ट्रम्पचे युद्ध आता माध्यमांशी
By admin | Published: February 21, 2017 12:12 AM2017-02-21T00:12:52+5:302017-02-21T00:12:52+5:30
आमची वृत्तपत्रे आणि प्रसिद्धीमाध्यमेच आमच्या देशाची शत्रू बनली आहेत’, असे कोणत्याही लोकशाही राष्ट्राच्या नेत्याला न शोभणारे
आमची वृत्तपत्रे आणि प्रसिद्धीमाध्यमेच आमच्या देशाची शत्रू बनली आहेत’, असे कोणत्याही लोकशाही राष्ट्राच्या नेत्याला न शोभणारे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. त्यांच्या स्वभावाचा एक भागच हा की त्यांना कोणीतरी शत्रूस्थानी दिसत असतो आणि त्याच्यावर हल्ला चढवल्याखेरीज त्यांना स्वस्थता लाभत नाही. निवडणुकीपूर्वी त्यांच्यासमोर हिलरी क्लिंटन होत्या, आता अमेरिकेतील प्रसिद्धीमाध्यमे आहेत. आपल्या बेफाम बोलण्यासाठी आणि अफाट कारवायांसाठी त्यांच्या उमेदवारीच्या काळातही त्यांना प्रसिद्धी लाभली होती. त्या निवडणुकीत त्यांनी जी अमर्याद व चमत्कारिक विधाने केली, स्वदेशी वा विदेशी नागरिकांना ज्या तऱ्हेच्या धमक्या दिल्या आणि आपल्या प्रतिस्पर्धी महिला उमेदवाराविषयी जी भाषा वापरली ती त्यांच्या विरोधकांएवढीच त्यांच्या पक्षातील नेत्यांना व कार्यकर्त्यांनाही आक्षेपार्ह वाटली. त्यांचा पक्ष तेवढ्यासाठी तुटलाही. त्यांच्या टीकेच्या माऱ्यातून अमेरिकेत वास्तव्य करणारे विदेशी कामगार, अभियंते, व्यापारी आणि अन्य व्यावसायिकच सुटले नाहीत, तेथील महिलांवर, मेक्सिकन वंशाच्या नागरिकांवर, न्यायाधीशांवर, मुस्लीम धर्मावर आणि जे कोणी त्यांच्या विरोधात जाताना दिसतील त्या सर्वांवर त्यांनी हवे तसे तोंडसुख तेव्हा घेतले. तरीही ते निवडून आले. याचे एक कारण समाजातील एका मोठ्या वर्गाला बेफाट बोलणारी, बेफाम वागणारी आणि आपल्या मर्यादांवर उठून समाजावर गर्जनांचा पाऊस पाडणारी माणसेही कधी कधी आवडत असतात. साध्या सामान्य माणसांनाही अशी माणसे असामान्य वाटत असतात. त्याचमुळे लोकांच्या मताधिक्याच्या बळावर हिटलर जर्मनीचा हुकूमशहा झाला आणि मुसोलिनीसारख्या गुंडावर त्याच्या देशातली माणसे काही काळ प्रसन्न दिसली. भारतातील अशा थोरामोठ्यांची नावे येथे नोंदविणे अवघड नाही. पण ती सगळ्या सुजाण वाचकांना चांगली ठाऊक आहेत. समाजाला वर्षानुवर्षे लुबाडणारी, शेकडो आणि हजारो माणसांच्या नृशंस हत्त्याकांडाला जबाबदार असणारी आणि देशाचा मिळेल तो भाग ओरबाडून खाणारी आपली किती माणसे सत्तेवर आली, राहिली व नंतरच्या काळातही लोकांकडून श्रद्धांजली वसूल करताना दिसली हे येथे नव्याने सांगण्याची गरज नाही. अमेरिकेतील लोकशाही जुनी व जास्तीची प्रगल्भ असल्याने त्या देशात ट्रम्प यांना विरोध करायला त्यांच्याच पक्षातील माणसे पुढे आली. त्यांनी निवडणुकीतही ट्रम्प यांना विरोध केला आणि आजही ते तेवढ्याच ठामपणे त्यांच्या उद्दामपणाला