उदयनराजे, आपण घेतलेली भूमिका याेग्यच !

By वसंत भोसले | Updated: April 1, 2025 09:38 IST2025-04-01T09:37:20+5:302025-04-01T09:38:11+5:30

Udayanraje Bhosale: कोणीही उठावे आणि महापुरुषांचा अवमान करावा, असे प्रकार वाढले आहेत. त्यासाठी स्वतंत्र कायदा करावा, अशी परखड भूमिका उदयनराजे यांनी घेतली आहे.

Udayanraje Bhosale: Udayanraje, the role you have taken is worthy! | उदयनराजे, आपण घेतलेली भूमिका याेग्यच !

उदयनराजे, आपण घेतलेली भूमिका याेग्यच !

- वसंत भाेसले
(संपादक, लोकमत कोल्हापूर) 

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची वारंवार अवहेलना हाेत आहे. युगपुरुषांचा अपमान आपण किती काळ सहन करणार आहाेत? यासाठी स्वतंत्र कायदाच बनवला तर ज्यांना समाजात किंमत नाही असे राहुल साेलापूरकर, प्रशांत काेरटकरसारख्या व्यक्ती चुकीचे बाेलण्याचे धाडस करणार नाहीत. कायदा नसल्याचा फायदा अनेक जण घेत आहेत,’ अशी परखड भूमिका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे तेरावे वंशज आणि साताराचे भाजपचे खासदार उदयनराजे भाेसले यांनी मांडली आहे. 

कोणत्याही पक्षात किंवा कोणत्याही पदावर असले तरी उदयनराजे अनेक विषयांवर परखड भूमिका मांडतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असतानाही ते अनेक विषयांवर राेखठाेक भूमिका घेत. त्यामुळे प्रसंगी पक्षही अडचणीत यायचा, मात्र त्यांची भूमिका जनसामान्यांच्या मनातील असायची. त्यामुळे शरद पवार वगळता काेणी नेता त्यांच्या भूमिकेला उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नसे. आतादेखील भाजपला काय वाटते किंवा पक्षाची भूमिका काय आहे, याचा विचार न करता रायगड किल्ल्यावर वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून जी वेगवेगळी मतमतांतरे मांडली जात आहेत, ती बाजूला सारत इतिहास अभ्यासकांची समिती स्थापन करून सरकारने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

इतिहासातील विविध घटनांवर आणि व्यक्तिरेखांवर वाद निर्माण हाेईल, अशा भूमिका काहीजण मांडतात. वास्तविक अशा व्यक्ती इतिहासाचे अभ्यासक नसतात किंवा त्यांचे पुराव्यानिशी नवे संशाेधनही नसते. इतिहासातील सर्वमान्य घटनांवर वेगळे मत मांडल्यावर वाद-विवाद हाेणार, त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे, एवढी तरी जाण अशा व्यक्तींना असायला हवी. मुंबईतील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, अभिनेता राहुल साेलापूरकर किंवा स्वत:ला पत्रकार म्हणविणारा प्रशांत काेरटकर हे इतिहास अभ्यासक नाहीत, तरीदेखील ते बेताल बडबड करतात, तेव्हा त्यांच्या या बडबडीच्या हेतूविषयीच शंका येते. इतिहासपुरुषांची अवहेलना करण्याची भाषा वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायद्याची गरज आहे का, हा विचार करण्यासारखा मुद्दा जरूर आहे. उदयनराजे भाेसले यांनी तसे मत मांडले आहे. मात्र असा कायदा करताना इतिहासातच वादग्रस्त ठरलेल्या व्यक्तीविषयी काेणती भूमिका घ्यायची यावर वाद हाेऊ शकतात. इतिहासपुरुषांविषयी वादाचे विषय मांडणाऱ्या घटना अधिक गांभीर्याने घेतल्या जाव्यात, असा उदयनराजे यांच्या मागणीचा मथितार्थ, पण सरकार प्रत्येक घटनेविषयी गंभीर असतेच असे नाही. परिणामी याचा गैरफायदा काहीजण घेतात.

राहुल साेलापूरकर किंवा प्रशांत काेरटकर यांनी केलेली वक्तव्ये खूपच चुकीची हाेती. तरीदेखील त्यांच्यावर हाेणाऱ्या कारवाईत दिरंगाई झाली, याबाबत उदयनराजे भाेसले यांनी संताप व्यक्त केला आहे. महापुरुषांविषयी अनादरकारक वक्तव्ये करण्याचे कोणाचे धाडसच कसे हाेते, हा त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून साऱ्या देशाने मान्यता दिलेली असताना त्यांची प्रतिकृती तयार करून गाेळ्या मारण्याची कृती उत्तर प्रदेशात एका साध्वीने केली हाेती. काेणाला मारणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. अशा गुन्ह्यांचे उदात्तीकरण करणे हा माणुसकीस कलंक आणि कायद्याच्या राज्यव्यवस्थेला आव्हान देण्यासारखा गुन्हा आहे. प्रशांत काेरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याविषयी अश्लाघ्य भाषा वापरली हाेती. अशा व्यक्तींना समाजात स्थान नसले तरी जी इतिहासमान्य महान व्यक्तिमत्त्वे आहेत, त्यांच्याविषयी अयाेग्य भाषा वापरणाऱ्यांबद्दल संताप व्यक्त हाेणे साहजिक आहे. यासाठीच माेक्कासारखा स्वतंत्र कायदा करण्याची उदयनराजे भाेसले यांची भूमिका याेग्य वाटते. उदयनराजे प्रत्येक घटनेवर प्रतिक्रिया देत नाहीत, मात्र संताप व्यक्त करण्याची वेळ आली तर ते कशाचीही फिकीर करीत नाहीत. स्वपक्षाचादेखील विचार करीत नाहीत. जी भूमिका त्यांना पटते ती स्पष्टपणे मांडतात. ती जनतेला आवडते म्हणून उदयनराजे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे तरुण पिढीला आकर्षण आहे. त्यांनी पक्ष बदलला किंवा काेणतीही भूमिका घेतली तरी हा तरुणांचा वर्ग त्यांच्यामागे उभे राहण्याचे गमक हेच आहे. मात्र अशा भूमिका घेऊन त्या साेडून देऊ नयेत, त्यांचा सातत्याने पाठपुरावा करायला हवा, इतकीच अपेक्षा!
(vasant.bhosale@lokmat.com)

Web Title: Udayanraje Bhosale: Udayanraje, the role you have taken is worthy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.