सच मे सच सिर्फ परेशान ही होता है?

By admin | Published: July 1, 2015 03:45 AM2015-07-01T03:45:28+5:302015-07-01T03:45:28+5:30

म्हटलं तर फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आणि म्हटलं तर अलीकडची गोष्ट. या विधानातील विरोधाभासाचं कारण एकच, राजकारणातील तरलता. फटाफट माणसं बदलली,

Is truth really just bothered? | सच मे सच सिर्फ परेशान ही होता है?

सच मे सच सिर्फ परेशान ही होता है?

Next

म्हटलं तर फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आणि म्हटलं तर अलीकडची गोष्ट. या विधानातील विरोधाभासाचं कारण एकच, राजकारणातील तरलता. फटाफट माणसं बदलली, त्यांचे विचार बदलले, निष्ठा बदलल्या की वाटतं, आधीचा काळ जरा जास्तीच लांबवर गेला. छगन भुजबळ आणि बबनराव घोलप तेव्हां एकाच कुणब्यात होते. (आजही ते तसेच आहेत, म्हणतात) त्यामुळे त्यांच्या मागेपुढे झुलणारे झुलकरीदेखील सामाईक असणे, ओघानेच येते. बबनरावांच्या मागे तेव्हां अण्णा हजारे लागले होते. त्यातून एका फुटकळ प्रकरणात, अण्णांना एक किरकोळ सजा झाली. लगेचच एका झुलकऱ्याने आरोळी ठोकली, दूध का दूध, पानी का पानी! आता त्याने कुणबा सोडला, हे सांगण्याची गरज भासू नये. तर मनातील भावना व्यक्त करायला काहींना हिन्दी जरा जवळचीच वाटत असावी, असे दिसते. मग तसे वाटणारा, शिवसैनिक का असेना! इंग्रजीच्या वाटेला आणि वाट्याला हे लोक जात नाहीत, हे तसे बरेच. कदाचित असेही असेल की, मालमोटारींच्या पार्श्वभागावरील साहित्यापायी त्यांची हिन्दी समृद्ध होत असावी आणि ही उसनी समृद्धी अधूनमधून सांडायची त्यांना इच्छा होत असावी. सहवासाने हीच इच्छा भुजबळांच्या मनातही जागृत झाली असल्यास, त्यांना बोल कसा बरे लावता येईल? परिणामी जागृत झालेल्या आपल्या मनातील इच्छेची वाट मोकळी करुन देताना ते नुकतेच उदगारले की, ‘सत्य परेशान को सकता है, पराजीत नही’! मालमोटारींचा पार्श्वभाग, दुसरे काय! स्वत: भुजबळ तसे भाग्य, नशीब, योग यावर विश्वास न ठेवणारे. आपले भाग्य (सर्वार्थाने) आपल्याच हाती यावर दृढ विश्वास असणारे. आणि का असू नये असा विश्वास? तर गेल्या काही दिवसांपासून त्यांचे ग्रह फिरले आहेत, असे म्हणण्याची सोय नाही. त्यामुळेच त्यांनी म्हटले असावे किंवा त्यांना वाटत असावे की, सत्य परेशान होते आहे वा त्याला परेशान केले जाते आहे. हे कोण क्रूर आत्मे असावेत? एसीबी, ईडी की आणखीन वेगळेच कुणी? पण ते आत्ताच एकदम झोपेतून खडबडून जागे कसे झाले? की त्यांचीही कुणी बुद्द्याच झोपमोड केली. खरे तर त्यांना सत्य काय हे कैक दिवसांपासून ठाऊक होते. त्याला परेशान कसे करायचे हेही ठाऊक होते. मग त्यांची वाट कोणी अडवली होती? पण तरीही मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. सत्य म्हणजे काय? अंतिम सत्य अद्याप कोणालाच गवसलेले नाही. अनादि