नेम अचूक, आता कौशल्याची खरी कसोटी; आपल्या सहकाऱ्यांच्या आकांक्षांची पूर्तता करणे हे उद्धवजींसाठी मोठे आव्हान
By विजय दर्डा | Published: December 2, 2019 12:38 AM2019-12-02T00:38:34+5:302019-12-02T00:52:18+5:30
महत्त्वाची गोष्ट ही होती की, त्यांना स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते.
- विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
उद्धवजी ठाकरे यांच्याशी माझी जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच राहील, असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. भाजपने हे जर मान्य केले नाही तर आम्ही कुणासोबतही जाऊ शकतो, कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर एखाद्या शिवसैनिकाला बसवेन, असे वचन बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते, ते जरूर पूर्ण करीन, असेही त्यांनी म्हटले होते. त्या वेळी मला वाटले नव्हते की, ते एवढी हिंमत दाखवतील, पण त्यांनी ते करून दाखवले.
महत्त्वाची गोष्ट ही होती की, त्यांना स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. त्यामुळे ते विधानसभा निवडणुकीत उतरले नव्हते. पण परिस्थितीने असे वळण घेतले की, घड्याळाचे काटे त्यांच्या नावावरच थांबले. महाविकास आघाडीला स्वरूप देणाऱ्या शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले होते की, जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नाहीत तर हे सरकार स्थिर असणार नाही. पवार साहेब आणि खरगेजींनी ही गोष्ट माझ्याजवळदेखील बोलून दाखवली होती. तेव्हा स्थायी सरकार स्थापन व्हावे हे सर्वांचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्टच दिसत होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना संमती देणे भाग पडले.
नवीन मुख्यमंत्री जेव्हा कार्यभार सांभाळतो तेव्हा जनता आणि नोकरशाही यांच्यात त्यांच्याविषयी चर्चा सुरू होते. नव्या मुख्यमंत्र्यांची भूमिका काय असेल, याचे ते विश्लेषण करू लागतात. सामान्य माणसाला वाटते की, नवीन सरकार आपल्या आकांक्षांची पूर्तता कितपत करेल? त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल याविषयीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ते आता एका पक्षाचे नसून राजकीय आघाडीचे मुख्यमंत्री आहेत. त्या आघाडीचे स्वत:चे आकलन आहे तसेच स्वत:चे काही हेतूसुद्धा आहेत. त्यांची पूर्तता व्हावी असाच त्यांच्याकडून प्रयत्न होत राहील, मग ते राष्ट्रवादीचे असोत की काँग्रेसचे असोत. त्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सल्ल्यानुसार काम करावे लागेल आणि त्यांना मजबूत विपक्षाशी सामना करावा लागेल.
महाराष्ट्राच्या विकासाविषयी त्यांच्या धारणा आहेत, तसेच काही स्वप्नेदेखील आहेत. पण त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष कितपत साथ देतील, हे काळच सांगू शकेल. महाविकास आघाडीने जो किमान समान कार्यक्रम आखला आहे, त्यात शेतकऱ्यांसाठी अनेक अभिवचने देण्यात आली आहेत. समाजाच्या अन्य घटकांसाठीसुद्धा काही अभिवचने देण्यात आली आहेत. ती पूर्ण कशी होतील? कारण सरकारी खजिन्याची अवस्था वाईट आहे. पैशाची टंचाई आहे. अनेक कामे ही केंद्र सरकारकडून मिळणाºया मदतीवर अवलंबून आहेत. तेव्हा त्यांना याबाबतीत केंद्राकडून कितपत सहकार्य मिळते, तेही पाहावे लागेल. कारण केंद्रात भाजपचे सरकार आहे, ज्यांच्यासोबत शिवसेनेने निवडणुकीत सहकार्य केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी भाजपसोबत फार मोठा संघर्ष करावा लागला होता. ती गोष्ट भाजप विसरणार नाही. तसेच भाजपने शिवसेनेला संपविण्याचेच कसे प्रयत्न केले होते, शिवसेनेसोबत कशा तºहेने व्यवहार केले होते, ही गोष्ट शिवसेनासुद्धा विसरणार नाही.
हे सारे असले तरी हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले पाहिजे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यासाठी सरकारला अनेक तडजोडी कराव्या लागणार आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात त्यागही करावा लागणार आहे. तुलनात्मक दृष्टीने बघितले तर देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ही आव्हाने नव्हतीच. आमदार ते मुख्यमंत्री असा देवेंद्रजींचा सुलभ प्रवास होता. त्यांना कार्यपालिकेत काम करण्याचा अनुभव होता. आपल्या कामकाजातून त्यांनी स्वत:ची भूमिका स्पष्ट केली होती. त्यांना त्यांच्या कामात कुणाचा हस्तक्षेप सोसावा लागला नाही. दिल्लीकडूनही त्यांच्या कामात ढवळाढवळ करण्यात आली नव्हती. उद्धवजींच्या कामात भलेही दिल्लीचा हस्तक्षेप नसेल, पण महाआघाडीच्या माध्यमातून अनेक पक्षांचा हस्तक्षेप होणार आहे. तसेच त्यांच्यासोबत जी अनुभवी नेत्यांची फौज आहे, त्या सर्वांचा ताळमेळ जुळवून आणणे सोपे राहणार नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जी चांगली कामे सुरू झाली होती, त्या कामांना कुठे धक्का तर पोहोचत नाही ना, याकडेसुद्धा त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. उद्धवजी ही कामेदेखील पुढे नेतील, अशी मला आशा आहे. उद्धवजींनी राज्यात उद्योगांच्या विकासाकडे विशेषकरून लक्ष पुरवावे, हे मी त्यांना सांगू इच्छितो. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत भर पडेल आणि रोजगारही निर्माण होतील. उद्धवजी हे यशस्वी ठरतील याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, कारण ते थंड डोक्याने आणि विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. ते केव्हाही धांदल करताना दिसत नाहीत. याशिवाय प्रत्येक आघाडीवर त्यांची साथ करणारी रश्मी ठाकरे यांच्यासारखी सहधर्मचारिणी त्यांना लाभली आहे. आपल्या पतीच्या खांद्याला खांदा भिडवून त्या पहिल्या दिवसापासून त्यांची साथ देत आहेत. त्या अत्यंत जागरूक आणि प्रतिभाशाली महिला आहेत. शिवसेना सांभाळण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. त्या उद्धव ठाकरे यांची फार मोठी शक्ती आहेत, यात शंकाच नाही. त्यामुळे आपले नवीन मुख्यमंत्री हे साºया आव्हानांचा समर्थपणे सामना करतील आणि महाराष्ट्राला विकासाच्या नव्या मार्गावर नेतील, याविषयी मला विश्वास वाटतो.