विरोध करताना दिसत आहेत. सिनेटर मॅकेन किंवा सिनेटर मेटिस हे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यापैकी मॅकेन हे त्या पक्षाचे अध्यक्षपदाचे एकेकाळी उमेदवार राहिले आहेत. ट्रम्प यांनी माध्यमांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना ते म्हणाले, ‘सगळे हुकूमशहा माध्यमांची गळचेपी करीतच पुढे जातात आणि साऱ्या देशावर आपली हुकूमशाही कायम करतात’ अमेरिकेतील सगळी मोठी वृत्तपत्रे व दूरचित्रवाहिन्या ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाला वा धमकावण्यांना भ्याल्याचे दिसत नाही. न्यू यॉर्क टाइम्स व वॉशिंग्टन पोस्ट यासारखी मोठी दैनिके आणि सीएनएनसारख्या ख्यातनाम वाहिन्या ट्रम्प यांच्या प्रत्येकच बेफाट विधानाचा आणि अवैध निर्णयाचा समाचार घेत आली. तो घेतानाही त्यांनी तज्ज्ञांना, जाणकारांना व सर्व तऱ्हेची मते बाळगणाऱ्यांना आपल्यासोबत घेतले. परिणाम हा की २० जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेतलेल्या ट्रम्प यांची मान्यता ३८ टक्क्यांएवढी कमी झाली. ५८ टक्के लोकांनी ट्रम्प हे अध्यक्षपदासाठी योग्य नाहीत असे मत नोंदविले. देशभरात त्यांच्याविरुद्ध स्त्रियांनी मोर्चे काढले, कामगारांनी निदर्शने केली, विदेशी वंशाच्या अमेरिकी लोकांनी त्यांचा निषेध केला आणि युरोपातील अमेरिकेची मित्रराष्ट्रेही त्यांच्यावर टीका करताना आढळली. सिनेटने त्यांनी केलेल्या अनेक नेमणुकांना मान्यता नाकारली आणि सांघिक न्यायालयांनी त्यांचे आदेश घटनाबाह्य म्हणून रद्द ठरविले. एवढी विरोधी कमाई ट्रम्प यांना अवघ्या एक महिन्यात करणे जमले ही बाब त्यांच्या वागण्यात नसलेले गांभीर्य व तारतम्य सांगणारी आहे. तशीच ती अमेरिकेतील नागरिकांच्या निर्भय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रकाश टाकणारीही आहे. नेत्याने काहीही करावे आणि अनुयायांनी त्याच्या आरत्याच करीत जाव्या हा भारतीय प्रकार तेथे झालेला दिसला नाही. मोदींनी नोटाबंदी आणली आणि देशातील सामान्य माणसे दिवसेंदिवस बँकांसमोर रांगा लावून उभी राहिली. त्यातली दीडशे माणसे त्याचमुळे मृत्युमुखीही पडली. एवढ्या अपराधासाठी त्यांना धारेवर धरायचे सोडून ‘रांगेत उभे राहणारे लोक त्यांच्या देशभक्तीची परीक्षा देत होते’ असे निर्बुद्ध व निर्लज्ज उद््गार काढणारे लोक आपण आपल्याच देशात पाहिले. आपल्या देशात मॅकेन होत नाहीत, मेटिस दिसत नाहीत, नेत्याच्या चुका दाखवणारे अनुयायी पुढे येत नाहीत. उलट नेत्यांच्या चुकांचे समर्थन करीत त्या चुकाच देशाला समोर कशा नेणाऱ्या आहेत हे सांगणारे त्यांचे भगतच आपल्यात फार. या भगतांनी मॅकेन व मेटिस यांची ताजी वक्तव्ये लक्षात घेऊन आपल्या भूमिकांचा मुळातून विचार करणे आता गरजेचे आहे. भारताला ट्रम्पसारखे राज्यकर्ते परवडणारे नाहीत.