ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यात भयावह धोके

By admin | Published: May 10, 2016 02:35 AM2016-05-10T02:35:48+5:302016-05-10T02:35:48+5:30

अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अद्याप सहा महिने दूर आहे, हे खरे. रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी मिळेल, असे मानले जात आहे

Trump fears of becoming President of the United States | ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यात भयावह धोके

ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यात भयावह धोके

Next

विजय दर्डा (लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)
अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अद्याप सहा महिने दूर आहे, हे खरे. रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी मिळेल, असे मानले जात आहे. काही अनपेक्षित घडले नाही तरच डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन या असतील, असा अंदाज आहे. नोव्हेंबरमध्ये ट्रम्प विरुद्ध क्लिंटन अशी लढत अपेक्षित असली तरी मुळात ट्रम्प यांनी उमेदवारी मिळण्यावरून रिपब्लिकन पक्षात मोठे मतभेद दिसून येत आहेत.
रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी ट्रम्प जेव्हा रिंगणात उतरले तेव्हा ‘प्रायमरिज’मध्ये एकूण १७ इच्छुक उमेदवार होते. तेव्हा ट्रम्प यांच्या लोकप्रियतेचे ‘रेटिंग’ खूपच कमी होते व ते बाजी मारतील असे खुद्द त्यांच्या पक्षातील धुरिणांनाही वाटले नव्हते. शेवटच्या फेरीपर्यंत जे तीन स्पर्धक उरले त्यांनीही माघार घेतल्याने ट्र्म्प यांना उमेदवारी मिळाल्यातच जमा असल्याचे मानले जात आहे. यावरून ट्रम्प आश्चर्य घडवू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे ट्रम्प यांना दुर्लक्षित न करता कदाचित नोव्हेंबरमधील निवडणुकीनंतर तेच व्हाईट हाऊसचे नवे रहिवासी होऊ शकतात, ही शक्यता पूर्णपणे नाकारून चालणार नाही. शिवाय काहीही करून डेमोक्रॅटिक उमेदवाराला हरवायचे व प्रतिस्पर्ध्याकडे सत्ता जाऊ द्यायची नाही या इर्षेपोटी आज विस्कळीत दिसत असलेली रिपब्लिकनांची फळी एकसंधही होईल. त्यामुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची धुरा ट्रम्प यांच्या हाती जाणे किती भयावह आहे याची केवळ अमेरिकेतीलच नव्हे, तर जगभरातील लोकांनी जाणीव करून घेणे गरजेचे आहे. अमेरिकेच्या ध्येय-धोरणांचा आपल्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होत असल्याने या ट्रम्परूपी धोक्याची जाणीव करून घेणे आपणा भारतीयांना तर नितांत गरजेचे आहे. ट्रम्प यांची आतापर्यंतची वक्तव्ये भारतीयांसाठी तरी फारशी आश्वासक नाहीत. अमेरिकेत स्थायिक झालेला भारतीय समुदाय दुर्लक्ष न करता येण्याएवढा प्रबळ आहे व ‘ट्रम्प नकोत, केव्हाच नकोत’ या मोहिमेत त्यांना महत्त्वाची भूमिका बजवावी लागेल.
अडचण अशी आहे की, अमेरिकेत येणारे स्थलांतरित, स्त्रिया, व्यापारी संबंध, ‘नाटो’ किंवा चीन यासारख्या महत्त्वाच्या विषयांवरील ट्रम्प यांची मते अमेरिकी प्रशासनाच्या विपरीत आहेत. न्यूयॉर्क टाइम्सचे एक स्तंभलेखक डेव्हिड ब्रुक्स यांनी ट्रम्प यांच्याविषयी जे लिहिले ते खरेच आहे : ‘डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी पूर्णपणे असराईत असे व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे वास्तववादी अशी काही धोरणे नाहीत. त्यांच्याकडे सल्लागार नाहीत. शिकण्याची त्यांच्यात कुवत नाही. आत्मकेंद्रित स्वभावामुळे त्यांची स्थिती एखाद्या चिरेबंदी किल्ल्यासारखी आहे. आपल्याला काय कळत नाही, याचेही त्यांना भान नाही व ते जाणून घेण्याचीही त्यांना इच्छा नाही. आपण एखादा सोफा खरेदी करताना जेवढी पूर्वतयारी करतो तेवढीही तयारी न करता ते अब्राहम लिंकन यांनी पावन केलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरले आहेत.’ काँग्रेसच्या प्रतिनिधी सभेचे सभापती पॉल रॅन हे अमेरिकी शासन व्यवस्थेत तिसऱ्या सर्वोच्च स्थानावर असलेले रिपब्लिकन नेते आहेत. काही न भूतो असे घडले व राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष हे दोघेही पदाचे कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ ठरले तर देशाची धुरा त्यांच्याकडे येईल एवढे त्यांचे पद उच्च आहे. या पॉल रॅन यांनी ट्र्म्प यांच्या उमेदवारीस पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला. आता यातून मार्ग काढण्यासाठी रॅन व ट्रम्प यांची पुढील आठवड्यात भेट व्हायची आहे. अशा भेटीची वेळ यावी यावरूनच रिपब्लिकन पक्षातील अगतिकता स्पष्ट होते. सध्या तरी दोघांमधील मतभेद सलोख्याने मिटतील, असे दिसत नाही.
