डॉक्टर-रुग्ण संबंधांत विश्वास हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 03:39 AM2020-02-04T03:39:44+5:302020-02-04T03:40:35+5:30
पवित्र ग्रंथात नमूद केले आहे की, परमेश्वराखालोखाल डॉक्टर हे महत्त्वाचे आहेत. डॉक्टरी व्यवसाय हा उदात्त आहे, असेही म्हटले जाते.
- डॉ. एस. एस. मंठा
पवित्र ग्रंथात नमूद केले आहे की, परमेश्वराखालोखाल डॉक्टर हे महत्त्वाचे आहेत. डॉक्टरी व्यवसाय हा उदात्त आहे, असेही म्हटले जाते. सतराव्या शतकातील फ्रेंच तत्त्वज्ञ व्हॉल्टेअर यांनी म्हटले होते, ‘लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून जे लोक स्वत:च्या कौशल्याचा वापर करतात, ते लोक महान असतात. ते लोकांना जीवनदान देत असल्याने त्यांना परतत्त्वाचा स्पर्श झालेला असतो. अशा तºहेने ज्यांच्याकडे लोकांना रोगमुक्त करण्याची जबाबदारी असते, तरीही त्यांच्यावर लोकांकडून हल्ले का करण्यात येतात? काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये एका हॉस्पिटलमधील डॉक्टरला जमावाने मारहाण केल्यामुळे राज्यातील डॉक्टरांनी काम बंद केल्याने पेचप्रसंग निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णालयात ऐनवेळी दाखल झालेल्या रुग्णांवर उपचार होऊ शकले नव्हते.
आरोग्याशी संबंधित उपचार करताना उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर विश्वास असणे आवश्यक असते. रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांनी कोणती काळजी घ्यायला हवी, याविषयी अनेक नियम आहेत. पण रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाइकांनी काय काळजी घ्यायला हवी, याविषयी मात्र कोणतेच नियम नाहीत. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संबंधात विश्वासार्हतेचा अभाव का जाणवतो?
खासगी रुग्णालयात करण्यात येणाºया उपचारांविषयी काही नियम असावेत का? खासगी रुग्णालयात सुरक्षाव्यवस्था असावी का? अलीकडे दिल्लीत घडलेल्या दोन घटना पुरेशा उद्बोधक आहेत.
गुरगाव येथील खासगी रुग्णालयात एका सात वर्षे वयाच्या मुलीवर उपचार करण्यासाठी रुग्णालयाने १६ लाख रुपयांचे बिल दिल्यावरही त्या मुलीचा मृत्यू झाला. तर दुसºया घटनेत दिल्लीच्याच एका रुग्णालयात २२ आठवड्याच्या एका नवजात बाळाला ते जिवंत असूनही रुग्णालयाच्या चुकीने मृत घोषित करण्यात आले! या दोन्ही घटनांमध्ये उपचार करणारे डॉक्टर आणि रुग्णांचे नातलग यांच्यात मारामारी झाली.
वैद्यकीय निष्काळजीपणा हा सिद्ध करण्यास कठीण असतो. वैद्यकीय चूक दाखवणे तर आणखी कठीण. वैद्यकीय नियम (प्रोटोकॉल) असतानाही अशा घटना घडत असतात. वैद्यकीय निष्काळजीपणा आणि वैद्यकीय चूक यांच्यातील फरक दाखविणारी रेघ अत्यंत बारीक असते. पण रुग्णाच्या नातलगांना त्याच्याशी कर्तव्य नसते. अशा घटना सतत कुठे ना कुठे घडत असतात, ही बाब विशेष चिंताजनक आहे. अमेरिकेतही वैद्यकीय चूक हे मृत्यूसाठी तिसरे किंवा चौथे कारण असते. अशा वेळी डॉक्टर हे अखेर माणूसच असतात आणि चूक ही माणसाकडून होत असते, असे म्हणून या चुकांवर पांघरूण घालता येईल का?
