सत्य, अर्धसत्य की पूर्ण असत्य?
By admin | Published: October 9, 2015 04:12 AM2015-10-09T04:12:06+5:302015-10-09T04:12:06+5:30
राजीव गांधी देशाचे पंतप्रधान आणि ग्यानी झैलसिंग राष्ट्रपती असताना दोहोंमधील संबंध फारसे सौहार्दाचे नव्हते ही बाब त्या काळात ज्यांचा देशातील घडामोडींशी नजीकचा संबंध होता
राजीव गांधी देशाचे पंतप्रधान आणि ग्यानी झैलसिंग राष्ट्रपती असताना दोहोंमधील संबंध फारसे सौहार्दाचे नव्हते ही बाब त्या काळात ज्यांचा देशातील घडामोडींशी नजीकचा संबंध होता त्यापैकी कोणीही सांगू शकेल. नव्हे, अनेकांनी तसे सांगून आणि लिहूनही ठेवले आहे. झैलसिंंग १९८२ ते १९८७ दरम्यान राष्ट्रपती होते आणि राजीव गांधी १९८४मध्ये म्हणजे श्रीमती इंदिरा गांधींच्या निर्घृण हत्त्येनंतर पंतप्रधानपदी आले. याचा अर्थ ते पंतप्रधान झाले तेव्हां झैलसिंंग यांचा जवळजवळ निम्मा काळ सरला होता. पण तरीही झैलसिंग यांच्या उत्तर काळात दोहोंमधील संबंध केवळ तणावपूर्णच होते असे नव्हे तर त्यात कटुता निर्माण झाली होती व ती उत्तरोत्तर वाढतच गेली. झैलसिंग राजीव गांधी यांचे सरकार पदभ्रष्ट करण्याच्या विचारात आहेत असे त्याकाळी अधिकारवाणी बोलले आणि लिहिलेही जात होते. पण म्हणून देशाच्या तिन्ही संरक्षण दलांचे ‘सुप्रीम कमांडर’ या नात्याने झैलसिंग लष्करी बळाचा वापर करुन राजीव गांधी यांना पदच्युत करण्याच्या तयारीत होते, असे कोणीही बोलत नव्हते. परंतु तितकेच नव्हे तर त्या काळात दिल्लीतील सत्तेच्या अंतरवर्तुळात ज्यांचा नित्याचा वावर होता, त्यातील अनेकांची जी आत्मचरित्रे दरम्यानच्या काळात प्रसिद्ध झाली, त्यापैकीही कुणी लष्करी उठावासंबंधी वा झैलसिंग यांच्या अतिरेकी मानसिकतेविषयी दुरान्वायनेही सूचित करुन ठेवलेले नाही. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि दीर्घकाळ केन्द्रीय मंत्री राहिलेले अर्जुनसिंह यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या आत्मचरित्रात (्अ ग्रेन आॅफ सॅन्ड इन दि अवरग्लास आॅफ टाईम) भोपाळ गॅस दुर्घटनेसंबंधी लिहिताना, युनियन कार्बाइडचे मुख्याधिकारी वॉरन अॅन्डरसन यांना दिल्लीच्या सूचनेवरुन आपण पलायन करु दिले असे लिहून त्यांनी राजीव गांधी यांच्या दिशेने अंगुलीनिर्देश करताना आपण किती निर्भिडपणे सत्यकथन करतो आहोत असा भास निर्माण केला आहे. पण त्यांनीही राजीव गांधींच्या विरोधात लष्करी उठाव करण्याच्या प्रयत्नांसंबंधी काहीही लिहिलेले नाही. परंतु आज राजीव गांधी आणि झैलसिंग या दोहोंच्याही निधनाला दोन दशकांहून अधिकचा काळ उलटून गेल्यानंतर आजवर न सांगितले गेलेले एक कथित सत्य भारतीय लष्करातील निवृत्त लेफ्टनंट जनरल पी.एन.