१०० कोटींची उलाढाल; फ्युचर ‘ब्राइट’ आहे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 04:25 AM2018-08-05T04:25:29+5:302018-08-05T04:25:40+5:30
कधी काळी वर्तमानपत्र, माचिस, फटाके असे साहित्य विकत दिवसाला शंभर रुपये कमविणाऱ्या योगेश लखानी यांनी होर्डिंग्ज क्षेत्रात पाय रोवत, आज बॉलीवूडमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
कधी काळी वर्तमानपत्र, माचिस, फटाके असे साहित्य विकत दिवसाला शंभर रुपये कमविणाऱ्या योगेश लखानी यांनी होर्डिंग्ज क्षेत्रात पाय रोवत, आज बॉलीवूडमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. मुंबईसह दक्षिण भारत आणि उत्तर भारतात काम करतानाच बॉलीवूड, टॉलीवूड आणि नाट्यक्षेत्रालाही होर्डिंग्जद्वारे त्यांनी झळाळी दिली आहे. एकापाठोपाठ एक यशाची शिखरे पादाक्रांत करत असलेल्या लखानी यांची उलाढाल आजघडीला तब्बल शंभर कोटी रुपये एवढी असून, आजही हा माणूस कायम जमिनीवर आहे. तारकांदळासोबत वावरतानाच त्यांनी सामाजिक भान जपत आरोग्य क्षेत्रालाही हातभार लावला आहे. केवळ देशातच नाही, तर परदेशातही भारताचे नाव उंचावत हॉलीवूडचीही कामे मिळविली आहेत. यशप्राप्त ब्राइट आउटडोअर मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक योगेश लखानी यांच्याशी यानिमित्ताने ‘लोकमत’चे प्रतिनिधी सचिन लुंगसे यांनी केलेली ही बातचीत.
प्रारंभ कसा झाला?
मी १९८० साली माझी स्वत:ची कंपनी सुरू केली. मग सिनेमा बोर्ड, रेल्वे बोर्ड, स्लाइड, खांबावर लागणारे बोर्ड याचे काम सुरू केले. दररोज दिवसाला पंधरा तास काम करायचो. १९८० सालापासून पंधरा तास काम करायची सवय लागली आहे; ती आजपर्यंत कायम आहे. ३८ वर्षे झाली. मला कोणतेही व्यसन नाही. पान, सिगारेट, दारू, तंबाखू यापैकी कशाचेच सेवन करत नाही. माझे राहणीमान साधे अन् सरळ आहे.
होर्डिंग्ज क्षेत्रात कसे पदार्पण केले?
१९८७ साली मी पहिले होर्डिंग लावले. मालाड रेल्वे स्थानकावर वर्षाला एक हजार रुपये भाडे होते. आता लाखो रुपयांची होर्डिंग्ज सुरू आहेत. १९८७ साली पहिल्यांदा माणिकचंद फिल्म फेअर अॅवॉर्ड केले, याचे होर्डिंग पहिल्यांदा लावले. मग मी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले. १९८७ साली पन्नास होर्डिंग्जचे पॅकेज तीन लाख रुपयांत आणले. ते खूप सुपरहिट ठरले. शाहरूख खान, हृतिक रोशन अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या पहिल्या चित्रपटाची होर्डिंग्ज आम्ही झळकवली. आजघडीला ९० टक्के चित्रपट माझ्याकडे आहेत. ९८ टक्के पुरस्कार माझ्याकडे आहेत. फिल्म फेअर, फेमिना, आयफा, अप्सरा असे अनेक कार्यक्रम माझ्याकडे आहेत.
देश-विदेशात कसे काम सुरू आहे?
माझी कंपनी आज भारतात एक नंबरला आहे. देशभरात पंधराशे होर्डिंग्ज माझ्याकडे आहेत. एक हजारपेक्षा अधिक ग्राहक माझ्याकडे आहेत. मला लंडनमधून बीबीसी न्यूजची आॅर्डर मिळाली आहे. पाकिस्तानमध्ये वीस शहरांत, केनियामध्ये दोन शहरांत, बांगलादेशात तीन शहरांत काम मिळाले आहे. मी आता ‘हेड सेल’ नावाची कंपनी सुरू केली आहे, जी एजन्सीप्रमाणे काम करेल. ही कंपनी बीबीसीचे काम संपूर्ण जगात करीत आहे. बीबीसी न्यूजचे कॅम्पेन आम्ही सुरू केले आहे. पुढील आठवड्यात ते दाखल होईल.
कॉर्पोरेट क्षेत्राबद्दल काय सांगाल?
