मोदींचे प्रयत्नपूर्वक स्वत:ची प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न

By admin | Published: March 22, 2016 03:07 AM2016-03-22T03:07:45+5:302016-03-22T03:07:45+5:30

इस्लामी दहशतवाद्यांनी पाश्चिमात्य देशात घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे संपूर्ण जगातील ‘इस्लामोफोबिया’ आता वरच्या टोकाला पोहोचला आहे

Trying to change the image of Modi trying to transform himself | मोदींचे प्रयत्नपूर्वक स्वत:ची प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न

मोदींचे प्रयत्नपूर्वक स्वत:ची प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न

Next

हरिष गुप्ता, (‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर )
इस्लामी दहशतवाद्यांनी पाश्चिमात्य देशात घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे संपूर्ण जगातील ‘इस्लामोफोबिया’ आता वरच्या टोकाला पोहोचला आहे. जर्मनीतील एएफडी सारखे अतिकडवे राष्ट्रवादी पक्ष युरोपच्या राजकारणात वेगाने केन्द्रस्थानी येत आहेत. फ्रान्स, जर्मनी आणि इटलीमधील प्रभावी नेत्यांनी सीरियातील निर्वासितांचे स्वागत केले होते, पण आता त्यांच्याकडे घृणेने बघितले जात आहे. तिकडे अटलांटिकच्या पलीकडे म्हणजे अमेरिकेत इस्लामच्या भीतीचा प्रचार करणारे डोनाल्ड ट्रंप अजूनही त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीच्या शर्यतीमधील इतराना बाजूला सारू शकलेले नाहीत. त्यासाठी ते जनमताचा रोख परकीयांच्या विरोधात वळवण्यासाठी प्रचंड आटापिटा करीत आहेत. या परकीयांमध्ये मेक्सिकन आणि मुस्लीम यांचा समावेश आहे.
जागतिक पातळीवराल या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या सुफी परिषदेत मुस्लिमांना मैत्रीचे संकेत देण्यामागे स्वत:ची प्रतिमा बदलण्याची उत्कटता दिसते. या परिषदेत मोदी म्हणाले की, इस्लाम हा शांतीचा धर्म असून ‘जेव्हा आपण अल्लाच्या ९९ नावांचा विचार करतो तेव्हा त्यातले एकही नाव दमनाचे आणि हिंसेचे समर्थन करीत नाही. त्यांची पहिली दोन नावे दयेचा आणि करुणेचा भाव प्रकट करतात. अल्ला हाच रहमान आहे आणि रहीमही आहे’. २००२च्या गोध्रा दंगलीनंतर मोदींचे टीकाकार त्यांना उन्मत्त हिंदुत्ववादी म्हणत आले असून आता मोदींच्याच तोंडून असे वक्तव्य ऐकणे या टीकाकारांसाठी सुद्धा सुखद आश्चर्याची धक्काच आहे.
परंतु सुफी परिषदेतील मोदींचा हा सहिष्णू दृष्टिकोन अचानक आलेला वा त्यांच्या विचारांच्या विरोधातला आहे असे नाही. फायनान्शियल टाईम्सचे दिल्लीतील माजी प्रतिनिधी जॉन इलिअट यांनी त्यांच्या ‘इम्प्लोजन: इंडियाज ट्रिस्ट विथ रियॅलिटी’ या पुस्तकात लिहिलेल्या एका आठवणीत म्हटले आहे की २००१मध्ये मोदी भाजपाचे राष्ट्रीय सचिव असताना, अल-कायदाने ९/११रोजी अमेरिकेवर चढविलेल्या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी एका चित्रवाणीवर बोलताना हाच दृष्टिकोन बोलून दाखविला होता. इलिअट यांच्या म्हणण्याप्रमाणे मोदी तेव्हां असे म्हणाले होते की, ‘इस्लाममध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत, पण जेव्हा एखादा समूह असे म्हणतो की आमचा धर्म तुमच्या धर्मापेक्षा वेगळा आहे, तुमच्यापेक्षा मोठा आहे आणि जो पर्यंत तुम्ही त्याचा स्वीकार करत नाहीत तो पर्यंत तुम्हाला मोक्ष मिळणार नाही, तेव्हा खरा वाद सुरु होतो’.
इलिअट यांच्या कथनानुसार त्या चित्रवीणी कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदींच्या मनात असलेली इस्लामविषयीची भावना दिसून आली होती. मोदींनी पुढे आणखी सौम्य शब्दात असे म्हटले होते की, ‘जेव्हा एखादी व्यक्ती असे म्हणते की समोरचा धर्म निराशावादी आहे आणि माझा आशावादी आहे, तेव्हादेखील द्वेषभावना जन्मास येऊन हिंसाचार सुरु होतो’.
