पाच कोटींच्या फुसक्या बाराच्या जखमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:27 AM2017-11-22T00:27:05+5:302017-11-22T00:27:50+5:30

चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेच्या आमदारासाठी पाच कोटींचा रेट लावला हा आरोप केल्यानंतर उद्धवजींनी हर्षवर्धनांची पाठ थोपटली

Twenty-five wounds of five crores of rupees | पाच कोटींच्या फुसक्या बाराच्या जखमा

पाच कोटींच्या फुसक्या बाराच्या जखमा

Next

- सुधीर महाजन
चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेच्या आमदारासाठी पाच कोटींचा रेट लावला हा आरोप केल्यानंतर उद्धवजींनी हर्षवर्धनांची पाठ थोपटली तेव्हा त्यांना हर्षवायू व्हायचा बाकी राहिला. खरे म्हणजे पार्टी विथ डिफरन्सचे बिरुद मिरवणाºया भाजपने बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, असाच पवित्रा घ्यायला पाहिजे होता; पण तेथेही तेरी भी चूप, मेरी भी चूप, असे वागत थंड राहिले आणि सेनेनेही मूग गिळले.
भाजप आणि शिवसेनेच्या ‘लव्ह-हेट स्टोरीज’ची प्रकरणे रोज लिहिली जातात आणि तेवढ्यापुरता धुराळा उडतो. आरोप फार गंभीर होतात. जिव्हारी लागणारे असतात. हल्ला, प्रतिहल्ला, असा हा प्रकार आता नेहमीचा झाला असला तरी परवा कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी महसूल आणि बांधकाममंत्री आणि मंत्रिमंडळातील दुसºया क्रमांकाचे सदस्य चंद्रकांत पाटील यांच्यावर घोडेबाजाराचा आरोप केला. शिवसेनेच्या २५ आमदारांची प्रत्येकी पाच कोटींच्या भावाने त्यांनी बोली लावली. एवढे आमदार एकगठ्ठा खरेदीचा त्यांचा प्रयत्न होता. आता समजा हा व्यवहार (की तोडी-पाणी) झाला असता तर तब्बल सव्वा अब्ज रुपयांची ही उलाढाल होती, म्हणजे महाराष्ट्र गरीब नाही (तरीही इथला शेतकरी आत्महत्या करतो), श्रीमंत आहे. तर हर्षवर्धन जाधवांचा हा आरोप भाजपचा तीळपापड करणारा होता. त्यातून जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे जावई. म्हणजे एका अर्थाने जावयाने सासºयाला केलेला अहेरच समजायचा.
हर्षवर्धन बोलले, पण त्यावर वादळ उठले नाही. भाजपनेसुद्धा हा वार दुर्लक्ष करीत झेलला. जखमा उरातल्या किती उघड्या करायच्या हासुद्धा एक प्रश्नच आहे. जणू काही घडलेच नाही अशा आविर्भावात हे दोन्ही पक्ष वावरताना दिसतात. एक तर हर्षवर्धनांचा आरोप गंभीरपणे घेतला तर त्याला उत्तर द्यावे लागेल आणि आरोपांच्या वायबारात एकमेकांचे वस्त्रहरण होईल असा पोक्त विचार भाजपच्या धुरिणांनी केला असावा. समजा शिमगा रंगलाच तर आपल्यावर जास्त चिखल उडेल अशी काळजी असावी; पण सव्वा अब्ज रुपयांच्या आरोपांचे उत्तर द्यावे वाटले नाही. हेही एक गूढ म्हणावे लागेल. आता हे दोन्ही पक्ष जणू काही घडलेच नाही, असे वावरताना दिसतात.
हर्षवर्धनांनी असा उपटसुंभासारखा आरोप का केला, हा आणखी एक पडलेला प्रश्न आहे. तसे जाधव हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. पोलिसांनी त्यांना मारहाण केली होती. तो वाद पेटला होता. पुढे मनसेमधून शिवसेनेत आल्यानंतर त्यांचे खासदार चंद्रकांत खैरेंशी फाटले. ते इतके की शिवसेनेच्या आमदाराने त्यांच्याच खासदारांच्या गैरकृत्याचे वाभाडे काढून प्रसारमाध्यमांच्या हाती दिले. मतदारसंघाबाहेरच्या गावात खैरेंनी खासदार निधी खर्च केल्याचे त्यांनी उघड केले, तर खैरेंनी जिल्हा परिषद निवडणुकीत जाधवांच्या पत्नीला पराभूत करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली. ही साठमारी औरंगाबाद जिल्ह्याने पाहिली. पुढे दोघांमध्ये समझोता झाला आणि जाधवांनी पाच कोटींचा बॉम्ब टाकला. आज याबाबत सर्वांनीच मूग गिळले. जाधवांना सेनेतून बाहेर पडायचे होते, पण आम्ही त्यांना घ्यायला तयार नाही असे भाजपची मंडळी म्हणतात, असा जावई पक्षात घेऊन सासºयांनाही डोकेदुखी वाढवायची नसावी आणि शिवसेनेसाठी तर सध्या एकेक आमदार महत्त्वाचा आहे. सरकार आरोपांचे निराकरण करत नाही. शिवसेना या मुद्यावर रान उठवत नाही आणि हर्षवर्धन तर निवांत आहेत. प्रश्न हाच आहे की, नेमके सत्य काय?

Web Title: Twenty-five wounds of five crores of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.