निळ्या आकाशाला भगवा फासण्याचा प्रयत्न
By Admin | Published: April 4, 2016 10:05 PM2016-04-04T22:05:51+5:302016-04-04T22:05:51+5:30
राष्ट्रध्वज ही राष्ट्राची जनमानसाएवढीच जगात असलेली ठळक व वंदनीय ओळख आहे. तिरंगी झेंडा हा साऱ्या जनतेएवढाच जगात भारताची तशी ओळख ठरला आहे.
राष्ट्रध्वज ही राष्ट्राची जनमानसाएवढीच जगात असलेली ठळक व वंदनीय ओळख आहे. तिरंगी झेंडा हा साऱ्या जनतेएवढाच जगात भारताची तशी ओळख ठरला आहे. सामान्य माणसांपासून खेळाडूंपर्यंत आणि देशाच्या नेत्यांपासून सैनिकांपर्यंत साऱ्यांनी गेली ६८ वर्षे त्याला अभिमानाने व विनम्रतापूर्वक अभिवादन केले आहे. या ध्वजाचा इतिहास स्वातंत्र्यप्राप्तीपाशी सुरू होत नाही. देश व त्यातील जनता स्वातंत्र्यासाठी लढत असतानाच या ध्वजाची रचना क्रमाने होत आली. १८५७ पासून १९४७ पर्यंत देशातील तत्कालीन पिढ्या याच ध्वजाच्या सन्मानासाठी व त्याच्या प्रतिष्ठापनेसाठी लढत व मृत्यू पत्करत आल्या. गांधीजींच्या नेतृत्वातील शांततामय पण विराट लोकलढा असो नाहीतर क्रांतिकारकांनी ब्रिटीशांविरुद्ध दिलेले रक्तरंजित लढे असोत, त्या साऱ्यांचे प्रेरणास्थान तिरंगी झेंडा हेच राहिले. अॅनी बेझंट या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या महिलेने तयार केलेल्या तिरंगी झेंड्याच्या मूळ स्वरुपात कालांतराने बदल होत जाऊन आताचा लाल, पांढरा व हिरव्या रंगाचा, मध्यभागी निळे अशोकचक्र असलेला आपला राष्ट्रध्वज तयार झाला. ती कोणा एका भैय्याची वा अण्णाची कारागिरी नव्हती. साऱ्या देशाच्या निष्ठेवर उभे राहिलेले ते राष्ट्रीय ऐक्याचे व एकात्म जनतेचे प्रतीक होते. घटना समितीने मान्यता देऊन त्यालाच आपले सर्वोच्च मानचिन्ह बनविले. या ध्वजाचा इतिहास त्यासाठी व स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांनी खाल्लेल्या खस्ता आणि केलेले बलिदान ज्यांना ठाऊक आहे त्यांना त्याच्या महतीची जाणीव आहे. मात्र जे त्या दिव्य लोकलढ्यापासून दूर राहिले, स्वातंत्र्यलढा हे राजकारण आहे आणि आम्ही केवळ सांस्कृतिक आहोत असे म्हणत स्वत:चे दूरस्थ सोवळेपण जे कोरडेपणे जपत राहिले, ज्यांनी त्या लढ्याची जमेल तेवढी नालस्ती केली, गांधी-नेहरू-पटेल-आझाद या साऱ्यांच्या त्यागाची, कष्टाची व थोरवीची निंदा केली आणि हे करतानाच ब्रिटिशांना वेळोवेळी मदत करून ज्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या पायात बेड्या अडकविण्याचा प्रयत्न केला त्यांना या ध्वजाविषयी प्रेम नसेल वा त्याविषयीचा आकसच त्यांच्या मनात असेल तर त्यांची मानसिकता, त्यांची कीव करीत दयाबुद्धीने समजावून घ्यावी लागते. रा.स्व.संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी तिरंगा ध्वज बदलून त्या जागी भगवा झेंडा हा राष्ट्रध्वज बनवा अशी जी मागणी परवा केली ती या दर्जाची आहे. भगवा झेंडा हा हिंदूंना व त्यांच्या धर्मपरंपरेला नेहमीच आदरणीय राहिला आहे. त्याचे धार्मिक व सांस्कृतिक महात्म्य आजही तसेच आहे. मात्र त्याचा रंग व इतिहास धार्मिक आहे. भारत हा धर्मबहुल, भाषाबहुल व संस्कृतीबहुल जनतेचा देश आहे. त्याच्यावर कोणत्याही एका धर्माचे चिन्ह राष्ट्रीय म्हणून लादण्याचा वा तसे सुचविण्याचा प्रयत्न देशविरोधी, घटनाविरोधी व जनताविरोधी आहे. शीख धर्माच्या पूजास्थानांबाहेर दोन ध्वज असतात. एक धर्माचा आणि दुसरा राजकारणाचा. त्या धर्माचे लोक त्या दोहोंनाही आदराने नमन करतात. मात्र उद्या त्यातले कोणी साऱ्या देशाने त्यातल्या धर्माच्या व राजकारणाच्या ध्वजांना तसेच नमन करावे असे म्हटले तर ती गोष्ट हिंदू तरी मानतील काय? या देशात अल्पसंख्यकांची संख्या २७ कोटींहून अधिक आहे. शिवाय हिंदूंमधील अनेक परंपरा भगवा ध्वज न मानणाऱ्यांच्याही आहेत. मात्र हे सारे बहुसंख्येएवढेच तिरंगी ध्वजाला श्रद्धेने प्रणाम करणारे आहेत. या साऱ्यांवर भगवेपण लादण्याचा प्रकार निळ््या आकाशाला भगवा रंग फासण्याच्या हास्यास्पद प्रयत्नासारखा आहे. मात्र भैय्याजी जोशी एकटे नसतात. त्यांच्या मागे त्यांचा संघ व त्याचा विस्तारित परिवार असतो. त्यात विश्व हिंदू परिषदेपासून विद्यार्थी परिषदेपर्यंतच्या सगळ््या भगव्या संघटना व प्रत्यक्ष भाजपासह त्याचे मोदी सरकार असते. ‘आम्हाला संघाची प्रत्येक आज्ञा मान्य असते’ असे म्हणणारे मुरली मनोहरांसारखे संघभक्त त्या सरकारसोबत असतात. झालेच तर कोणत्याही अल्पसंख्यविरोधी व पुरोगामी विचारांच्या विरोधात असणाऱ्या राजनाथसिंह, इराणी, व्यंकय्या, प्राची व गिरीराज सिंह यांच्यासारखी संघ परंपरेत वाढलेली आणि स्वातंत्र्यलढ्याची सारे आयुष्य निंदा करीत आलेली माणसेही त्यात मोठ्या प्रमाणात आहेत. सबब भैय्याजी जोशींचे वक्तव्य हे त्यांचे एकट्याचे म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. ते त्यांच्या परिवाराचे व त्या परिवाराच्या आज्ञेत असलेल्या सरकारचेही म्हणणे म्हणून पाहिले पाहिजे. भैय्याजींच्या या वक्तव्यावर त्या बोलघेवड्या माणसांपैकी अजून कुणी प्रतिक्रिया दिल्याचे दिसले नाही. अशी प्रतिक्रिया ते देणारही नाहीत. सध्याच्या असहिष्णू व अल्पजनविरोधी उन्मादात ती खपत असेल तर ते गप्पच राहतील व ती तशी खपलीच तर त्या दिशेने पावलेही टाकतील. खरा प्रश्न या एकारलेल्या भगव्यांचा नसून स्वातंत्र्याच्या लढ्याचे स्मरण मनात राखून त्याची मानचिन्हे जपणाऱ्या देशाभिमानी लोकांचा आहे. भारताला हिंदू राष्ट्र म्हणायचे, भगव्याला राष्ट्रध्वज करायचे आणि देशातील अल्पसंख्यजनांना दुय्यम दर्जाच्या नागरिकत्वावर नेऊन ठेवायचे ही या परिवाराची अद्याप जाहीर न झालेली पण त्याच्या मनात असलेली जुनीच योजना आहे. भैय्याजींच्या वक्तव्यामागे एवढे सारे वास्तव दडले आहे.