काळापासून त्याचा शोध जारी आहे आणि अनंत काळपर्यंत तो जारी राहणार आहे. मग जे अद्याप कोणाला गवसलेलेच नाही, त्याला परेशान कसे करणार वा केले जाणार? याचा अर्थ सत्य आणि निखळ सत्य असे काही मुळातच नाही. ते ज्याच्या त्याच्या पाहण्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते. हे पाहणेदेखील मग भासात्मक असू शकते. भुजबळांच्या बाबतीत तसेच काहीसे होत नसेल असे नाही. तरीही त्यांना निदान त्यांच्यापुरते तरी सत्य ठाऊक असलेच पाहिजे. ते ठाऊक आहे म्हणूनच आणि सत्य अनेकदा विषाहूनही कडूजहर असते असे म्हटले जात असते म्हणूनही भुजबळांना ही परेशानी परेशान करीत असावी. त्यांचा राजकीय प्रवास जितका ऐश्वर्यपूर्ण तितकाच त्यांचा भौतिक विकासाचा प्रवासदेखील ऐश्वर्यपूर्ण. पुन्हा तो केवळ त्यांच्या एकट्यापुरताच तसा आहे म्हणावे तर तसेही नाही. त्यांच्या नावाचा टिळा ज्यांनी ज्यांनी आपल्या भाळी लावला, तेही आज ऐश्वर्यात लोळत आहेत आणि तेदेखील एक त्यांना एकट्याला भावणारे पण अन्यांच्या भाळीची शीर तडतडविणारे सत्यच आहे. या सत्याला जर कुणी परेशान करीत असेल तर त्याचे दु:ख कोणाला होणार आहे? जोवर खुद्द छगन भुजबळ या व्यक्तीचा एकट्यापुरता प्रश्न आहे तोवर त्यांनी असे हताशा व्यक्त करणारे उद्गार का काढावेत, हे कळण्यापलीकडचे आहे. त्यांच्याकडचे त्यांचे सत्य आजवर अनेकदा असेच परेशान झालेले आहे. पण ती परेशानी त्यांनी लीलया पचवली आहे. येईल ते आणि वाट्टेल ते पचविण्याची त्यांची ही ताकद त्यांनी परिश्रमपूर्वक पैदा करुन विकसीत केली आहे. मग आत्ताच हे कासावीसलेपण कशापायी? मुख्यमंत्री भलेही म्हणोत, आगो आगे देखो होता है क्या! त्यावर लगेचच भुजबळांच्या कपाळी ज्यांचा टिळा आहे ते उद्गारले, आम्ही आता तुरुंगात टाकले जाण्याची वाट बघतो आहोत. हे उद्गार बहिर्गमले आणि अचानक सारे काही शांत शांत झाले. एसीबीकडून रतीबागत माध्यमांकडे पुरविली जाणारी रसद थांबून गेली. सत्यामागे लागलेली परेशानी थांबून पडली की काय? नाही, तसे नाही. सत्यशोधकांना मुंडे-तावडे आदि वेगळ्याच सत्याचा म्हणे शोध लागू लागला. परेशानी त्यांच्या दिशेने वळली. पण मुद्दलात परेशानी तरी खरोखरी सत्याच्याच मागे लागली होती? भुजबळ म्हणतात, सत्य परेशान हो सकता है, पराजीत नही! भुजबळ आणि तत्सम प्रभृतींना जे सत्य आहे असे वाटत असते, ते कदाचित परेशानीनंतर पराजीत होत नसेलही कदाचित. पण ते वास्तव नव्हे. भुबळांसारख्यांच्या मनातील सत्याला परेशान केले जाणे, हे तरी मुळात खरे असते काय? असेलही कदाचित खरे किंवा नसेलही तसे काही कदाचित. पण एक बाब निश्चित आहे, सत्य आणि निखळ सत्य आजवर पराभूतच होत आले आहे. जे पराभूत होत नसते, ते मुळात सत्यच नसते. कारण तो असतो सत्याचा केवळ आभास!

Web Title: Is truth really just bothered?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.