही कुटुंबातील नव्या पिढ्यांची संख्या कमी करणारे ठरते असाच या तुटीचा धडा आहे. लोकसंख्येच्या वाढीचा वा तिच्या कमी होण्याचा संबंध दरवेळी धर्माशी वा जातीशी जोडण्याचे कारण नाही असाही या जनगणनेचा एक सांगावा आहे. त्याचवेळी लोकसंख्यावाढीचे हे चित्र धर्मवार वेगळे असण्यापेक्षा प्रदेशवार वेगळे असल्याचे आढळले आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश ही देशातली सर्वाधिक गरीब राज्ये आहेत आणि त्यातील शासकीय व्यवस्थापनही कमालीचे दुबळे राहिले आहे. या राज्यांत लोकसंख्येच्या वाढीचा व मृत्यूचा दर देशात सर्वात मोठा राहिला आहे. हे दोन्ही दर पुन्हा हिंदू व मुसलमान या दोन्ही धर्मातील लोकांना सारखेच लागू आहेत. या जनगणनेने निर्माण केलेले एक आशादायक चित्र या देशातील वाढलेल्या तरुण वर्गाचे आहे. १५ ते ३५ या वयोगटातील जनसंख्येत मोठी वाढ दर्शविली गेली आहे व ती भारताला जगातील सर्वाधिक तरुण व कार्यक्षम देश ठरविणारी आहे. चीन आणि अमेरिका या देशांत वयोवृद्धांची संख्या तुलनेने अधिक वाढत आहे. भारताची तरुणाई ही त्याच्या प्रगतीला हातभार लावणारी आहे असेच एपीजे अब्दुल कलामांपासून सारे ज्ञानवंत देशाला सांगत आले आहेत. या तरुणाईच्या हातांना काम देणे व तिची सक्षमता सक्रिय करणे हे देशापुढील सर्वात महत्त्वाचे आव्हान आहे. सरकार व सामाजिक संस्था यांचे या संदर्भातील उत्तरदायित्व मोठे आहे. देशातील औद्योगिक घराण्यांसाठीही ही एक अपूर्व अशी संधी आहे. जनगणनेचे हे चित्र स्वागतार्ह आहे व तसेच त्याकडे पाहिले पाहिजे. मात्र तसे न करता त्याचा समाजातील धार्मिक व विशेषत: हिंदू आणि मुसलमान यांच्यातील तेढीसाठी राजकीय वापर करणारे लोक केवळ विकासाचेच वैरी ठरत नाहीत, ते सामाजिक व राष्ट्रीय ऐक्याचेही शत्रू आहेत. वरवर दिसणाऱ्या गोष्टींचे भांडवल करणे सोपे आहे. त्या गोष्टींच्या मागे जाऊन खऱ्या वास्तवाचे स्वरूप ओळखणे हे केवळ अभ्यासू व ज्ञानी माणसांचेच काम नाही, ते देशभक्तांचेही काम आहे.

Web Title: The true lesson of census

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.