वजीर अडचणीत

By Admin | Published: July 7, 2015 10:16 PM2015-07-07T22:16:29+5:302015-07-07T22:16:29+5:30

एखादा उद्योग सुरू करून तो बंद करण्याची ही पद्धत जुनी नाही. या पंगतीत निलंगेकर पाटील बसले. यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही,

Turning the Wizard | वजीर अडचणीत

वजीर अडचणीत

googlenewsNext

सुधीर महाजन

एखादा उद्योग सुरू करून तो बंद करण्याची ही पद्धत जुनी नाही. या पंगतीत निलंगेकर पाटील बसले. यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, तर महत्त्वाचे हे की, भाजपामधील वंजारी-मराठा राजकारणाच्या भांडणात संभाजी पाटील निलंगेकरांसारखा मोहरा अडचणीत आला
--------------
निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे पंचायत राज समितीचे अध्यक्ष. मराठवाड्यातील भाजपाचा एक धडाडीचा होतकरू चेहरा. मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात त्यांच्या नावाची चर्चा बरीच अगोदरपासून चालू आहे. या सर्व घडामोडींना वेगळे वळण देणारी घटना परवा घडली. त्यामुळे राजकारणाच्या पटावरील साऱ्या चालीच बदलून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाजी पाटील निलंगेकरांवर एका प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण खात्याने आरोपपत्र दाखल केले. मराठवाड्यातील एखाद्या लोकप्रतिनिधीविरुद्ध ‘सीबीआय’ने आरोपपत्र दाखल करण्याची ही पहिलीच वेळ, त्यामुळे हे महत्त्वाचे.
संभाजीराव निलंगेकरांनी ‘व्हिक्टोरिया अ‍ॅग्रो फूड लिमिटेड’ नावाचा एक उद्योग सुरू केला. केंद्रात आघाडी सरकारच्या काळात धान्यापासून मद्यनिर्मितीची एक योजना आली होती. त्या अंतर्गत हा उद्योग उभारण्यात आला होता. शिरूरअनंतपाळ तालुक्यातील साकोळ गावाच्या शिवारात तो उभारला. या कारखान्यात मद्यनिर्मितीसाठीच्या कच्चा मालाचे उत्पादन करण्यात येत असे. यासाठी युनियन बँकेकडून ४१ कोटींचे कर्ज घेतले होते. या आकड्याबाबत अजूनही स्पष्टता नाही. कोणी २१ कोटी सांगतो; पण काही असले तरी आकडा कोटीतीलच आहे.
येथपर्यंत सारे ठीक होते. चार वर्षांपूर्वी युनियन बँकेने सीबीआयकडे संभाजी पाटलांच्या विरोधात तक्रार केली. एक तर कर्जाची परतफेड होत नव्हती हा भाग होताच; पण बनावट कागदपत्रे दाखल करून हे कर्ज उचलले अशी बँकेची तक्रार आहे. त्यांना यासाठी बँकेने वारंवार नोटिसाही दिल्या होत्या. शेवटी सीबीआयकडे तक्रार केली आणि तीन-साडेतीन वर्षे चौकशी केल्यानंतर आता आरोपपत्र दाखल करण्यात आले.
या कारखान्याचे संचालक मंडळही अगदी ‘मराठवाडी’ आहे. त्यात ते स्वत:, त्यांची बहीण, मेहुणा, भाऊ, स्वीय सहायक आणि एक समर्थक अशांचा समावेश आहे. साकोळच्या माळरानावरील हा कारखाना आठ-दहा महिने चालू होता आणि नंतर बंद पडला. आता तेथे सुरक्षा रक्षकांशिवाय कोणीही नाही. कर्मचारी-कामगार पोटापाण्याची सोय शोधण्यासाठी बाहेर पडले. त्यांच्या समोर पर्याय नव्हता. बंद पडलेल्या कारखान्यामध्ये आणखी एकाची भर पडली. यापेक्षा वेगळे काही नाही.
मराठवाड्यातील भाजपाच्या अंतर्गत राजकारणात वंजारी-मराठा संघर्ष तसा गोपीनाथ मुंडेंपासून सुरू झालेला. कारण मुंडेंनी मराठ्यांच्या प्रस्थापित राजकारणाला सुरुंग लावून येथे पक्ष उभा केला होता. यात काँग्रेसची अनेक संस्थाने त्यांनी खालसा केली होती. तेव्हापासून काँग्रेस-भाजपामधील हा संघर्ष पुढे भाजपामध्येच सुरू झाला. मुंडे असेपर्यंत त्याला फारसे तोंड फुटले नव्हते; पण आता प्रदेशाध्यक्षपद रावसाहेब दानवेंकडे येण्यामागे अंतर्गत राजकारणाचा हाही एक पदर आहे.
संभाजी पाटील निलंगेकर हे भाजपामधील नितीन गडकरी गटाचे म्हणून ओळखले जातात. त्यांच्यामुळे भाजपामधील मराठा लॉबी प्रभावी झाली आहे. दानवेंना प्रदेशाध्यक्ष करण्यामागची कारणमीमांसा लक्षात घेतली तर त्याच मराठवाड्यातील निलंगेकर पाटलांना पंचायत राज समितीचे अध्यक्षपद देण्यामागचे गडकरी गटाचे इरादे स्पष्ट होतात. या प्रकरणाने त्यांच्या मंत्रिपदाच्या आशा धुसर झाल्या असे म्हणावे लागेल. सीबीआय चौकशीचे हे थंड्या बस्त्यातील प्रकरण आता बाहेर आले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात उठलेले रान शमते न शमते तोच हे नवे प्रकरण पुढे आले. हा योगायोग की यामध्ये काही सूत्रबद्ध साखळी हाच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.
बुद्धिबळाच्या पटावर वजीराला रोखण्यासाठी हत्ती, उंट, घोडे त्याच्या भोवती उभे करतात तसा तर हा प्रकार नाही? राजकारणाच्या सारीपाटावर शहकाटशह चालूच असतात. भाजपामधील मराठ्यांचा वजीर अडचणीत आला एवढे मात्र खरे.

Web Title: Turning the Wizard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.