सूत्रांनो... तुम्हाला बदनाम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा..!
By अतुल कुलकर्णी | Published: August 7, 2022 06:44 AM2022-08-07T06:44:32+5:302022-08-07T06:45:13+5:30
कुठलंही चॅनेल लावा किंवा कोणतीही बातमी वाचा, “सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार” असा उल्लेख त्यात असतो.
- अतुल कुलकर्णी
प्रिय सूत्रांनो,
नमस्कार.
गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात आपलाच बोलबाला आहे. कुठेही समोर न येता, कोणालाही काहीही कळू न देता, आपण प्रत्येक गोपनीय गोष्ट ज्या पद्धतीने बाहेर लिक करता (मराठीत त्याला “बातमी फोडणे” म्हणतात) त्याला तोड नाही. एकाही चॅनेलला तुमच्याशिवाय बातम्या मिळत नाहीत. तुम्ही भेटला नाही तर, एकाही पत्रकाराला करमत नाही... आणि राजकारणांचे तर तुम्ही अत्यंत घनिष्ठ मित्रच आहात..! एका पक्षातल्या दोन नेत्यांचं एकमेकांशी पटत नाही... तिथं तुमचं सगळ्याच नेत्यांशी कसं काय जुळतं...? हे आम्हाला कळत नाही... तुम्हाला ही कला कशी साध्य झाली, यासाठी तुमच्या भेटीला यायचं ठरवलं तर, तुमचा पत्ताही मिळत नाही... तुम्ही राहता कुठे..? तुमचा धंदा काय..? तुमचं पोटपाणी कसं चालतं..? याचा शोध घेतला तर त्याचीही माहिती मिळत नाही...
कुठलंही चॅनेल लावा किंवा कोणतीही बातमी वाचा, “सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार” असा उल्लेख त्यात असतो. अनेक राजकारणी नेते खासगीत बोलताना “सूत्रांनी दिलेली माहिती” असे छापा, असं आवर्जून सांगतात... पण हे सूत्र म्हणजे नेमकं काय..? याचा काही केल्या थांगपत्ता लागत नाही... तुम्ही जर तुमची ओळख लवकर दिली नाही, तर हेच माध्यमकर्मी तुम्हाला बदनाम करून सोडतील... आम्हाला तुमच्याविषयी काळजी वाटते, म्हणून तुम्हाला हे पत्र लिहित आहे. दोन-तीन महत्त्वाचे मुद्दे तुमच्याशी शेअर करायचे आहेत. तुमच्या प्रजातीविषयी जनमानसात वेगवेगळ्या भावना निर्माण झाल्या आहेत. त्या तुम्हाला वेळीच सांगून जागृत करायची इच्छा आहे, म्हणून हे पत्र लिहित आहे. त्यातील पहिलं उदाहरण अगदीच दोन-चार दिवसांपूर्वीचं ताजं ताजं आहे.
सगळीकडे बातमी आली की, “महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा उद्या होणारा विस्तार लांबला - सूत्रांनी दिलेली माहिती...” मुळात असा शपथविधी कधी होणार आहे, याची अधिकृत माहिती कोणीही दिलेली नव्हती. वेगवेगळ्या सूत्रांनी वेगवेगळ्या तारखा दिल्या होत्या. अचानक मध्येच कुठले तरी सूत्र आले आणि त्याने उद्या होणारा विस्तार लांबला, असे जाहीर करून टाकले... यामुळे तुम्हा सूत्रांच्या क्रेडिटिबिलिटीचा प्रश्न निर्माण झाला आहे... तुम्ही तातडीने तुमच्यातले कोणते सूत्र चुकीची माहिती देत आहेत, याचा शोध घ्या आणि त्यांचा बंदोबस्त करा...
दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आजपर्यंत तुमच्यातल्या सूत्रांनी दिलेली एकही माहिती खरी ठरलेली नाही, अशी तुमच्या प्रजातीची बदनामी होऊ लागली आहे. कधीतरी अमावास्या, पौर्णिमेला एखादी माहिती खरी ठरते. अशावेळी खऱ्या ठरणाऱ्या बातमीच्या सूत्रधाराला कधीच श्रेय मिळत नाही... कारण तुमच्याकडेदेखील खोटी माहिती पसरवणाऱ्या सूत्रांची संख्या जास्त झाल्याचे दिसते... अशामुळे खरी माहिती देणाऱ्या सूत्राला निष्कारण बदनामी सहन करावी लागत आहे, असं आमचं स्पष्ट मत झालं आहे..! तेव्हा तुम्ही जरा पुढे या आणि खोटी माहिती पसरवणाऱ्या सूत्रांवर गुन्हे दाखल करा... आपल्याकडे सोशल मीडियातून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा फायदा घ्या. तुमच्या संपूर्ण प्रजातीला वाचवण्याची हीच वेळ आहे. अन्यथा उद्या अशा खरी माहिती देणाऱ्या सूत्रांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही.
राजकारणी लोक, चॅनेलवाले तुम्हाला त्यांच्यासाठी, त्यांना हवे तसे वापरून घेतात...! जेव्हा सूत्रांनी, म्हणजेच तुम्ही दिलेली माहिती खरी ठरते, तेव्हा मात्र त्याचं श्रेय हे लोक तुम्हाला देत नाहीत...! त्यावेळी मात्र आम्हीच दिलेली माहिती कशी खरी ठरली, याचा डांगोरा पिटवून स्वतःची पाठ थोपटून घेतात...! त्याचं आम्हाला फार वाईट वाटतं. अनेकदा “मुकी बिच्चारी सूत्रं...” असं म्हणून आम्हाला तुमच्याविषयी सहानुभूती वाटू लागते. पण आम्ही सहानुभूती दाखवण्यापलीकडे काहीही करू शकत नाही, हे देखील तुम्ही लक्षात घ्या...जास्त काय लिहिणार..? तुम्ही सूत्र आहात... तुम्हाला आतमध्ये काय चालू आहे, त्याचा सुगावा आधी लागतो... त्यामुळे जे कोणी तुमची बदनामी करत आहेत, त्यांच्यापासून सावध राहा... तुमचं खरं रूप प्रकट करा, हे सांगण्यासाठी हा पत्रप्रपंच...! स्वतःची काळजी घ्या..!
- तुमचा काळजीवाहक , बाबूराव