हे खरे आहे की निर्वाचित पंतप्रधान असतानाही मोदींनी राजधानीतील इफ्तार मेजवानी देण्याची परंपरा खंडित केली आहे. शिवाय अल्पसंख्यकांसोबतचे सहचर्य दाखवण्यासाठी विशेष असे काहीही केले नाही. पण त्यांनी त्यांचा इस्लामविषयीचा विचार काही बदललेला नाही. इतिहासकार जे.एस.राजपूत यांच्या ‘एज्युकेशन आॅफ मुस्लीम्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी मोदी म्हणाले होते की ‘कुराणात इल्म हा शब्द ८०० वेळा येतो. हा शब्द म्हणजे अल्ला या शब्दानंतर सर्वाधिक वेळा उच्चारल्या गेलेल्या शब्दांपैकी एक आहे. इल्म या शब्दाचा अरबीतील अर्थ ज्ञान असा आहे, म्हणून येथे ज्ञानाचे महत्व अधोरेखित होते’.
मोदी सौम्य हिंदुत्व आणि सौम्य इस्लाम यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे उघडच आहे. सौम्य हिंदुत्वाची कल्पना मोदींच्या बाबतीत स्पष्ट वाटते कारण त्यांनी श्रीश्री रविशंकर यांच्या आर्ट आॅफ लिव्हिंगच्या विश्व सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित राहाण्यावरुन आपल्यावर झालेली सर्व टीका मोदींनी साफ दुर्लक्षिली यावरुन त्यांचा सौम्य हिन्दुत्वाकडील कल स्पष्ट होतो. आता सुफी परिषदेतसुद्धा त्यांनी सौम्य इस्लामलाच आवाहन केले आहे.
दोन धर्मांमध्ये पूल बांधण्याचे मोदींचे जे प्रयत्न सुरु आहेत त्यामुळे त्यांच्या पक्षाला आणि सरकारला लागलेला कलंक आता निष्प्रभ झाला आहे. त्यामुळेच उपखंडात शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्याच्या प्रस्तावांना चालना मिळाली आहे. पाकिस्तानने आपल्या क्रिकेट संघाला ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली आणि पाकिस्तानातीलच सिंध प्रांताने तर त्याच्याही पुढे एक पाऊल जाऊन होळी या हिन्दूंच्या सणानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. बांगलादेशने स्वीकारलेली सेक्युलर राज्यघटना बाजूला सारुन या देशाला एक इस्लामिक राष्ट्राचा दर्जा देण्याचे जे प्रयत्न गेली तीस वर्षे सातत्याने केले जात आहेत, त्या प्रयत्नांच्या विरोधात आणि बांगलादेशला सेक्युलर राष्ट्र बनविण्यासाठीची एक याचिका तेथील सर्वोच्च न्यायालयाने दाखल करुन घेतली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा बदलाची लक्षणे दाखवित आहे. संघाने आपला पोषाख बदलण्यासाठी दहा वर्ष घेतली. पण आता संघाच्या तिसऱ्या फळीतील नेते दत्तात्रेय होसबळे यांनी समलैंगिकता हा गुन्हा नसून मानसिक विकार असल्याचे म्हटले आहे व ही बाब महत्वाची आहे. त्यामुळे सावकाशीने का होईना पण मोठे परिवर्तन घडताना दिसून येत आहे. एखादे वक्तव्य करताना मोदी इतरांच्या प्रतिक्रियांबाबत संवेदनशील असतात आणि कारणासहित उत्तरेही देतात. पण तरीही संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या बाबतीत ते जरा झुकते मापच देत असतात. या दोन्ही संघटना भाजपाला केवळे कार्यकर्ते पुरवीत नाहीत तर त्यांना वैचारिक ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शनदेखील करीत असतात. हेच नेमके शांतता आणि सौहार्द यांच्याशी मेळ खात नाही. विचारी आणि सुधारणावादी लोकांप्रमाणेच मोदींचीदेखील इच्छा शांततेच्या मार्गाने प्रगती करण्याचीच आहे, पण त्यांचे पाय ठराविक विचारांच्या चिखलात अडकले आहेत. इथे मुत्सद्दी व्यक्तीची गरज आहे, केवळ राजकारण्याची नाही, अर्थात, त्यांना जर पक्षाला बाजूला सारुन पुढे यायचे असेल तर!

Web Title: Trying to change the image of Modi trying to transform himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.