संपादकीय: ट्रम्पशाहीचा हिंसक अस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 05:40 AM2021-01-08T05:40:20+5:302021-01-08T05:41:32+5:30
पीठासीन अधिकारी नॅन्सी पलोसी यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. कॅपिटॉल इमारतीच्या परिसरात या दंगलखोरांनी जाळपोळही केली. शहरभर ती आग आणि धुराचे लोट दिसत होते. या प्रकारामुळे सिनेट व काँग्रेसचे सदस्य घाबरून गेले.
जगातील सर्वात जुनी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी बुधवारी सकाळपासून रात्रीपर्यंत जो काही राडा केला, त्यामुळे अमेरिकन नागरिकच नव्हेत, तर सारे जग हादरून गेले आहे. त्यापैकी अनेकांच्या हातात शस्रे होती, काही स्फोटकेही तिथे सापडली. ट्रम्प समर्थक वॉशिंग्टनमधील अमेरिकेच्या अभेद्य अशा संसद भवनात (कॅपिटॉल) घुसले, त्यांनी थेट सभागृहात प्रवेश केला, एक जण पीठासीन अधिकाऱ्याच्या खुर्चीवर जाऊन बसला, एकाने तिथे गोळीबार केला.
पीठासीन अधिकारी नॅन्सी पलोसी यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. कॅपिटॉल इमारतीच्या परिसरात या दंगलखोरांनी जाळपोळही केली. शहरभर ती आग आणि धुराचे लोट दिसत होते. या प्रकारामुळे सिनेट व काँग्रेसचे सदस्य घाबरून गेले. त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहांतून मार्शल आणि पोलीस संरक्षणात सुरक्षित ठिकाणी न्यावे लागले. बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होण्याच्या काही काळ आधी हा धुडगूस घातला गेला. बायडेन यांना विजयी घोषित करू नये, असाच या डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा प्रयत्न होता; पण संसद सदस्य या दबावाला अजिबात बळी पडले नाहीत आणि त्यानंतर काही तासांनी, मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही सभागृहांनी बायडेन व कमला हॅरिस यांना अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून विजयी घोषित केले. त्यामुळे जो बायडेन यांचा शपथविधी ठरल्याप्रमाणे २० जानेवारीला होईल; पण लोकशाहीचे आपणच रक्षणकर्ते आहोत, अशा रुबाबात सदैव नाकाने कांदे सोलणाऱ्या अमेरिकेत असा भयानक प्रकार घडावा, हे लाजिरवाणे आहे. याला केवळ ट्रम्प हेच जबाबदार आहेत. या प्रकाराचा जगभरात निषेध होत आहे.
भारतानेही चिंता व्यक्त करताना, सत्तांतर शांततेत व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अन्य देशांतील नको असलेल्या सत्ताधीशांना खाली खेचण्यासाठी लोकशाहीचे कारण सांगून सैन्य पाठवणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कसे वागतात, हे यानिमित्ताने जगाला पाहायला मिळाले. या प्रकारात चौघे मरण पावले, अनेकांना अटक झाली आणि राजधानीच्या शहरात १५ दिवसांची आणीबाणी जाहीर करावी लागली आहे. त्यामुळे बायडेन यांच्या शपथविधीला, २० जानेवारी रोजी अमेरिकन जनतेला उपस्थित राहता येईल का, हा प्रश्नच आहे. अमेरिकन जनतेने असे हिंसक राजकारण कधीच पाहिलेले नाही. त्यामुळे तेही हादरून गेले आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपण पराभव मान्य करणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच जाहीर केले होते. पराभव झाल्यानंतरही त्यांनी तो मान्य न करता आपण सत्ता सोडणार नाही, अशी घोषणा केली. प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन भ्रष्ट मार्गांनी विजयी झाले असल्याचा दावा त्यांनी वारंवार केला. कोर्टात धाव घेतली, राज्यांच्या गव्हर्नरवर दबाव आणला; पण अमेरिकन न्यायालये आणि राज्यांचे गव्हर्नर यांनी ट्रम्प यांचे म्हणणे फेटाळून लावले. सर्व बाजूंनी पराभव दिसू लागल्यानंतरही ते बायडेन यांच्या हाती राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सहजासहजी जाऊ नयेत, यासाठी गोंधळ घालत राहिले आणि आपल्या समर्थकांना भडकवत राहिले. हे समर्थक कॅपिटॉलमध्ये घुसले, तेव्हाही ट्रम्प यांनी ‘आय लव्ह यू’ अशा चिथावणीखोर शब्दांत त्यांचे समर्थन केले. त्यावरून हा गोंधळ बहुधा ठरवूनच करण्यात आला असावा, हे स्पष्ट आहे.
एकाच वेळी हजारो लोकांनी राजधानीच्या शहरात येणे, कॅपिटॉलमध्ये घुसणे, हे पूर्वनियोजितच असू शकते. कॅपिटॉल परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त असतो. तिथे सहजपणे फिरणेही अशक्य असते. त्यामुळे या दंगलखोरांना काही पोलिसांचीच साथ असण्याची शक्यता अमेरिकेत व्यक्त होत आहे. या सर्व प्रकारामुळे ट्रम्प प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांनीही जाहीरपणे ट्रम्पविरोधी भूमिका घेतली आणि ट्रम्प यांच्या पक्षाच्या संसद सदस्यांनीही या प्रकारचा निषेध केला. प्रक्षोभक वक्तव्यांमुळे फेसबुक आणि ट्विटरने ट्रम्प यांची खाती बंदच केली. संसदेने बायडेन यांना विजयी घोषित केल्यानंतर मात्र ट्रम्प यांना ‘आपण पराभव मान्य करतो आणि सत्तांतर शांततेत पार पडेल’, असे म्हणावे लागले आहे; पण अमेरिकेतील जनता मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची वादग्रस्त कारकीर्द, एककल्ली कारभार, बेताल वक्तव्ये, हडेलहप्पी आणि चार वर्षांत त्यांनी घातलेला गोंधळ कधीही विसरणार नाही. ट्रम्प यांनी स्वतःहून आपली नाचक्की करून घेतली, असेच अमेरिकेच्या इतिहासात लिहून ठेवले जाईल, हे मात्र नक्की. ट्रम्प यांच्या या वागणुकीचा त्रास त्यांच्या पक्षालाही बराच काळ सहन करावा लागेल.