अब्जाधीश असलेले डोनाल्ड ट्रम्प लहरी असून, ते राजकारणात नवखे आहेत. मुरब्बी राजकारण्यांना आपण चीतपट करू असा त्यांचा दावा आहे. ट्रम्प यांच्या स्वभावामुळे त्यांच्या निवडून येण्याच्या शक्यता मार खातील एवढीच रिपब्लिकन पक्षाची चिंता नाही. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता त्यांच्यासोबत फरफटत गेलो तर नंतर सिनेटच्या व इतर निवडणुकांमध्ये आपली मोठी अडचण होईल, याची चिंता रिपब्लिकन नेत्यांना लागली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा फैसला केवळ गौरवर्णी, रुढीवादी अमेरिकन पुरुष मतदार ठरवतात, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. महिला, कृष्णवर्णी, हिस्पॅनिक्स, स्थलांतरित असे कितीतरी भिन्न गट निवडणुकीवर प्रभाव टाकत असतात. ट्रम्प नेमक्या याच सर्व मतदार गटांवर आगपाखड करतात म्हणूनच ते भयावह ठरतात. ‘इस्लामिक स्टेट’च्या (इसिस) वाढत्या धोक्याने एकीकडे जग चिंतातूर झालेले असताना, ट्रम्प उघडपणे मुस्लीमविरोधी पवित्रा घेतात. कॉस्मोपोलिटन अशा लंडन शहराने लेबर पार्टीच्या सादिक खान या पहिल्या मुस्लीम मेयरची निवड केली. याच्याशी अमेरिकेतील ट्रम्प यांची वक्तव्ये मुळीच मेळ खात नाहीत. जगाला सध्या दुखऱ्या जखमांवर फुंकर घालणाऱ्या व सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे, या वास्तवाचीच जाण नसलेली व इतरांच्या संवेदनांची फिकीर न करता वाचाळपणा करणारी व्यक्ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येणे जगाच्या दृष्टीने घातक ठरू शकेल. मेक्सिकोमधून होणारी अवैध घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर भिंत बांधणे असो किंवा महिला वा ‘नाटो’विषयी असलेली ट्रम्प यांची मतप्रणाली आपत्तींना निमंत्रण देणारी आहे. एका अमेरिकी टीकाकाराने म्हटल्याप्रमाणे ट्रम्प यांच्या धोरणांमधील फरक एवढाच की, त्यामुळे मरण ओढवणारच आहे. फक्त ते विषप्रयोगाने होणार की बंदुकीच्या गोळीने एवढीच निवड करण्याची त्यात सोय आहे.
आठ वर्षांपूर्वी हिलरी क्लिंटन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरल्या. अमेरिका महिला राष्ट्राध्यक्ष स्वीकारायला कदाचित तयार नसावी, असा समज झाला होता. पण त्यावेळी अमेरिकी मतदारांनी पहिला कृष्णवर्णी राष्ट्राध्यक्ष निवडून जणू स्वत:लाच गौरविले. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी गेली आठ वर्षे स्फूर्तिदायी नेतृत्व दिले व जगभरातील लाखो लोकांसाठी ते एक ‘रोल मॉडेल’ ठरले, यात शंका नाही. त्याच अमेरिकी मतदारांनी यावेळी हिलरी क्लिंटन यांच्यासारख्या क्षमता सिद्ध केलेल्या महिलेची निवड न करता सैल जिभेच्या आत्मकेंद्रित ट्रम्पना निवडले तर तो त्यांच्यासाठी आत्मघात ठरेल. अमेरिकी नागरिकांनी क्लिंटन यांच्या उमेदवारीला पूर्ण क्षमतेने पाठिंबा देणे ही काळाची गरज आहे. नोव्हेंबरमध्ये तसे झाले नाही तर काय होईल या कल्पनेनेही अंगावर काटा उभा राहतो.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
बड्या उद्योगसमूहांना दिलेल्या थकित कर्जांचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. पुनर्गठन या गोंडस शब्दाचा खरा अर्थ म्हणजे कर्जफेड थकविणाऱ्यांना ती चुकती करण्यासाठी अधिक वेळ व अनेकांना अधिक सवलती देणे. मी यवतमाळसारख्या मागास जिल्ह्यातील असल्याने कर्जाच्या ओझ्याखाली भरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जवळÞून जाणतो. त्यामुळे बड्या उद्योगांप्रमाणे कर्जाच्या पुनर्गठनाची सुविधा या शेतकऱ्यांनाही द्यावी, असे मला वाटते. बड्या उद्योगांकडील थकलेल्या कर्जांच्या आकड्यांच्या तुलनेत शेतकऱ्यांकडील थकलेली कर्जे अगदीच नगण्य आहेत. त्यामुळे त्यांनाही सवलत दिली तर देशभरातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील भार हलका होईल. अर्थात हे करण्यासाठी मुळात सत्ताधाऱ्यांकडे योग्य दृष्टिकोन व गरीब, पददलितांच्या व्यथा समजून घेण्याची संवेदनशीलता हवी.

Web Title: Trump fears of becoming President of the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.