अर्धा ग्लास भरू पाहताना...
By किरण अग्रवाल | Published: December 10, 2020 07:52 AM2020-12-10T07:52:14+5:302020-12-10T07:54:12+5:30
गेल्या दिवाळीत कोरोनाच्या भीतीतून बाहेर पडत लोकांनी मनसोक्त खरेदी केली त्यामुळे बाजारात चैतन्य दिसून आले होते, त्यानंतर ही स्थिती पुढे कायम राहिल्याने ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची चाके पुन्हा रुळावर येऊ पाहताना दिसत आहेत.
किरण अग्रवाल
राजकीय मतभिन्नता कुणाची काहीही असो; परंतु देशातील चित्र सारे अंधकाराचेच आहे असे अजिबात नाही. समस्या अगर अडचणी कुठे वा कशात नसतात, पण त्यावर मात करून पुढे जाण्यातच खरा पुरुषार्थ असतो. सकारात्मकता पेरायची तर त्यासाठी नकारात्मकता दूर सारून विचार करायचा असतो. प्रत्येक वेळी प्रत्येकच बाबतीत काळे चित्र रेखाटायचे नसते; उलट अशासमयी समाधानाच्या किंवा दिलासादायक गोष्टी पुढे आणायच्या असतात, त्याने आत्मविश्वास उंचावायला मदत होते. विशेषतः नवीन पिढी, जी उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात नव्याने पाऊल टाकून स्वतःला सिद्ध करू पाहते आहे त्यांच्यासाठी तरी आशादायी वातावरण व परिस्थिती निर्माण करणे गरजेचे असते. कोरोनाच्या जागतिक संकटामुळे ध्वस्त झालेल्या परिस्थितीत तर हे प्रकर्षाने व्हायला हवे. जगातील सर्वात श्रीमंत दहा देशांच्या यादीत भारताचा नंबर लागावा या बाबीकडेदेखील त्याच दृष्टिकोनातून बघता यावे.
गेल्या दिवाळीत कोरोनाच्या भीतीतून बाहेर पडत लोकांनी मनसोक्त खरेदी केली त्यामुळे बाजारात चैतन्य दिसून आले होते, त्यानंतर ही स्थिती पुढे कायम राहिल्याने ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची चाके पुन्हा रुळावर येऊ पाहताना दिसत आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गेल्या ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात जमा झालेल्या वस्तू व सेवा कराची (जीएसटी) जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यावरून हे स्पष्ट व्हावे. नोव्हेंबर महिन्यात एक लाख चार हजार 963 कोटी रुपयांचा कर महसूल जमा झाला आहे, जो गेल्या वर्षातील नोव्हेंबरच्या महसुलापेक्षा अधिक आहे. महसुलातील ही वाढ अर्थव्यवस्था बाळसे धरत असल्याचे निदर्शक म्हणता यावी. अर्थात एकीकडे ही माहिती पुढे आलेली असतानाच दुसरीकडे आणखी एक समाधानाची बाब पुढे येऊन गेली आहे ती म्हणजे सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत भारताचा नंबर ब्रिटन आणि फ्रान्सच्या पाठोपाठ सातव्या क्रमांकावर आहे. क्रेडिट स्वीस या मान्यवर संस्थेच्या अहवालानुसार भारताकडे 12.61 लाख कोटी डॉलर्सची म्हणजे 822.7 लाख कोटी रुपये इतकी संपत्ती आहे. गरिबी किंवा दारिद्र्यरेषा तसेच कुपोषण, उपासमारी आदीची कितीही चर्चा होत असली तरी, त्या पार्श्वभूमीवर ‘अशी श्रीमंती’ पुढे यावी हे दिलासादायकच म्हणायला हवे.
श्रीमंतीच्या बाबतीत बोलायचे तर, या कोरोनाकाळात म्हणजे गेल्या सहा महिन्यात आपल्या देशात नवीन 15 अब्जाधीश बनल्याचे फोर्ब्जच्या अहवालातून समोर आले आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार भारतातील अब्जाधीशांची संख्या वेगाने वाढत असून, ती 119 झाली आहे. या वार्ता निश्चितच सकारात्मकता पेरणाऱ्या आहेत. अब्जाधीशांचीच चर्चा काय करायची, सामान्यांचीही क्रयशक्ती वाढत असून, जीवनमान उंचावत असल्याचे म्हणता येणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत. गेल्या तिमाहीत म्हणजे ऐन कोरोनाच्या काळात जुलै ते सप्टेंबरमध्ये देशातील डेबिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या तब्बल 12 टक्क्यांनी वाढली असून, ती 85 कोटी 53 लाखांवर पोहोचली आहे. ई-कॉमर्सच्या माध्यमातून एक लाख 27 हजार कोटींची देवाण-घेवाण झाली आहे. भलेही सुरक्षिततेचा भाग म्हणून लोक डेबिट कार्ड व ई-कॉमर्सकडे वळले असतील; परंतु या माध्यमातून होणाऱ्या उलाढालीचे आकडे हे खरेच अर्थकारण गतिमान होऊ पाहात असल्याचेच दर्शविणारे आहेत. शेअर बाजाराच्या निर्देशांकानेही विक्रमी नोंद केली आहे, या सर्वच बाबी दिलासादायक व उभारी देणाऱ्याच आहेत.
या सर्व बाबींची नोंद घेण्याचे कारण म्हणजे, कोरोनानंतर सर्वसाधारणपणे बहुतेकांशी बोलताना जो नकारात्मकतेचा सूर आढळून येत होता त्यात आता बऱ्यापैकी सुधारणा झालेली दिसत आहे. उद्योग-व्यवसाय बर्यापैकी गतिमान होत असून, आर्थिक चलनवलनही पूर्वपदावर येत आहे. अर्थात याकडे बघताना ज्याची जशी नजर तसे ते दिसते हेदेखील खरे. ग्लास पाण्याने अर्धा भरलेला असताना, तो अर्धा रिकामा आहे असेच अनेकांकडून सांगण्यात येते. हे नकारात्मक मानसिकतेचे द्योतक म्हणवले जाते. सद्यस्थितीत अर्थकारणाला मिळू पाहत असलेली गती लक्षात घेता असा अर्धा रिक्त ग्लासही आता भरू पहात असल्याचे म्हणता यावे. हे केवळ समाधानाचेच नसून कोरोनाच्या संकटामुळे धास्तावलेल्या मानसिकतेवर समाधानाची, दिलाशाची फुंकर मारणारेच आहे. त्या सकारात्मकतेनेच त्याकडे बघायला हवे.