हून यांनी आपल्या आत्मचरित्राद्वारे (दि अनटोल्ड ट्रुथ) खुले केले आहे. झैलसिंग असा काही कट शिजवीत असल्याची बातमी त्याच काळातील एक केन्द्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल (अलीकडेच तेही एका दुर्दैवी दुर्घटनेत निवर्तले) यांना समजली व त्यांनीच ती हून यांच्या कानावर घातली असेही या आत्मचरित्रात म्हटले आहे. त्यानंतर म्हणे हून यांच्या हाती एक पत्र असे लागले की ज्या पत्रात एकूण तीन अर्धसैनिकी तुकड्यांना दिल्लीकडे कूच करण्याचे आदेश दिले गेले होते. परंतु हून यांचा नंतरचा गौप्यस्फोट अधिक गंभीर आहे. ते म्हणतात, तत्कालीन लष्करप्रमुख कृष्णस्वामी सुंदरजी या कटात सामील होते आणि उपप्रमुख एस.एफ.रॉड्रिग्ज हे तर कटाचे नियंत्रकच होते. ही बाब हून यांनी थेट राजीव गांधी आणि त्यांचे एक सचिव गोपी अरोरा यांच्या कानावर घालून त्यांना म्हणे सावधही केले होते. परंतु नंतरच्या काळात सुंदरजी आणि रॉड्रीग्ज हे दोघे अधिकारी लष्करी सेवेतून सन्मानपूर्वक निवृत्त झाले. स्वत: हून १९८७ सालीच निवृत्त झाले. याचा अर्थ तब्बल २८ वर्षे त्यांनी हे इतके महत्वाचे सत्य त्यांच्या उराशी कवटाळून ठेवले. दरम्यानच्या काळात त्यांच्या या कथनातील एकमात्र रॉड्रीग्ज यांचा अपवाद वगळता बाकी साऱ्यांचे निधन झाले आहे. याचा अर्थ आता हून यांच्या कथनातील सत्यासत्यतेची खातरजमा करणे केवळ अशक्य. खुद्द ग्यानी झैलसिंंग यांच्या मृत्युनंतर त्यांचे जे चरित्र प्रसिद्ध झाले त्यातदेखील राजीव गांधी यांच्या कारभारप्रणालीसंबंधी ते फारसे समाधानी नव्हते, इतकाच आणि तोवर सर्वज्ञात झालेला संदर्भ आहे. परंतु ‘राजीव गांधी-मेनी फॅसेट्स’ या पुस्तकात झैलसिंंग यांच्याशी केला गेलेला एक प्रश्नोत्तररुपी संवाद आहे. राजीव गांधी यांचे सरकार बडतर्र्फ करण्याचा विचार तुम्ही का सोडून दिला या थेट प्रश्नावर झैलसिंग यांनी दिलेले थेट उत्तर असे होते. ‘१९८४ च्या दिल्लीतील दंगलीत शिखांचे जे शिरकाण झाले त्याबद्दल राजीव गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी माझी इच्छा होती व त्याप्रमाणे त्यांनी ती मागितली. दुसरे कारण म्हणजे मी राजीव यांना पदच्युत केल्यानंतर येणारा त्यांचा उत्तराधिकारी अत्यंत दुबळा राहिला असता व त्याचा दुबळेपणा लष्करी राजवटीला आमंत्रण देणारा ठरु शकला असता’. झैलसिंग यांच्या या विधानावरुन एक बाब स्पष्ट होते आणि ती म्हणजे भले त्यांचे राजीव गांधींशी कितीही मतभेद असोत, त्यांना देशात लष्करी राजवट येणे वा आणली जाणे मान्य आणि पसंत नव्हते. तसेही भारतासारख्या खंडप्राय आणि लोकशाहीची पाळेमुळे घट्टपणे रुजलेल्या देशात लष्करी राजवट प्रस्थापित केली जाणे व तत्पूर्वी लष्कराने तसा उठाव करणे कालत्रयी शक्य नाही. परंतु तसा प्रयत्न केला गेला असे लेफ्टनंट जनरल पी.एन.मून छातीठोकपणे सांगतात पण आपल्या कथनाच्या पुष्ट्यर्थ सबळ पुरावे मात्र देत नाहीत, तेव्हां त्यांचे हे अर्धसत्यकथन हा केवळ प्रसिद्धीसाठी केलेला एक खटाटोप ठरतो.