दोन हजार चौदेबाजी
By admin | Published: December 31, 2014 02:18 AM2014-12-31T02:18:11+5:302014-12-31T02:18:11+5:30
जाणत्या राजाचे असे सारे चेले कुणी टगे, कुणी दहीहंडीवाले
जाणत्या राजाचे असे सारे चेले
कुणी टगे, कुणी दहीहंडीवाले
जनाचीही नाही, मनाचीही नाही
लाज-लज्जा त्यांना, असे माजवाले
घड्याळी घराणी, चापतात लोणी
पेंदे येडे खेळुनिया मेले ....
ह्याला आरक्षण। त्याला आरक्षण ।
रोगाचे लक्षण । बळावले ।
सांग देशा तुझी । कोणती रे जात ।
गेली बासनात । महासत्ता ।।
शाळेला निघताना गोळी, त्याची गंमत काय सांगू
आई म्हणाली तालिबानी, अंतिम इच्छा काय सांगू
भगवा, हिरवा, निळा, तांबडा... चौरंग्याला काय सांगू
आई म्हणाली, चांडाळ चौकडी, त्यांची हिंमत काय सांगू
अडत्यांवाचून अडते सारे घडू नये ते घडते
लेखक-वाचक संबंधामधी समीक्षाही तडमडते ।।
कांचन म्हणजे सोने आणि सिंचन म्हणजे चांदी
चौकशीच्या नाटकामध्ये पडद्याआड नांदी...
बोल बाई बोल गं... तुझ्या बोलाचा हाय वाजे ढोल गं
बोल बाबा बोल रे... डबल ढोलक्यांचे काय सांगू मोल रे
हास बाई हास गं... चमकेशांची इथे तिथे रास गं
खास बाबा खास रे... पब्लिशिटीचा उगरट वास रे
झोप बाई झोप गं... गाते तंगाई गीत तुला खूप गं
सोप बाबा सोप रे... साहित्याचा घुमान डेली सोप रे
चुकला त्याचा बाण, सलामत अफझलखान
कमळाबाईकडून शेवटी घेतले पलंगपान...
पाच वर्षांसाठी अखेर गाडी गेली यार्डात
इंजिनाचा धूर फक्त मीडियाच्या वार्डात...
आता कशाला मनाची बात । बघ उडून चालली रात
नथुराम तुझ्यावर रे करीलही कदाचित मात ।।
- महेश केळुसकर