कित्येकजण अडथळ्यांना घाबरतात...पण स्वप्नांचे काजवे हाती लागतात, फक्त ‘विश्वास’ हवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 05:56 AM2022-11-08T05:56:04+5:302022-11-08T05:56:36+5:30
उदय लळीत भारताचे निवृत्त सरन्यायाधीश कित्येकजण अडथळ्यांना घाबरतात, निम्म्या वाटेत थकून मागे वळतात. ही वेळ कधीच आपल्यावर येऊ नये, ...
उदय लळीत
भारताचे निवृत्त सरन्यायाधीश
कित्येकजण अडथळ्यांना घाबरतात, निम्म्या वाटेत थकून मागे वळतात.
ही वेळ कधीच आपल्यावर येऊ नये, एवढा प्रयत्न तारुण्यात कायम हवा!
माझा जन्म सोलापूरचा. माझं शालेय शिक्षणही सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेत झालं. वकिलीच्या व्यवसायात मी जवळजवळ ३९ वर्ष आहे. मी कामाला सुरुवात केली तेव्हा वकिलांनी कसं असावं किंवा कसं असू नये, असे उपदेश मलाही मिळाले होते. त्यातलं जे मला पटलं, ते मी जरुर घेतलं. व्यक्तिगत आणि व्यावसायिक मूल्यं जीवापाड जपली. आपण सर्वच काही एक मूल्यांची शिदोरी घेऊन आपापली वाटचाल करीत असतो. त्या वाटचालीमध्ये अडथळे येतात. ठेचा लागतात. आपण सावरतो, पुन्हा एकवार हिमतीने उठून चालू लागतो, अखेर मुक्कामाचं ठिकाण दिसू लागलं, की मागे वळून पाहतो तेव्हा अचानक वाटतं, अरे? इतके पुढे आलो आपण?.. मग वाटतं, हे कसं साधलं आपल्याला? थोडेसे परिश्रम, ईश्वरी आशीर्वाद किंवा वडीलधाऱ्यांचा वारसा असं खूप काही असतं आपल्या यशात! मीही कुणी वेगळा नाही. मी खूप मोठं काहीतरी केलंय, वेगळं केलंय असं काही नाही.
प्रत्येकजण तेच करतो. उत्कटता थोडीशी कमी-जास्त असते, एवढंच!... माझ्यामध्ये ती थोडी जास्त असेल! कोणत्याही व्यवसायात पुढे जाण्यासाठी जिद्द लागते. त्या जिद्दीला हत्यार बनवणं आणि त्यातून वाटचाल करीत पुढे जात राहणं, हीच खरी जीवनाची गुरुकिल्ली आहे. मी तेवढंच करीत आलो.. ध्येय सांभाळून पुढं जाणं हे आपल्यातला प्रत्येकजण करीत राहिला, तर सगळंच काही सुखकर होईल... पण ते दुर्दैवाने होत नाही. कित्येक जण निम्म्या वाटेत थकून मागे वळतात. काही लोक अडथळ्यांना घाबरतात. काही लोक वाटेत लागलेल्या ठेचांनी बेजार होतात. असे लोक मार्ग सोडून जातात. ही वेळ कधीच आपल्यावर येऊ नये हे ध्येय मनाशी बाळगून निवडलेल्या रस्त्यावरून पुढे जात राहणं पुरेसं असतं.
भारत हा तरुणांचा तरुण देश आहे. आपल्या लोकसंख्येत ३० वर्षांच्या खालच्या युवकांची संख्या जवळजवळ निम्मी आहे. इथून पुढे या तरुण पिढीच्या हातातच देशाची सूत्रं असतील. अशा युवकांना थोडी ध्येयासक्ती पाहिजे! तरुण वयात कुठेतरी दूर काजवे चमकल्यासारखी ‘स्वप्नं’ दिसतात; पण ती दूर नसतात... तुमच्या कवेतच असतात ती, आवाक्यात येऊ शकतात; कमी पडतो तो स्वत:वरचा विश्वास!
मी ज्या जमान्यात तरुण वकील म्हणून काम सुरू केलं, तेव्हा आमच्यासाठी ग्रंथालय हाच एकमेव पर्याय होता. अभ्यास करायचा, संदर्भ शोधायचे म्हणजे ग्रंथालयात जायचं! आज सगळ्यांसाठी प्रचंड साधनं उपलब्ध आहेत. मी ज्युनिअर असताना सिनिअर वकील युक्तिवाद करीत असतील, तर आम्ही आमची कामं सोडून कोर्टात त्या वकिलांचा युक्तिवाद ऐकायला जायचो. काल यू-ट्यूबवर पाहत असताना लक्षात आलं, की खुद्द फली नरिमन यांचा संविधान पीठासमोरील युक्तिवादही मला तिथे एका क्लिकसरशी ऐकता येतो. ही संदर्भांची श्रीमंती सर्वांना उपलब्ध आहे. तुम्ही कधीही उघडून पाहू शकता. तुमच्या मागच्या दोन पिढ्यांच्या तुलनेत इतके फायदे असताना जर त्याचा उपयोग नाही केला तर कदाचित भविष्यच तुम्हाला म्हणेल की, मी तुला दिलं होतं उदंड हातांनी, पण कर्म नव्हतं! - ही परिस्थिती कोणत्याही वकिलावर, कुणावरही येऊ नये.
मी जेव्हा वकील झालो, तेव्हा एका वरिष्ठांनी मला सांगितलं होतं, सरस्वतीची पूजा करीत राहा; लक्ष्मी सदैव तुझ्या मागे येत राहील!- यात वकिली व्यवसायाचं सार आहे. या व्यवसायाने मला सगळं काही दिलं. नाव दिलं, कीर्ती दिली. मला जे हवं होतं ते सगळं मिळालं. पैसा जितका हवा होता, त्यापेक्षा जास्त मिळाला... आणि सगळ्यात शेवटी एक संधी मिळाली... आणखी काय हवं असतं माणसाला?
(सोमवारी सेवानिवृत्त झालेले सरन्यायाधीश उदय लळीत यांनी सोलापूर येथे वकील परिषदेत केलेल्या भाषणाचा संपादित सारांश)
शब्दांकन : समीर इनामदार, लोकमत, सोलापूर