३८ वर्षांपासून जाहिरात क्षेत्रात काम करत आहे. ३० वर्षांपासून होर्डिंग्ज क्षेत्रात कार्यरत आहे. शंभर कर्मचारी माझ्याकडे कार्यरत आहेत. आठ हजार चौरस फुटांचे कार्यालय आहे. पाच हजारांपेक्षा अधिक चित्रपटांचे काम केले आहे. अमेरिका, लंडन, दुबई, बँकॉकमध्ये मला पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘चलो जीते है’ नावाची एक फिल्म बनविली आहे. या फिल्मच्या स्क्रीनिंगसाठी मला राष्ट्रपती भवन येथे बोलाविण्यात आले होते.
आव्हानांचा सामना कसा केला?
२००८ साली आलेल्या जागतिक मंदीचा फटका मलाही बसला. मी तेव्हा बेस्टचे एक टेंडर घेतले होते. तेव्हा मला खूप तोटा झाला. मी गुंतवणूक केल्याने आणि पैसे वाचविल्याने मला मी सावरले. अमिताभ बच्चन, धीरूभाई अंबानी, नरेंद्र मोदी यांचे जेव्हा आयुष्य मी पाहतो, तेव्हा माझ्या असे लक्षात येते की, यांनाही अपयश आले होते. मात्र, ही माणसे हरली नाहीत. त्यांचाच आदर्श मी माझ्या डोळ्यांसमोर ठेवतो.
डिजिटल मार्केटचा फटका बसला का?
भारतात डिजिटल मार्केट उभे राहत आहे. मात्र, ते शंभर टक्के उभे राहिलेले नाही. हे प्रमाण पाच ते दहा टक्के आहे. केवळ तरुण वर्ग याचा वापर करत आहे आणि माझे ग्राहक हे हंगामानुसारचे आहेत. परिणामी फटका बसत नाही. आयपीएलसारखे ग्राहक माझ्याकडे येतात. दुबईतल्या मास्टर क्रिकेट लीगचे काम मी केले होते. दुबईत टी-टेनसारख्या मॅचचे काम मी पाहिले. कबड्डी, बॉक्सिंग आणि फुटबॉलचे कामही मी केले आहे.
ब्राइट कुठे-कुठे आहे?
कॉर्पोरेट, सिनेमा, राजकीय क्षेत्रासाठीही आम्ही काम केले आहे. बॉलीवूड, हॉलीवूड, टॉलीवूडही माझ्याकडे आहे. मराठीसह भोजपुरी चित्रपटांसाठी मी काम केले आहे.
हॉलीवूडबद्दल काय सांगाल?
हॉलीवूडच्या फिल्मदेखील येतात. युनिव्हर्सलची कामे येतात. कोलंबियाची कामे येतात. सोनीची कामे येतात. दक्षिण भारत आणि उत्तर भारतात माझी कामे सुरू आहेत.
होर्डिंग्जसाठी कोणत्या सरकारी अडचणी आल्या?
सरकारी काम करताना म्हणजे, होर्डिंग्जसाठी परवानगी मिळविताना खूप अडचणी येतात. परवाने मिळत नाहीत. फाईल लवकर मंजूर होत नाही. सहा ते सात महिने वाट पाहावी लागते. परवानग्या आॅनलाइन झाल्या पाहिजेत, तेव्हा अडचणी कमी होतील.
कुटुंबाला कसा वेळ देता?
मी सहावीत असताना माझ्या बाबांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी, त्यांची औषधे घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. तेव्हाच मी ठरविले. मोठे व्हायचे. दररोज कुटुंबाला दोन तास देतो. वर्षात तीन वेळा कुटुंबासोबत विदेशात जातो. कुठेतरी तडजोड करावी लागते. कुटुंबही मला समजून घेते. आता सेलिब्रिटी मॅनेजमेंटचे काम सुरू केले आहे, शिवाय मी सुरू केलेली एजन्सी संपूर्ण जगात काम करीत आहे. २०१० सालापासून चारशे लोकांच्या कुटुंबांना एक महिन्याचे अन्नधान्य मोफत देतो. रक्तदान शिबिर वर्षाला तीन वेळा भरवतो. मोफत वैद्यकीय शिबिर भरवतो. ‘मातोश्री ट्रस्ट’ आहे, याद्वारे हे काम करतो. बोरीवलीमधील चिकूवाडी येथे रुग्णालयही उभे करत आहोत. दरम्यान, वरळी डोममध्ये २५ सप्टेंबरला ब्राइट एव्हर नाइट पार्टी आहे, तेव्हा शंभराहून अधिक कलाकार येणार आहेत.