दोन शहरांनी शिकविलेला ‘अमृतानुभव’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 08:40 PM2019-07-09T20:40:52+5:302019-07-09T20:48:25+5:30
गोव्यात पाऊस खूप पडतो. परंतु उन्हाळ्यात अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते.
- राजू नायक
गोव्यात पाऊस खूप पडतो. परंतु उन्हाळ्यात अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते. आपल्या देशात सर्वात जास्त पाऊस पडणा-या मेघालयाची राजधानी असलेल्या शिलाँगमध्येही काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. चेन्नईमध्ये गेल्या १० वर्षांपासून लोक पाण्याविना तडफडत आहेत आणि तरीही समाजाला त्यावर उपाय योजता आलेला नाही. उन्हाळ्यात तडफडणे आणि पावसाळ्यात पाण्याची फिकीर न करणे हा आपला स्वभाव आपण कधी बदलणार आहोत?. जगात अशी पाण्याच्या समस्येने पिचलेली अनेक शहरे आहेत, आणि काहींनी त्यावर उताराही शोधला आहे. लोक गंभीर असतील तर सरकारलाही पिण्याच्या पाण्यासाठी गंभीर उपाय योजणे क्रमप्राप्त ठरते. नामिबियाची राजधानी विंडहोक व सिंगापूर- जेथे पाणी मलेशियाहून आयात केले जाते- या जलदुर्भिक्षावर योग्य उपाय शोधला आहे. दोन्ही ठिकाणी पारंपरिक प्रयत्न व आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर मिलाफ घडवून घशाची कोरड शमविण्यात आली.
नामिबियाची राजधानी- विंडहोकने डायरेक्ट पोटेबल रियूज (डीपीआर)ची संकल्पना सर्वप्रथम राबवून दाखविली. याचा अर्थ घरातील सांडपाण्याचे पिण्याच्या पाण्यात रूपांतर करणे. हा भाग आफ्रिकेतील अवर्षणग्रस्त प्रांतात मोडतो. तीन लाख लोकसंख्या. आपली पाण्याची गरज भागवण्यासाठी सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचा एकच पर्याय त्यांना उपलब्ध होता. १९६८मध्ये तेथे रिसायकलिंग प्रकल्प उभारण्यात आला. २००२ मध्ये त्याचे रूपांतर एका दुस-या पुनर्स्थापित प्रकल्पात करण्यात आले. या प्रकल्पात २७ हजार घन मीटर पाणी तयार केले जाते. त्यातून प्रत्येक व्यक्तीला ६० लिटर पाणीपुरवठा होतो.
एकच काळजी लोक घेतात ती म्हणजे औद्योगिक व जीवाणूजन्य पाणी सांडपाण्यात ते मिसळू देत नाहीत. हे पाणी वाहत जाणा-या नाल्याकडे काटेकोर लक्ष पुरविले जाते. या पाण्याची कठोर परीक्षा केली जाते. आपल्याकडे पाणी साफ करण्याची ही प्रक्रिया तीन प्रक्रियांतून जाते, तर तेथे ती १० प्रक्रियांमधून जाते. त्यांनी स्वित्झर्लंडचा पाणी दर्जा तेथे प्रमाण मानला आहे. अजूनपर्यंत तरी या पाण्याला आक्षेप घेण्यासारखे काही घडलेले नाही. सांडपाण्यावर प्रक्रिया करूनही हे पाणी स्वस्त पडते. या पेयजलाचा दर आहे ६० पैसे प्रतिलिटर!
सिंगापूरमध्ये गार्डन्स बाय दी बे ही बाग जगप्रसिद्ध असून तो मुळात पावसाचे पाणी धरून ठेवणारा सर्वात मोठा जलाशय आहे. त्या पाण्याचा वापर घरगुती व कारखान्यांच्या वापरासाठी केला जातो. मलेशियातून पाणी आयात करीत असलेल्या सिंगापूरला केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.
तरीही तेथे सार्वजनिक व्यवस्थेमार्फत प्रतिनागरिक १४० लिटर पाणीपुरवठा केला जातो. जलसंवर्धनात सिंगापूरचा हात कोणी धरू शकणार नाही. वर्षाकाठी तेथे पावसाचे २४०० मिलीलिटर पाणी धरून ठेवले जाते. दोन तृतीयांश भूभागात पावसाचे पाणी धरून ठेवण्याची व्यवस्था असून प्रत्येक नाला, ओहोळ व नदीत पडणारा थेंब वाचविला जातो. जमीन ही पावसाचे पाणी धरून ठेवण्याचे उत्कृष्ट साधन असल्याचे सिंगापूरमध्ये मानले जाते. तेथेही सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. तेथे घाण पाणीही अत्यंत स्वच्छ बनविले जाते. खा-या पाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्पही तेथे आहेत. या व्यवस्थांमुळे सिंगापूर आता अतिरिक्त पाणी असलेले शहर मानले जात आहे.
जेथे पाण्याची नैसर्गिक व्यवस्था नाही, तेथे जर असे कठोर उपाय योजले जात असतील तर आपल्याकडे जेथे खूप पाऊस पडतो व अनेक जलस्रोत उपलब्ध आहेत- तेथे पाणी वाचविण्याच्या दृष्टीने आपण कधी सजग होणार? आपले तलाव व नद्या प्रदूषित बनण्याचे प्रमाण वाढत चालले आहे, ते कसे रोखणार? आपल्या तंत्रज्ञान संस्थांनीही पाण्यावर प्रक्रिया करणारे संशोधन तयार करण्यास अजून अग्रक्रम दिलेला नाही. शहरांमध्ये पावसाचे पाणी जतन करून ते सोप्या पद्धतीने स्वच्छ करण्याची प्रक्रिया जर लोकांना सहज जमू शकली तर लोकही मोठय़ा प्रमाणात त्यात सहभागी होऊ शकतात. दुर्दैवाने पाण्यासाठी जोर्पयत बळी पडत नाहीत, तोपर्यंत सरकार आणि समाजही त्याबाबतीत कठोर पावले उचलणार नाही, अशीच काहीशी सध्याची परिस्थिती आहे.
(दिल्लीच्या विज्ञान व पर्यावरण संस्थेचे संशोधक चंद्रभूषण यांच्या एका लेखाच्या आधारे..)
(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)