चिवचिवणारी वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 06:38 AM2016-08-24T06:38:28+5:302016-08-24T06:38:28+5:30
शालेय जीवनातील लक्षात ठेवावी अशी गोष्ट कोणती, असा जर प्रश्न मला कोणी केला तर त्याचे तत्काळ उत्तर म्हणजे कविता़ कविता मनात घर करून राहातात़
शालेय जीवनातील लक्षात ठेवावी अशी गोष्ट कोणती, असा जर प्रश्न मला कोणी केला तर त्याचे तत्काळ उत्तर म्हणजे कविता़ कविता मनात घर करून राहातात़ पुन्हा पुन्हा ओठी येतात, गुणगुणावाश्या वाटतात़ असे का व्हावे? कारण त्या कवितांनी एक संस्कार दिलेला असतो़ कवितेचा नित्य नवा अर्थ लागत जातो़ जीवाला बरे वाटते़ आपणच आपल्या मनाशी संवाद करत असतो़ कवितांची ही देन सुखावह वाटते़
उतारवयातील विस्मरणाच्या स्पर्धेत कविता मात्र स्मरणात राहातात़ नवा अनुभव देतात़ विंदा करंदीकरांची,
‘चिवचिवणारी वाट असावी
दमछाटीची यावी घाटी
घाटीनंतर गडग्यापाशी
पार असावा बसण्यासाठी’
ही कविता अचानक ओठी आली आणि भुर्रकन उडून जाणाऱ्या चिमण्यांचा थवा नजरेपुढती आला़
‘चिव चिव ये, दाणा खा
पाणी पी, भुर्र उडून जा’
चिमणीला ना दाणा दिला, ना पाणी पाजले़ नातवंडांचे रडे थांबवायला मात्र चिऊ आणि काऊच लागतात़ त्यांना खेळवता खेळवता आपणच खेळत असतो़ चिऊ-काऊच्या गोष्टीतील एकाक्ष कावळ्याचा तिरस्कार बालपणीच मुलांना आपण शिकवतो़ त्याचे घर शेणाचे, पावसात वाहून जाणारे़ त्याला चिमणीच्याच दारी यावे लागते़ दार उघड, म्हणून केवढा तगादा चिमणीकडे लावतो़ चिमणी मात्र आपल्या बाळाचे सर्व काम पूर्ण करते, मगच कावळ्याला घरात घेते़ लहानपणी चिमणी कळलीच नाही़ आजोबा झाल्यावर नातवंडांना खेळवताना समजली़ संसारावर प्रेम करणारी, लेकरांचं कौतुक करणारी, आल्यागेल्यांना आश्रय देणारी़ वारे! चिमणी़ आपलाही संसार चिमणीसारखाच असतो़ आपले चिमणी आणि चिमणराव भुर्रकन उडून जातात ते पंखात बळ आल्यावऱ आपण मात्र त्यांच्या आठवणी काढून असहाय्यपणे जगत राहातो़ धुवाधार पाऊस सुरू झाला़ अनेक घरांची पडझड पाहिली की वाटते चिमणी किती हुशार. मेणाचे घर बांधते तिचा संसार सुखाचा संसाऱ पोराबाळांचे करता आले, दारी आलेल्या अतिथीची सोय करता आली म्हणजे झाले़
कावळ्याला घरात घेणारी चिमणी पोपटाचे निमंत्रण धुडकावते़ सोन्याच्या पिंजऱ्यात राहायला, बोलावणाऱ्या पोपटाला स्वाभिमानी चिमणी खडे बोल सुनावते़
‘जळो तुझा पिंजरा मेला
चिमणी उडून गेली राना’
स्वातंत्र्यावर प्रेम करणारी, कोणत्याही आमिषाला न भुलणारी, बंधन झुगारणारी, स्वत:च्या संसारावर निरतिशय प्रेम करणारी चिमणी कदाचित म्हणतही असेल, ‘संसार हा सुखाचा मी अमृतात नाहते’ झाडे गेली, वेली गेल्या, चिमण्या राहणार कोठे आणि घरी येणार तरी कशा? चिमण्या आल्या पाहिजेत़ चिवचिवाट कानी पडला पाहिजे़
-डॉ.गोविंद काळे