YouTube: यू-ट्यूब बंद करा आणि आता झोपा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 05:35 AM2021-08-05T05:35:36+5:302021-08-05T05:36:25+5:30
YouTube: लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळे यूट्युब बघत असतात. यू-ट्यूबची गंमत अशी आहे की एकदा तुम्ही व्हिडिओज् बघायला सुरुवात केली की ज्या विषयाला धरून तुम्ही व्हिडिओज् बघत असता त्याविषयीचे रेकमेंडेशन्स यू-ट्यूब स्वत:च द्यायला लागतं आणि बघणाऱ्याचा अधिकच वेळ यू-ट्यूबवर जायला लागतो.
- मुक्ता चैतन्य
समाज माध्यमाच्या अभ्यासक
muktaachaitanya@gmail.com
लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळे यूट्युब बघत असतात. यू-ट्यूबची गंमत अशी आहे की एकदा तुम्ही व्हिडिओज् बघायला सुरुवात केली की ज्या विषयाला धरून तुम्ही व्हिडिओज् बघत असता त्याविषयीचे रेकमेंडेशन्स यू-ट्यूब स्वत:च द्यायला लागतं आणि बघणाऱ्याचा अधिकच वेळ यू-ट्यूबवर जायला लागतो. कितीही वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आले तरीही यूट्युबची जागा सहजासहजी कुणालाही घेता येण्यासारखी नाही. माणसं एकदा यूट्युबवर आली की त्यांचा डिजिटल वेळ आणि स्क्रीन टाइम वाढतो याची यूट्युबलाही कल्पना आहेच. म्हणूनच, त्यांनी काही फीचर्स सेटिंगमध्ये दिलेली आहेत. जी वापरून आपण आपला यूट्युबवरचा डिजिटल टाइम कमी करू शकतो. किंवा किती वेळ यूट्युबसाठी द्यायचा हे ठरवू शकतो.
रिमाईंड मी टू टेक अ ब्रेक!
यूट्युबच्या तुमच्या प्रोफाईलवर जा. सेटिंगमध्ये ‘रिमाईंड मी टू टेक अ ब्रेक’ असा पर्याय असतो. तो ऑन करायचा. त्यानंतर यूट्युब विचारतं, किती वेळानंतर ब्रेक घ्यायचा रिमाइंडर द्यायचा आहे? आपण आपली वेळ ठरवून तिथे सेट करायची. म्हणजे समजा अर्ध्या तासाने तुम्हाला यूट्युबने रिमाईंडर द्यावा अशी अपेक्षा असेल तर ३० मिनिटे असा कालावधी सेट करायचा. यूट्युब ३० मिनिटांनी तुम्हाला ब्रेक घ्यायची आठवण करून देईल.
रिमाईंड मी व्हेन इट्स बेड टाइम!
अनेकदा सोशल मीडियावर, यूट्युबवर गेल्यानंतर वेळेचं भान राहत नाही. आपण किती वेळ काय बघतोय, दिवस आहे की रात्र, झोपेची वेळ झाली आहे का याचीही आठवण होत नाही इतके आपण यूट्युबवर रंगून जातो. म्हणूनच यूट्युबच्या सेटिंगमध्ये ‘रिमाईंड मी व्हेन इट्स बेड टाइम’ हे फीचर आहे. हे फीचर ऑन केल्यावर तुम्हाला किती वाजता झोपायची आठवण करून द्यायची आहे ती वेळ तुम्ही सेट करायची. त्या वेळी यूट्युब तुम्हाला सांगतं, ‘इट्स बेड टाइम!’ म्हणजे आता झोपायची वेळ झाली आहे.
रिस्ट्रिक्टेड मोड
तुमचा फोन मुलांच्याही हातात असेल तर हे फीचर ऑन करा. यूट्युबवरही मोठ्या प्रमाणावर ॲडल्ट कन्टेन्ट असतो. हा मोड ऑन केल्यावर हा कन्टेन्ट तुमच्या फीड्समध्ये येत नाही. मुलांनी सर्च केला तरी दिसत नाही. शिवाय यूट्युबच्या सेटिंगमध्ये पेरेंटल कंट्रोल हा ऑप्शनही आहेच.