भारतात डॉक्टरांची कामाची स्थिती काय असते? युरोप, अमेरिकेत आठवड्यात ४८ तास काम करणे डॉक्टरांसाठी बंधनकारक असते. भारतात मात्र दिवसाचे २४ तासही डॉक्टरांनी काम करावे, अशी अपेक्षा बाळगली जाते. १३० कोटी लोकसंख्येच्या तुलनेत देशात डॉक्टर, परिचारिका आणि विशेषज्ञ डॉक्टरांचे प्रमाण कमी आहे. दरवर्षी ६३,००० डॉक्टर देशभरात पासआऊट होतात. त्यापैकी १४,५०० हे तज्ज्ञ असतात. त्यातील बरेच डॉक्टर परदेशात जातात. अशा स्थितीत प्रत्येक रुग्णाकडे व्यक्तिगत लक्ष देणे डॉक्टरांना कसे शक्य होईल?
आपल्याला अधिक संख्येत डॉक्टर हवे आहेत, तसेच रुग्णालयातील खाटांची संख्यासुद्धा वाढायला हवी.
सरकारने आरोग्य सेवेला वित्तपुरवठा करण्यासाठी वित्तीय मध्यस्थ नेमण्याची गरज आहे. २०१७ साली देशात ४० लाख पॅसेंजर कारची विक्री झाली. तर मोटरसायकल विक्रीने २ कोटी वाहनांचा टप्पा गाठला. प्रत्येक व्यक्ती मोबाइल फोनवर दरमहा रु.१५० ते रु.२५० खर्च करीत असते. या सर्वांवर किमान रु.२५ सेवाकर बसवला तर त्या उत्पन्नातून अनेक इस्पितळे उभारता येतील, इतकेच नव्हे तर पंतप्रधानांच्या आयुष्मान योजनेसाठीही पैसे मिळतील.
डॉक्टरांच्याही काही आशाआकांक्षा असतात. पण डॉक्टरांविषयी बदला घेण्याची भावना जर वाढीस लागली तर अनेक डॉक्टर व्यवसाय सोडून देतील व पुन्हा या व्यवसायाकडे परतणार नाहीत. तेव्हा सर्वप्रथम आपण वैद्यकीय शिक्षणात सुधारणा घडवून आणण्याचा विचार केला पाहिजे. भारत सोडून अन्य देशात जाणाºया १०० डॉक्टरमागे आपण १००० नवीन डॉक्टर तयार केले पाहिजेत तरच परिस्थितीत सुधारणा होईल.
आपल्या देशात औषधनिर्मितीचा व्यवसाय २०१७ साली ३३ बिलियन डॉलर्सचा होता. तो २०२५ सालापर्यंत १०० बिलियन डॉलर्सचा होण्याची शक्यता आहे. आपल्याकडे औषध विक्रेते आणि डॉक्टर्स यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले असल्याने रुग्णाने कोणते औषध घ्यायला हवे, हे औषध विक्रेते ठरवीत असतात. आपली औषधांची बाजारपेठ ही आकाराने तिसरी मोठी बाजारपेठ आहे आणि औषधाच्या मूल्याच्या बाबतीत भारत तेराव्या क्रमांकावर आहे. जेनेरिक औषधांच्या विक्रीचे प्रमाण ७० टक्के इतके आहे.
एकूणच आरोग्य सेवेची बाजारपेठ खूपच मोठी आहे. या क्षेत्राला मंदीचे भय नसते. उलट या क्षेत्राची सतत भरभराटच होत असते, हे औषधांच्या दुकानातील ग्राहकांच्या गर्दीने दिसून येते. या क्षेत्रात सुधारणा व्हायला हवी अन्यथा आरोग्य सेवा ही सतत आजाराने ग्रस्त राहील व त्यामुळे राज्यांचे आरोग्य सुधारण्याची शक्यता कमीत कमी राहील.