दोन हात दुष्काळाशी
By admin | Published: June 5, 2016 02:07 AM2016-06-05T02:07:19+5:302016-06-05T02:07:19+5:30
‘दुष्काळ’ हा शब्द उच्चारला की, लगेच आपल्यासमोर दृश्य येते, ते पावसाच्या अपेक्षेने आभाळाकडे एकटक पाहत असलेल्या शेतकऱ्याचं. या चित्रामागचा विचार असा आहे की, पावसाच्या अभावामुळेच
- सत्यजीत भटकळ
‘दुष्काळ’ हा शब्द उच्चारला की, लगेच आपल्यासमोर दृश्य येते, ते पावसाच्या अपेक्षेने आभाळाकडे एकटक पाहत असलेल्या शेतकऱ्याचं. या चित्रामागचा विचार असा आहे की, पावसाच्या अभावामुळेच दुष्काळ निर्माण झाला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रांत सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे, हे निर्विवाद सत्य आहे, परंतु अशा परिस्थितीतही अशी अनेक गावे आहेत, जिथे मुबलक पाऊस पडूनही पाण्याचे दुर्भिक्ष आहे.
उभ्या कोकणात दोन हजार मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो, तरीही तिथे अनेक गावांत जानेवारी महिन्यानंतर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. त्यामुळे अशी काही गावे आहेत उदा. हिवरे बाजार, लोधवडे, साताऱ्यातील हिवरे ही गावे, जिथे ३०० मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडूनही पाण्यासाठी, जनावरांसाठी आणि शेतीसाठी मुबलक पाणी आहे. थोडक्यात, अनेक गावांत भरपूर पाऊस पडूनही दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे आणि काही गावांत अत्यल्प पाऊस पडूनही पुरेसे पाणी आहे. या मागचे रहस्य काय?
याचे कारण खूप सोपे आहे. हिवरे बाजार, लोधवडेसारख्या गावांनी आपल्या गावात पाणलोट विकासाची कामे केली आहेत. पाणलोट विकास म्हणजेच गावाच्या शिवारात आणि कॅचमेंट एरियामध्ये पडणाऱ्या पाण्याला वाया न घालवता, त्या पाण्याला अडवणे, जिरवणे आणि भूगर्भातील पाण्याचा साठा वाढवणे. यासाठी अनेक लहान उपचार गावातल्या गावात करावे लागतात. जसे की सीसीटी, दगडी बांध, मातीचे बांध इत्यादी. हे उपचार विशेष खर्चिक नाहीत. त्यापैकी बरेचसे उपचार ग्रामस्थ स्वत: आपल्या मेहनतीने करू शकतात.
मग प्रश्न असा उभा राहतो की, जर हे उपचार सोपे आहेत, खर्चिक नाहीत आणि रिझल्ट देतात, मग हे उपाय पाच-पंचवीस गावांपुरतेच का मर्यादित राहिले आहेत? इतक्या वर्षांनंतरही जलसंधारणाच्या संदर्भात बोलताना फक्त त्या थोड्याच गावांची नावे का घेतली जातात? सर्व गावांनी जलसंधारणाचे काम करून दुष्काळ कायमचा का दूर केला नाही?
‘सत्यमेव जयते’ या शोचा मी दिग्दर्शक. पाणीप्रश्नावर आम्ही जेव्हा शो केला, तेव्हा आमीरला, मला, आमच्या संपूर्ण टीमला हे प्रश्न भेडसावले. एखाद्या प्रश्नावर उपाय असताना तो इलाज आपण मोठ्या प्रमाणावर अंमलात का आणू शकत नाही? ङल्लङ्म६ ँङ्म६ असून ठङ्म २ूं’ी ही परिस्थिती का?
आम्हाला असे वाटले की, या प्रश्नावर आपण सातत्याने काम केले, तर हा प्रश्न सोडवण्यात आपलाही खारीचा वाटा असू शकतो. त्या उद्दिष्टाने ‘सत्यमेव जयते’ कोर टीमने पाणीप्रश्नावर काम करण्यास ‘पाणी फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली.
पाणीप्रश्न सोडवण्यास, गावागावांत जलसंधारण करण्यास मुख्य अडचण आणि अडसर काय, याचा आम्ही अनेक गावांत जाऊन अभ्यास केला. आम्हाला लक्षात आले की, यामागे अनेक कारणे व समस्या दडलेल्या आहेत. राजकीय पक्षाच्या आधारावर, जाती-पातीच्या आधारावर आणि इतर वादांमुळे गावागावांमध्ये फूट पडली आहे. या सर्व समस्यांना एकच उपाय आहे आणि तो म्हणजे गावाला एकत्र आणणं. ‘गावचे ऐक्य’ हे एक भांडे आहे, जे पाण्याला धरून ठेवते. गावात फाटाफूट असेल, तर ते भांडे गळकं असेल नि त्यात पाण्याचा संचय करणे अशक्य ठरेल. मात्र, गावात एकी असेल, तर त्या भांड्यात व्यवस्थित पाण्याचा संचय होईल.
गावाला एकत्र आणण्यासाठी आम्हाला एक काहीसा वेगळा उपाय सुचला. तो म्हणजे, पाण्यावर काम करण्यासाठी गावागावांत एक सकारात्मक स्पर्धा लावणे. क्रिकेटसाठी आय.पी.एल.असते, कबड्डीसाठी स्पर्धा असते, गाण्यासाठी, नाचण्यासाठी प्रत्येक खेळासाठी स्पर्धात्मक टीव्ही शो असतात. मग पाण्याच्या प्रश्नावर स्पर्धा का असू नये?
या हेतूने जन्म झाला, ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ या स्पर्धेचा. पहिले बक्षीस मिळणाऱ्या गावाला मिळतील ५० लाख रुपये, द्वितीय बक्षिसाला ३० लाख रुपये आणि तिसऱ्याला मिळतील २० लाख रुपये. प्रायोगिक तत्त्वावर तीन जिल्ह्यांतील प्रत्येकी एका तालुक्यात ही स्पर्धा आयोजित केली आहे. विदर्भातील वरुड तालुका, मराठवाड्यातील अंबाजोगाई आणि
पश्चिम महाराष्ट्रातील कोरेगाव तालुका यांतील ११६ गावे स्पर्धेत उतरली आणि ठिणगी लागून वणवा पेटावा, या वेगाने ही गावे कामाला लागली. हजारो लोकांनी रणरणत्या उन्हात श्रमदान करून अब्जावधी लीटर पाणी साठेल, अशी कामे निर्माण केली आहेत. नेमके काय घडले व ही किमया कशी घडली, हे पुढील आठवड्यात लिहीनच, परंतु एक गोष्ट निश्चित घडली आहे. आता शेतकरी आसूसलेल्या डोळ्यांनी पावसाची प्रतीक्षा करणार नसून, तो दुष्काळाशी दोन हात करूनच वरुण राजाचे स्वागत करणार आहे.
(जून महिन्याचे मानकरी असलेले लेखक दिग्दर्शक आणि पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)